सुमित्राताई महाजन, माझ्या वहिनी

सुमित्राताई महाजन, माझ्या वहिनी

  • Share this:

vidya deodharविद्या देवधर

सेक्रेटरी मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश

केळशीच्या महाजनांची इंदूर आणि पुणे ही दोन घरं. भौगोलिक अंतर असूनही पिढ्यांपिढ्यापासून या दोन्ही घरात अतिशय सख्य आहे. एकमेकांकडे प्रत्येक कार्यक्रमांना आम्ही जात असतो. राष्ट्रसेविका समितीच्या सुमित्राताई आणीबाणी नंतर राजकीय कार्यात सक्रिय झाल्या. आठ वेळा एकाच मतदार संघातून, एकाच पक्षातून खासदार म्हणून लोकसभेवर निवडल्या जाणार्‍या सुमित्राताईंनी जागतिक विक्रम केला आहे. राजकीय क्षेत्रात यशाच्या पायर्‍या चढत जाणार्‍या सुमित्राताई कुटुंबीयांमध्ये मात्र आजही सहजपणे मिसळून जातात, प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून सहभागी होतात. प्रेमळ, आर्जवी स्वभावामुळे सर्वांना त्यांनी जिंकले आहे. अभ्यासूवृत्ती आणि कष्टाळू स्वभाव यामुळे खासदारकीच्या या कार्यकाळात त्या अनेक समित्यांमध्ये सभासद आणि संचालकही होत्या.

सभांनिमित्त जेवढ्या वेळा त्या हैदराबादला आल्या तेंव्हा प्रत्येक वेळी आमच्या घरी आल्या व राहिल्यासुद्धा. सरकारी गेस्ट हाऊसमध्ये न रहाता आपल्या साध्या घरी राहणेच त्यांना आवडते. एकदा सुमित्रावहिनी राहिल्या होत्या आणि सकाळी सहा-साडे सहाला मी उठले तर त्या ओट्याशी होत्या. आपल्या आधी त्या उठलेल्या पाहून मी थोडी ओशाळले. तर त्या सहजपणे म्हणाल्या अग मी सकाळी लिंबू-पाणी घेते, लिंबू शोधून घेतलं आणि माझं काम झालं. तू कर आराम मी गच्चीत चालूनही येईन. २००३ मध्ये सुमित्रावहिनी माहिती दूरसंचार खात्याच्या राज्यमंत्री असताना हैदराबादला आल्या होत्या. सकाळी ९ वाजता टेलिफोन केंद्रातील सभेपासून सुरु झालेला त्यांच्या दिवसाची रात्री ९ वाजता वैदिक धर्म प्रकाशिका या मराठी संस्थेच्या शताब्दी समारंभाने सांगता झाली. त्यानंतर त्या मला म्हणाल्या आता तुझ्याकडे जाऊ, जावयांना भेटायला नको कां? अजित देवधरांचा तेंव्हा अपघात झाला होता म्हणून ते घरीच होते. सुमित्राताई दिवसभर दमलेल्या असूनही आवर्जून वाकडी वाट करून आमच्या घरी आल्या.

sumitra mahajan and familyjpg

सुमित्राताईंना वाचनाची आवड आहे आणि मराठी संस्थांसमोरील प्रश्नांचीही जाण आहे. सेतू माधवराव पगडी यांचे समग्र साहित्य आम्ही २०१० मधे मराठी साहित्य परिषदेतर्फे आठ खंडातून प्रकाशित केले होते. सुमित्राबाईंनी माझ्या घरी ते सर्व खंड उत्सुकतेने पाहिले. महाराष्ट्र सरकारने पूर्वी कबूल केलेले अनुदान त्यावेळी मुख्यमंत्री बदलल्यामुळे आम्हाला मिळाले नव्हते. दिल्लीला गेल्यावर सुमित्राताईंनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना यासंबंधी पत्र पाठविले. मराठीच्या कामाकडे त्यांचं लक्ष वेधले. परिषदेची मी कार्यवाह आणि पगडी प्रकल्पाची सहसंपादक आहे. म्हणून माझे केवळ कौतुक न करता त्यांनी ते समग्र पगडी साहित्य विकतही घेतले. वाचन लेखनाची आवड, राष्ट्रसेविका समितीचे कार्य आणि सामाजिक उपक्रम यामुळे सुमित्राताईंना माझ्या आईबद्दल व आम्हा मुलींबद्दल विशेष आपुलकी आहे. २०१२ मधील चिपळूणच्या साहित्य संमेलनामध्ये आमची भेट झाली तेव्हा भारतीय भाषांमधील स्त्री साहित्याचा मागोवा या ग्रंथाच्या दोन खंडाची माहिती घेताना मी त्याची एक संपादक आहे हे ऐकून त्यांना आनंद झाला व त्यांनी तेही ग्रंथ विकत घेतले. यावरून त्यांचं ग्रंथप्रेम दिसून येते.

आम्ही दिल्लीला गेलो की त्यांच्याकडे मुक्काम असतो. आणि सुमित्रा वहिनीही महाजनांच्या माहेरवाशिणी म्हणुन कौतुकाने आमचे स्वागत करतात.

आजच्या काळात अपवादाने आढळणारी आपुलकी त्या भेटींतून जाणवते. कुटुंबातील सर्वात मोठी सून म्हणून जबाबदारीने सर्वांचे हवे नको पहाणार्‍या सुमित्राताई सर्वांच्या आवडत्या आहेतच. आज संपूर्ण लोकसभेचे कामकाज त्या तसेच समर्थपणे नियंत्रित करतील असा मला विश्वास आहे.

First published: June 6, 2014, 2:28 PM IST

ताज्या बातम्या