मनसेलाच 'खळ्ळ् खट्याक'

मनसेलाच 'खळ्ळ् खट्याक'

  • Share this:

sachin salveसचिन साळवे, असोसिएट एडिटर-वेब, आयबीएन लोकमत

'लोखंडाला त्याच्यावर चढलेला गंजच संपवतो' अशीच अवस्था मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबतीत झालीय. या लोकसभा निवडणुकीत 'मनसेची औकात दाखवून देईल' अशी गर्जना करणारे राज ठाकरे यांनाच मतदारांनी 'औकात' दाखवून चांगलाच 'खळ्ळ् खट्याक' दिला आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेचे सर्वच्या सर्व दहा उमेदवार पराभूत झाले आहेत. एवढंच नाही तर मुंबईत मनसेच्या एकाही उमेदवाराला लाखभर मतंही मिळाली नाहीत. मुंबईसह इतर मतदारसंघांतील मनसेच्या दहाही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याची लाजिरवाणी बाब घडलीय. ज्या पद्धतीने मनसेनं राज्यात मुसंडी मारली होती त्याच पद्धतीने आता उतरती कळाही लागलीय.

लोकसभेचं फसवं 'राज'कारण

लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी राज यांची भेट घेऊन महायुतीत येण्याचं निमंत्रण दिलं, त्याचबरोबर लोकसभा निवडणूक लढवू नका असा अनुभवाचा सल्लाही दिला. मागील लोकसभा निवडणुकांच्या वेळी मनसेनं निवडणूक लढवल्यामुळे महायुतीला मोठा फटका बसला होता. मनसेच्या उमेदवारांमुळे शिवसेना आणि भाजपच्या मतांवर परिणाम होऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीला याचा फायदा झाला होता. मुंबईतील सहाही जागांवर सेनेचा पराभव झाला होता. त्यामुळेच मतविभाजन टाळण्यासाठी नितीन गडकरींनी राज यांच्यासमोर प्रस्ताव मांडला. पण येणार्‍या विधानसभेच्या दृष्टीने जर लोकसभा लढवली नाहीतर लोकांमध्ये वेगळा संदेश जाईल याची चिंता राज यांना होती. त्यामुळे गडकरींचा सल्ला टाळून राज यांनी पक्षाच्या आठव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मनसे निवडणूक लढवणार अशी घोषणा केली.

या घोषणेसोबत राज यांनी जर आमचे उमेदवार निवडून आले तर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील अशी चाल खेळली. तसं पाहता राज यांचं मोदीप्रेम सर्वश्रुत आहे. राज जरी प्रेम म्हणत असले तरी मतदार हे मान्य करेल हे कशावरून? मतांच्या जोगव्यासाठी राज यांनी मोदी कार्ड वापरले तर दुसरीकडे जुनेच पत्ते टाकत शिवसेनेच्या विरोधात आपले दहा उमेदवार रिंगणात उतरवले. राज यांच्या या चालीमुळे महायुतीच्या गोटात चिंता पसरली होती. मतदारांमध्येही यामुळे संभ्रम निर्माण झाला. पण नरेंद्र मोदी नावाची त्सुनामी आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षबांधणीमुळे सेनेचा विजय झाला.

मनसेनं दक्षिण मुंबईमधून मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी मागील निवडणुकीत दुसर्‍या स्थानावर राहून लाखभर मतं मिळवली होती. यावेळी त्यांना 84,773 मतं मिळाली त्यांचा पराभव सेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांनी केला. सावंत यांना तब्बल 3,74,609 मतं मिळाली म्हणजे नांदगावकर यांचा 2,89,836 मतांनी पराभव झाला. नांदगावकर यांच्या बाबतीत जे घडलं ते इतर उमेदवारांच्या बाबतीतही घडलं. दक्षिण-मध्य मुंबईतून आदित्य शिरोडकर, उत्तर-पश्चिम मुंबईतून महेश मांजरेकर,  शिरूरमधून अशोक खंडेभराड, पुण्यातून दीपक पायगुडे आणि नाशिकमधून डॉ.प्रदीप पवार या उमेदवारांचा मोठ्या संख्येने सेनेच्या उमेदवारांनी पराभव केला.  कल्याणमधले राजीव पाटील याला अपवाद राहिले पण त्यांनी लाखभर मतंही मिळवली पण डिपॉझिट जप्त होईल असा पराभव ही पाहिला. राज यांनी ज्या पद्धतीने लोकसभेसाठी रणनीती आखली तीच त्यांच्या अंगाशी आली.

Francis Mascarenhas - Indus Images (2)

प्रचार निष्प्रभ

राज ठाकरे यांची सभा म्हणजे 'हाऊसफुल्ल शो', पण सभेला असणारी गर्दी ही मतांमध्ये रूपांतरित होते असं नाही हे निकालावरून अधोरेखित झालं. राज यांची बोलण्याची स्टाईल, बिनधास्त, बेधडक आणि हजरजबाबी वक्तृत्व खास करून तरुणांना आकर्षित करू शकलं. त्यामुळे राज हे तरुणांच्या गळ्यातले ताईत बनले.

राज यांच्या सभेला विक्रमी गर्दी होणं ही नवी गोष्ट नाही. मीडियात तर राज यांची सभा म्हणजे फुल्ल टीआरपी शो, त्यामुळे सभा लाईव्ह दाखवणे हे नियमांचं झालं. पण लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राज यांच्या सुरुवातीच्या सभा चांगल्या गाजल्या पण नंतर सभांना गर्दीचा जोर ओसरला. मीडियातूनही राज यांची एखादी झलक पाहण्यास मिळायची. वृत्तपत्रातही राज पहिल्या पानावरून आतल्या पानावर फेकले गेले. पण त्याला कारणही राज ठाकरेच ठरले. निवडणुकांच्या अगोदर राज यांनी टोल आंदोलन पुकारले होते. राज यांचे टोलविरोधी आंदोलन हे काही पहिले आंदोलन नव्हते. याअगोदरही राज यांनी टोलफोड केली होती. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज यांनी टोलचा मुद्दा पुन्हा उकरून काढला. बरं काढला तर काढला पण तो यशस्वीपणे पेलताही आला नाही. टोलफोडीनंतर रास्ता रोको आंदोलनाचा मोठा ड्रामा केला आणि स्वत:ला अटक करून घेतली. नंतर मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे म्हणा अथवा प्रेमामुळे आंदोलन गुंडाळण्यात आलं. पण 'गिरे तो भी टांग उपर' असं म्हणत राज यांनी सरकारनेच माघार घेतली असा आवही आणला. याचाच परिणाम प्रचारावरही दिसून आला.

प्रचारात पुन्हा जुन्या मुद्द्यांना उकरून काढत ठाकरे विरुद्ध ठाकरे असं युद्धच राज यांनी पुकारलं. पण आजपर्यंतचं ठाकरे बंधूंचं पेल्यातलं भांडण हे ताटातलं झालं. 'बाळासाहेबांना तेलकट बटाटेवडे दिले जायचे म्हणून मी त्यांना चिकन सूप दिलं' असा घरचा खुलासाच राज यांनी केला. एवढंच नाहीतर भाऊ असल्याचं नातं सांगत उद्धव हॉस्पिटलमध्ये असताना दिवसभर सोबत होतो आणि घरीही सोडलं हेही सांगायला राज विसरले नाहीत. खरं तर ज्या मराठी माणसाच्या जीवावर राज मोठे झाले त्या मराठी माणसाला खाण्यापिण्याचा आणि दु:खाच्या वेळी साथ दिल्याचा हिशेब काढला तर कुणालाही आवडणार नाही. ऊठसूट परप्रांतीयांना मारणार, मराठी तरुणांना नोकर्‍या द्या याभोवतीच राज यांची बडबड गेली सहा वर्षं मराठी जनतेनं ऐकली. पण रोजची महागाई, भ्रष्टाचार याला वैतागलेल्या जनतेला ठोस असं आश्वासन देणारं एकही कार्य राज यांनी हाती घेतलं नाही. नरेंद्र मोदी यांनी विकास, सुशासन आणि प्रगतीचं स्वप्न दाखवून लोकांचा विश्वास जिंकला आणि तो मतांमधून पाहण्यासही मिळाला. पण राज यांची ना ब्लू प्रिंट दिसली, ना विकासकामाचा उल्लेख त्यामुळेच प्रचारात राज यांची जुन्याच मुद्द्यांना घेऊन शिळ्या कढीला ऊत आणला.

Francis Mascarenhas - Indus Images (4)

बेताल राज

आपण राज 'ठाकरे' आहोत एवढंच आपल्यासाठी पुरे... असा समज बहुतेक राज यांनी करून घेतला असावा.

आपण काहीही बोललं तरी 'ब्रेकिंग न्यूज' होते त्यामुळे कसंही वागलं तरी आपल्याला प्रसिद्धी मिळेल असा समज राज यांनी बाळगून घेतला. पण आपण काय बोलतो, कुणाशी बोलतो याचं भान बहुतेक राज ठाकरेंना राहिले नसावे. निवडणुकीच्या दरम्यान राज यांच्या अनेक वृत्तवाहिन्यांनी मुलाखती घेतल्या. टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी राज यांची मुलाखत म्हणजे फुल्ल मसालेदार मेजवानीच असते. राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांमध्ये आयबीएन नेटवर्कचे संपादक राजदीप सरदेसाई, टाइम्स नाऊचे संपादक अर्णव गोस्वामी या दिग्गज पत्रकारांनी राज यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत आपण एका राष्ट्रीय पातळीवर बोलतोय याचे भान बहुतेक राज यांना राहिले नाही. आपण किती उद्धट आहोत हेच राज ठाकरेंनी मुलाखतीतून दाखवून दिलं. राजदीप सरदेसाई यांचं नाव पत्रकारितेत मोठ्या आदरानं घेतलं जातं. अनेक राजकीय पक्ष त्यांच्यासमोर लहानाचे मोठे झाले. पण राज यांना याचं सोयरसुतक नाही. जसे काही उद्या आपण देशाचे पंतप्रधान होणार आहोत अशा आविर्भावात उत्तर देत होते. बरं, आपण किती वाचाळ असलो तरी त्याला मर्यादाही असते. पण राज यांनी आपला दांडपट्टा चालूच ठेवला. 'आप का भोकना बंद हुआ' असं बोलण्यातही राज मागे सरकले नाहीत. पण तरीही अतिथी देवो भव: असा मान राखून राजदीप यांनी मुलाखत पूर्ण केली. मात्र यामुळे आपलीच प्रतिमा खराब होते याचे भान बहुतेक राज यांना नसावे. म्हणूनच निकालातून मतदारांनी त्यांना जमिनीवर चांगलेच आपटले. विशेष म्हणजे आपले राजसाहेब काय बिनधास्त बोलतात हे पाहून मनसेच्या कार्यकर्त्यांची छाती फुलून आली होती. आता त्यांच्याच पराक्रमामुळे डिपॉझिट जप्त झालंय हे पाहून छाती बडवायची वेळही त्यांच्यावरच आलीय.

पुढे काय?

लोकसभेची निवडणूक खर्‍या अर्थाने राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सेमीफायनल होती. या सेमीफायनलमध्ये मनसेची पुरती धुळधाण उडाली. सर्वच उमेदवार पराभूत झाले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीही तोंडघशी पडली आहे. पण या सेमीफायनलमध्ये महायुतीने बाजी मारत आपली जागा पक्की केलीय. शिवसेनेनं दमदार यश मिळवून उद्धव ठाकरे यांच्या पक्षनेतृत्वावर शिक्कामोर्तब केलंय. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना पहिल्याच लोकसभा निवडणुकीला सामोरी गेली. उद्धव यांनी नेतृत्व यशस्वीपणे पेलून पक्षप्रमुखाची भूमिका चोख बजावलीय. या तिन्ही पक्षांच्या तुलनेत मनसे तसा आवाक्यातला पक्ष, पण आपली दखल घेण्यास मागील निवडणुकात भाग पाडलं.

खरं तर राजकारणात अचूक टायमिंगला फार महत्त्व असतं. पण गेल्या काही काळात राज यांचं टायमिंग चुकल्यामुळे अपयशाला सामोरं जावं लागलंय. विधानसभेसाठी मनसेला आणखी मेहनत, जनसंपर्क, लोकांचा विश्वास जिंकण्याची मोठी गरज आहे. लोकांना आता त्याच त्याच राजकारणाचा वीट आलाय हे या निकालावरून स्पष्ट झालंय. 'काम करा नाही तर घरी जा' असा इशाराच मतदारांनी गृहीत धरणार्‍यांना दिलाय. राज ठाकरेंसमोर आता पक्षबांधणीचे मोठे आव्हान आहे. पक्षातील नेते, कार्यकर्त्यांना पुन्हा विश्वास मिळवून देण्याची गरज आहे. महायुतीची घोडदौड पाहता उद्या एखाद्यावेळेस राज 'टाळी' देण्यासाठी हात पुढेही करतील पण आता वेळ निघून गेली आहे. आता जरी राज यांनी टाळी देण्याचा प्रयत्न केला तरी शिवसेनेला आता राज यांच्या टाळीची गरज आहे काय? हे तर निकालावरून स्पष्ट आहे. जरी राज यांनी असा निर्णय घेतला तरी मनसेचा मतदार राज यांचा निर्णय स्वीकारेल का? हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. यामुळे राज यांची पुरती गोची झाली असून विधानसभेसाठी राज ठाकरेंना ताकही फुंकून प्यावे लागणार आहे.

First published: May 19, 2014, 9:52 AM IST

ताज्या बातम्या