सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पर्याय

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 20, 2014 02:38 PM IST

सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पर्याय

Vishambar chaudhariविश्वंभर चौधरी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

सोळाव्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने सामाजिक बांधिलकीतून समाजाचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना खूप काही शिकवले आहे. एकप्रकारे ज्या जनतेसाठी सामाजिक कार्यकर्ते काम करतात त्या जनतेनेच त्यांच्याशी प्रतारणा केल्याचे दिसत आहे, हे दु:खद आहे.

मेधाताई पाटकर यांच्यापासून बाळासाहेब दराडे यांच्यापर्यंत (राजू शेट्टी यांचा अपवाद वगळता) महाराष्ट्रातील जवळपास सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचा मोदी लाटेत पराभव झाला. वामनराव चटप, मारुती भापकर, विजय पांढरे, सदाभाऊ खोत ही माणसे गेली अनेक वर्षे भ्रष्टाचाराविरोधात लढत आहेत. आपली नोकरी पणाला लावून विजय पांढरे यांनी जलसंपदा विभागातील घोटाळे बाहेर काढले. विजय पांढरे यांचा अपवाद वगळता (कारण ते आतापर्यंत शासकीय सेवेत होते) बाकीची माणसे गेली किमान तीस वर्षे लोकांसाठी रस्त्यावरच्या लढाया लढत आहेत. काहीच वैयक्तिक स्वार्थ न ठेवता केवळ लोकांसाठी पोलिसांच्या काठ्या खायच्या, अगदी दिवाळीचा सणसुद्धा जेलमध्ये काढायचा, अनेक गुन्हे नोंदवले जाऊन प्रत्येक ठिकाणी केवळ आणि केवळ छळ सोसून, स्वत:च्या आयुष्यात काळोखाला तोंड देत, लोकांच्या घरी दिवा लागावा म्हणून आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवायचं हे सोपं नक्कीच नाही. आणि त्यांच्या त्यागाचा, समर्पणाचा समाज असा उतराई होत असेल तर या वाटेवर चालू इच्छिणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांनी बरंच काही शिकण्यासारखं आहे. एक स्पष्ट केलं पाहिजे की हे मी नैराश्यातून म्हणत नाही, व्यावहारिक विचारातून म्हणतो आहे किंवा नव्याने सामाजिक-राजकीय काम करू इच्छिणाऱ्या तरुण मित्रांसाठी हे म्हणतो आहे. २०१४ चा जनादेश काय सांगतो आपल्याला?

१. ज्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर अण्णा, मेधाताई, अरविंद आंदोलन करतात तो मुद्दा लोक निवडणुकीत महत्त्वाचा मानत नाहीत. “भ्रष्ट असला तरी चालेल, कार्यक्षम हवा किंवा खरं म्हणजे प्रचार तंत्रात उत्तम हवा” अशी लोकांची धारणा आहे. लोकांनी भ्रष्टाचार हा महत्त्वाचा मुद्दा मानला असता तर अशोक चव्हाण, येडियुरप्पा यांच्यापासून भ्रष्टाचार विषयात ज्यांची देशभर चर्चा झाली असे अनेक जण निवडून आलेच नसते. उदा.

अ) एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने एकाच सराफाकडून एकाच दिवशी ५० लाखांचे दागिने घेतले आणि नंतर पोलिसांनी ते प्रकरण यशस्वीरीत्या दडपले, माध्यमांनी हा विषय दोन-तीन दिवस दाखवला, तेच पोलीस अधिकारी प्रचंड मतांनी निवडून आले.

Loading...

ब) अमेरिकेच्या नासातील उत्तम करिअर ध्येयवाद म्हणून सोडून देऊन बुलडाण्यात उभे राहिलेले बाळासाहेब दराडे यांना ३०,००० मते मिळतात. याउलट याच जिल्ह्यातील १,४५,००० कुटुंबांना बॅंक घोटाळ्यातून चुना लावण्याचा आरोप असलेले, सहकारी साखर कारखाना घोटाळ्यात आरोप झालेले शिवसेनेचे प्रतापराव जाधव दीड लाख मतानी निवडून येतात.

क) गेली तीस वर्षे अण्णा आणि ताईंच्या आंदोलनांमध्ये रक्ताचे पाणी करणारे, झोपडीतील लोकांना घर मिळत नाही म्हणून व्रतस्थपणे आठ वर्षे अनवाणी चालणारे मारुती भापकर; त्यांना लोक केवळ तीस हजार मते देतात आणि अण्णांच्या केवळ व्यासपीठावर हजेरी लावणारे जनरल व्ही.के. सिंग देशात नंबर दोनची मत-आघाडी घेऊन निवडून येतात. अशी अनेक उदाहरणे देशभर देता येतील. वर असे उल्लेख करणाऱ्याला “तुम्ही जनमताचा आदर केला पाहिजे” असेही सुनावले जाईल!

3dd0076545a7272fd597c2156d5c6352

२. “चांगल्या लोकांनी राजकारणात यावे” असा धोशा सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागे अनेक लोक अन्य वेळी लावत असतात. “तुम्ही काठावर राहून बोलता, प्रत्यक्ष लढाईत का उतरत नाही, लोकांना पर्याय हवा आहे” असे म्हणणारे उत्साहीवीर प्रत्यक्षात आणि सोशल मीडियावर खूप असतात, प्रत्यक्ष चांगली माणसे उभी राहिली की हे लोक मदत तर करतच नाहीत, उलट विरोधात मत देतात आणि नंतर “शक्ती नव्हती तुमच्यात तर का उभे राहिलात?” असा उलट प्रश्न विचारतात! त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘चांगल्या लोकांनी राजकारणात यावे’च्या सापळ्यात अजिबात अडकू नये. आम्ही सोबत राहू म्हणणारे कधीच साथ देत नाहीत. मी फेसबुकवर बाळासाहेब दराडे यांच्यासाठी निधी देण्याचे आवाहन केले होते, लोकांनी जी रक्कम दिली ती इतकी छोटी आहे की इथे ती सांगण्याची देखील लाज वाटते. संसदेत जायला योगेंद्र यादव यांच्यापेक्षा अधिक ‘चांगला’ माणूस मिळाला असता? त्यांना लोकांनी पाडले. सशक्त पक्षातला भ्रष्ट, अडाणी, गुंड असा उमेदवार लोकांना अशक्त पक्षातील स्वच्छ, सुशिक्षित, सुसंस्कृत उमेदवारापेक्षा जास्त आवडतो! मतदारांची ही मानसिकता असेल तर पर्यायी राजकारण वगैरे कधीच उभे राहू शकत नाही.

३. भ्रष्टाचार हा मुद्दा घेऊन अण्णांनी २०११ मध्ये आंदोलन केले तेव्हा सगळा देश रस्त्यावर आला! प्रत्यक्षात त्यानंतर आलेल्या लोकसभा निवडणुकीत भ्रष्टाचार हा मुद्दाच लोकांसमोर नव्हता! अडीच वर्षात देशात असा कोणता भ्रष्टाचार कमी झाला म्हणून लोकांना तो निवडणुकीत Non-issue वाटावा? काँग्रेस-राष्ट्रवादीमधील सगळे भ्रष्ट पाडून सेना-भाजपमधील सर्व भ्रष्ट निवडून आणणे यालाच जनतेचा भ्रष्टाचार विरोध म्हणायचे का? ‘वर’ मोदी यावेत यासाठी ‘खाली’ त्यांच्या पक्षाचा उमेदवार कितीही भ्रष्ट असला तरी आम्ही त्याला मत देऊ अशी मतदाराची मानसिकता आहे. काँग्रेस भ्रष्ट मार्ग वापरत असेल तर तुम्हीही भ्रष्ट मार्ग वापरण्यात कचरू नका असा मतदाराचा कल आहे. सामाजिक कार्यकर्ते तशी रसद जोडू शकत नाहीत. ज्या सामाजिक कार्यकर्त्यांना निवडणूक लढायची असेल त्याने कॉर्पोरेट क्षेत्राची मदत सोबत असेल तरच निवडणुकीत उतरावे, अन्यथा नाही. सगळी सोंगे आणता येतील पण पैशाचे सोंग आणता येत नाही. एक त्यातल्या त्यात बरे आहे की तुम्ही प्रचाराला पैसा कोणत्या मार्गाने आणला यात मतदारांना स्वारस्य नाही, त्यामुळे तुमच्यावर टीका होण्याची शक्यता नाही. वाटेल तर दाऊदकडून पैसे आणा पण निवडून येऊन ‘रिझल्ट’ दाखवा असा मतदारांचा कौल आहे. हे कॉर्पोरेट जगताच्या मानसिकतेशी सुसंगत आहे. अमुक एक टार्गेट पूर्ण करा, त्यासाठी तुम्हाला काय करायचे ते करा हा कॉर्पोरेट संदेश आता निवडणुकीला लागू आहे. तेव्हा Results are important, not the means and principles.  

४. भ्रष्टाचारी नेत्यांना पर्याय द्या म्हणजे मग बदल घडेल ही मांडणी पूर्णत: चूक आहे. देशात जागोजाग चांगले लोक आपापल्या परीने पर्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. खरा प्रश्न पर्याय नसण्याचा आहे की पर्यायांना मत देण्याची लोकांची मानसिकता नसण्याचा आहे? म्हणून चांगल्या लोकांनी ‘पर्याय द्या’च्या मोहक सापळ्यात अडकू नये.

27sld4

५. भ्रष्टाचार हा मुद्दा ४ वर्षे ११ महिने २९ दिवस लोकांना महत्त्वाचा वाटतो आणि मतदानाच्या दिवशी त्यांच्या इतक्या निरनिराळ्या अस्मिता जाग्या होतात की ते हा मुद्दा विसरून मतदान करतात. उमेदवाराची जात, धर्म, पक्ष, श्रीमंती, निवडून आल्यास कोणासोबत जाणार  इत्यादी घटक त्या दिवशी सर्वात महत्त्वाचे ठरतात. निवडणुकीत सामाजिक कार्यकर्त्यांची खिल्ली उडवणारे लोक निवडणुका संपताच त्यांच्या प्रश्नांवर लढायला मात्र सामाजिक कार्यकर्त्यांनाच आग्रह करतात! निवडून आलेले राजकारणी मग पुन्हा पुढची ४ वर्षे ११ महिने २९ दिवस त्यांच्यासाठी निर्भर्त्सनेचा विषय असतात आणि त्यांचे प्रश्न घेऊन कर्तव्यबुद्धीने सामाजिक कार्यकर्त्यांनाच रस्त्यावर उतरावे लागते. सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकांसाठी राजकीय व्यवस्थेशी शत्रुत्व घ्यायचे आणि लोकांनी मात्र निवडणुकीत त्यांचेच मित्र बनून आपल्याला शिव्या घालायच्या हा सिलसिला किती दिवस चालणार? आपल्या सर्व सुखाचा त्याग करून, कुटुंबावर अन्याय करून आपण हे सर्व कोणासाठी करत आहोत? कशासाठी करत आहोत? एकच एक राजकीय नायक आपले सर्व प्रश्न सोडवू शकतो असा दुर्दम्य विश्वास लोकांमध्ये असेल तर आपल्या सामाजिक कार्याचे प्रयोजनच काय? आपण खरोखरच समाजाची गरज वगैरे आहोत का? निवडणूक प्रचारात Good governance, development, change असे हुकमी एक्के चालवले की लोक भ्रष्टाचाराचा मुद्दा लोक विसरतात हे राजकीय पक्षांना चांगलेच कळले आहे. अन्यथा (डावे वगळता) सर्वच राजकीय पक्षांना लोकांनी हा प्रश्न जरूर विचारला असता की “लोकपालच्या कक्षेत तुम्हाला कॉर्पोरेट क्षेत्र का नको आहे? तुम्ही त्यांच्यावर एवढे का मेहेरबान आहात?” पण या मुद्द्याची कुठे चर्चासुद्धा झाली नाही.

६. प्रबळ राजकीय पक्षातील चांगले लोकही प्रसंगी पराभूत होतात, मात्र पुन्हा उभे राहण्याचे आर्थिक बळ त्यांना त्यांचा पक्ष पुरवत असतो. आपण आपली आयुष्याची कमाई समाजासाठी पणाला लावून जास्तीत जास्त एकच निवडणूक लढवू शकतो. एकच निवडणूक लढण्याचे आर्थिक बळ जोडताना नाकीनऊ येतात तिथे दुसरी निवडणूक लढण्याचा विचार करणे पण शक्य नसते. 

मला माहीत आहे की, या लेखावरसुद्धा ‘निराशेचे बोल’ वगैरे शेरेबाजी होईलच. पुन्हा अमुक एक निवडून आले आणि हे विचाराने तमुक एक असल्याने यांच्या पोटात दुखते आहे अशी ठोकळेबाज प्रतिक्रिया देखील येईल. पण तरीही मला हे बोललेच पाहिजे. माऊसच्या, ‘लाईक’च्या एका क्लिकचे धनी असलेले टीकाकार काय म्हणतात यापेक्षा मला सामाजिक कार्यातील ते तरुण महत्त्वाचे वाटतात, जे एक ध्येयवाद घेऊन देशात मतपेटीतून बदल घडवण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्यांना मी DISCOURAGE करत असल्याचा आरोप माझ्यावर झाला तरी चालेल, समाजाचे वास्तव त्यांच्यासमोर मांडणे हे मी माझे कर्तव्य मानतो. कारण देशभरातील अशा सर्व तरुणांना मी माझे भाऊच मानतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2014 11:12 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...