रायगडमधून शेकाप “मावळ(ला)"

रायगडमधून शेकाप “मावळ(ला)

  • Share this:

santosh_dalvi_karjat_ibnlokmatसंतोष दळवी, कर्जत, आयबीएन लोकमत

सोळाव्या लोकसभेत प्रादेशिक पक्षांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे हे मनसेसह शेकापला मतदारांनी चांगलाच धडा देऊन शिकवलं आहे. रायगड जिल्ह्यात शेकापचे अस्तित्व संपले असल्याची जोरदार चर्चा आता रायगडसह मावळ मतदारसंघात चर्चिली जात असून शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी आत्मपरीक्षण करण्याची खरी गरज असल्याचं बोललं जातंय. ज्या भीमराणा थाटात जयंत पाटील जनाब अंतुले यांचा आशीर्वाद घेतला असे ओरडून सांगत होते तो आशीर्वाद आता फुसका ठरला असल्याचं उघड झालंय.

शेकापचे माजी खासदार दि.बा. पाटील आणि रामशेठ ठाकूर यांनाही शेकापमधून दूर करण्यास जयंत पाटील कारणीभूत ठरले होते. लोकसभेत सेनेच्या सोबतीला राहून गेल्या खेपेस सेनेची मदत घेतली त्या बदल्यात पेण, पनवेल आणि अलिबाग विधानसभेत शेकापचे आमदार निवडून आले आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेकाप-शिवसेना एकत्र आले आणि रायगडात सेना- शेकाप युतीचा फाॅर्म्युला तयार झाला. पुढे जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा आणि लोकसभा असा सिलसिला सुरू झाला आणि हा सिलसिला १६व्या लोकसभेला मोडीत निघाला. शेकापने सेनेबरोबर फारकत घेत स्वतंत्रपणे रायगड आणि मावळमध्ये उमेदवार देत आपलं पुरतं हसं करून घेतलं, त्यामुळे शेकापची रायगड जिल्ह्यातील ताकद कळू तरी आली. एका वेळेस आघाडी सरकारला जेरीस आणत शेकापच्या आमदारांनी मंत्रीपदाचे राजीनामे देत सरकारला स्वाभिमान दाखवला होता. कधी आघाडीबरोबर तर कधी युतीबरोबर घरोबा करत जिल्हा परिषदेत टिकून राहण्यासाठी अनेक क्लृप्त्या शेकाप राबवत असे.shekap_Jayant-patil

सेनेबरोबर घरोबा झाला नसता तर शेकाप त्यावेळीच रायगडमधून गाशा गुंडाळत होता, पण आघाडी सरकारच्या सत्तेमधून बाहेर पडून सेनेने बुडत्याला काठीचा आधार दिला आणि शेकाप शाबूत राहिली. मावळ लोकसभा मतदारसंघात लक्ष्मण जगताप यांना राष्ट्रवादीच्या तंबूतून खेचून शेकापमध्ये आणलं ते जयंत पाटील यांनी. लक्ष्मण जगताप यांचं गणित चुकलं आणि शेकापमध्ये गेले. त्यांची अवस्था सध्या घर का न घाट का अशीच झाली आहे. शेकापमध्ये जगताप यांना जाऊन विजय मिळवता आला नाही. शेकापच्या बालेकिल्ल्यात सेनेच्या श्रीरंग बारणे यांनी मुसंडी मारत जगताप यांना आस्मान दाखवलं. खासदारकी मिळवण्यासाठी त्यांनी घाईघाईने आमदारकीचा राजीनामा दिला. आता त्यांचे तेल गेले आणि तूप गेले.

शेकाप त्यांचे पुनर्वसन कसं करणार हे आता अनाकलनीय आहे, तर रमेश कदम यांना पडलेली मतं पाहता शेकापच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनी मुसंडी मारली आणि अखेर सेनेचे अनंत गीते यांनी बाजी मारली. रायगडमध्ये आता शेकापचं अध:पतन सुरू झालं असल्याचं बोललं जातंय. विधानसभेपर्यंत शेकापची शक्कले झाली नाही म्हणजे जयंत पाटील यांनी कमावलं असं म्हणायला वाव आहे. शेकापमध्ये इतर नेत्यांना पत नाही हे एकाधिकारशाही चालवणाऱ्या जयंत पाटलांना सांगणार कोण? हीच गोची दुसऱ्या फळीतील नेत्यांची आहे. रायगड आणि मावळमध्ये जो पराभव झाला याचं खापर कोणावर फोडणार हाच खरा प्रश्न आहे, की जनाब अंतुले साब, तेरा जादू चल नहीं बसा असं म्हणून की विधानसभेची रणनीती आखणार? रायगड जिल्हा परिषदेत सध्या सेनेसोबत असल्याने ही युती कायम राहिली तर शेकापला भविष्यात अच्छे दिन आनेवाले है? की जिल्हा परिषदेतील सेनेची युती तोडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

First published: May 20, 2014, 11:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading