मराठवाडा पोरका झाला...

मराठवाडा पोरका झाला...

  • Share this:

rajendra hunje IBN Lokmatराजेंद्र हुंजे, न्यूज एडिटर, आयबीएन लोकमत

प्रमोद महाजन नंतर विलासराव आणि आज गोपीनाथ मुंडे... मराठवाड्यातल्या प्रत्येकाला आपल्या घरातलीच वाटणारी ही माणसं. आज आपल्यात नाही, यावर कुणाचा भरवसाच बसणार नाही. किंबहुना प्रमोद महाजन, विलासराव देशमुख यांच्या जाण्याचा धक्का मराठवाड्यातल्या लोकांनी पचवला होता. 93च्या किल्लारीच्या भूकंपाचा धक्का सहन करूनही लोक त्यातून मोठ्या धीरोदात्तपणे उभे राहिले पण आज गोपीनाथ मुंडे यांनी अकाली सर्वांचा निरोप घेतला, हा धक्का मात्र मराठवाड्याला सहन झाला नाही. आज झालेली ही जखम इतकी खोलवर होती की, त्याची जाणीव भले आज होत नसेल, पण जेव्हा वेदना पुढच्या काळात जाणवू लागतील, तेव्हा मात्र या जखमेची कळ कुणालाही सहन होणार नाही तितकंच खरं...

नव्वदीच्या दशकात गोपीनाथरावांनी काढलेली संघर्ष यात्रा असेल किंवा गोदा परिक्रमा असेल, यामधून त्यांनी जनसामान्यांशी त्यांचं असलेलं नातं अधिक दृढ केलं होतं. सर्वसामान्य कार्यकर्ता ते देशाचा ग्रामविकास मंत्री असा त्यांचा प्रवास समाजातल्या प्रत्येक घटकाला एक वेगळी प्रेरणादायी आयुष्याची कहाणी होती. मुंडेंनी केवळ अमूक एका गटाचा किंवा अमूक जातीचा विचार केला असं कधी दिसलंच नाही. जाती-धर्माच्या पलीकडे जाणारं मुंडेंचं नेतृत्व होतं, म्हणून समाजातल्या प्रत्येकाला ते आपले वाटायचे.

IMG-20140603-WA0005नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं मुंडेंना बीडमध्ये भेटण्याची संधी मिळाली. बीडच्या रणरणत्या उन्हात कशाचीही तमा न बाळगता केवळ माझ्या बीडच्या नागरिकांची समस्या मला सोडवायची आहे, म्हणून वेळ-काळ कशाचंही बंधन न पाळता लोकांमध्ये मिसळणारे मुंडे पाहायला मिळाले. बीडमधल्या भाजप कार्यकर्त्याच्या घरी त्यांना भेटलो, नेहमीप्रमाणं त्यांनी हसतमुखानं स्वागत केलं. मला पाहिल्यावर ते म्हणाले, "या आयबीएनवाले, मुंबईतून आज थेट बीड गाठलंय वाटतं." मी त्यांना म्हटलं, "मुंडेसाहेब नागपूरपासून निघून तुमच्यापर्यंत आलो आहे, तुम्हाला भेटून आता पुढचा प्रवास, पुढच्या मतदारसंघासाठी" त्यावर मुंडे मिश्किलपणे हसले. मुंडेंचं स्मितहास्य म्हणजेच त्यात तुमच्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं असायचं, त्यावर पुढे ते म्हणाले,"बोल काय करायचं?" मी त्यांना म्हटलं, "उद्या माझा कार्यक्रम आहे, त्यात तुम्हाला सहभागी व्हायचंय". त्यावर मुंडे म्हणाले, "अरे, माझ्या जवळच्या मित्राच्या आईचं निधन झालंय. माझ्या प्रत्येक सुख-दु:खात तो माझ्यासोबत राहिलाय, अशावेळी मी त्याच्यासोबत नसलो तर काय वाटेल?" या एका वाक्यावरच मी या नेत्याची जनमाणसातली प्रतिमा आणि प्रतिभा काय असेल, याची चुणूक मला त्यांनी दाखवून दिली. ऐन प्रचाराच्या धामधुमीत याही गोष्टीकडे अत्यंत जातीनं लक्ष देऊन काम करणारे नेते बोटावर मोजण्याइतकेच असतील. पण त्यानंतर अत्यंत आस्तेवाईकपणे माझी विचारपूस केली. त्यावेळी आम्ही दोघांनी इतर राजकीय घडामोडींच्या गप्पा मारत अल्पोपहारही केला. हा क्षण काही फार लांबचा नव्हता. अगदी एप्रिल महिन्यातल्या 17 तारखेच्या आधीचा, त्यावेळी झालेली मुंडेंची ही भेट आता कायमची माझ्या स्मरणात राहील.

पूर्वी विद्यार्थीदशेत असताना विद्यार्थी परिषदेत मी काम केलं होतं. त्यावेळी गोपीनाथ मुंडे हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. संघटनात्मक पातळीवर काम करत असताना, चळवळीच्या माध्यमातून कसं उभं राहायचं आणि त्यातून कार्यकर्ता कसा घडतो याची वेळोवेळी, जेव्हा केव्हा त्यांची आमची भेट व्हायची त्यावेळी ते आम्हाला सांगायचे. त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांना त्यांनी नेहमीच घडवण्याचा प्रयत्न केला.

प्रमोद महाजन, विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांसारख्या जिंदादिल आणि आपल्या मिश्किल टिप्पणीनं राजकीय पटलावर मुशाफिरी करत आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवत राहिले. पण आज जाणत्या आणि दूरदृष्टी असलेल्या या तिन्ही नेत्यांची उणीव पुढच्या काळात मराठवाड्याला कायम जाणवत राहणार यात कसलीही शंका नाही. गोपीनाथ मुंडे यांनी जेव्हा ग्रामविकास खात्याचा कार्यभार स्वीकारला, त्यावेळी ते म्हणाले होते की, “जेव्हा राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली ती पंचायत समिती सदस्य म्हणून आणि देशाच्या सर्वोच्च स्थानी म्हणजे या ग्रामविकासाची धुरा सांभाळण्याची संधी मला मिळाली. म्हणजे नियतीलाच माझ्याकडून ही विकासाची गंगा गावापर्यंत पोहोचवण्याचं काम पूर्ण करून घ्यायचं आहे. ’’ पण हे काम पूर्ण करण्यासाठी नियतीनं जे ताट भरून त्यांच्यापुढे ठेवलं होतं. त्याच भरल्या ताटावरून आज गोपीनाथ मुंडे उठून निघून गेले आहेत.

म्हणूनच, मराठवाड्यातल्या प्रत्येक व्यक्तीला आई-वडील गेल्यानंतर जितकं तीव्र दु:ख होतं, त्याही पलिकडे गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्यानं त्यांना पोरकं झाल्यासारखं वाटतंय. मराठवाड्यात यापुढे नव्या नेतृत्वाला उभारी घ्यायला बराच काळ लोटावा लागेल. पण या तीन नेत्यांच्या जाण्यानं ही निर्माण झालेली पोकळी मात्र न भरून निघणारी आहे. सर्वसामान्यांसाठी सुरू केलेली आयुष्याची संघर्ष यात्रा, सर्वसामान्यांच्याच कल्याणासाठी असलेल्या ग्रामविकास खात्याची धुरा समर्थपणे पेलण्याआधीच मुंडेंची अकाली एक्झिट सगळ्यांनाच चुटपूट लावून गेलीय. गोपीनाथ मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

First published: June 3, 2014, 8:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading