वगसम्राट : 'काळू-बाळू'

  • Share this:

rajendra hunje IBN Lokmatराजेंद्र हुंजे, डेप्युटी न्यूज एडिटर, आयबीएन लोकमत

70 ते 90 दशकातल्या तमाशाविषयी बोलायचं म्हटलं की, त्यातल्या वगनाट्याच्या प्रकारात काळू-बाळूचं नाव घेतल्याशिवाय कुठलीही चर्चा पुढं जात नाही; किंबहुना तमाशातला तो 20 वर्षांचा काळ हा बहुत करून काळू-बाळूंच्या वगनाट्यांच्या प्रयोगांनीच अधिक गाजला. काळू-बाळू आज जगात नाहीत. पण त्यांच्या कलाकृतींचा वारसा मात्र यापुढं येणार्‍या पिढ्यांना विनोदी शैलीच्या कलांचा वारसा जपण्यासाठी प्रोत्साहन देत राहील.

सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातलं कवलापूर हे काळू-बाळूंचं जन्मगाव...या दोघांनी जेव्हा आपल्या आईच्या उदरातून जन्म घेतला त्यावेळचा मनाला भिडणारा प्रसंग आहे तो असा...काळू यांचा जन्म पहिल्यांदा झाला. त्यावेळी गावाकडे फारशी आरोग्य सुविधा उपलब्ध नसायची नाही, त्यामुळे गावातल्या एका वयोवृद्ध सुईनीकडूनच बायकांची बाळंतपणं व्हायची. बाई बाळंत झाली की तिची वार उकिरड्यावर पुरली जायची. त्याप्रमाणेच त्या गावातल्या सुईनीनं काळू यांच्या जन्मानंतर ती वार उकिरड्यावर नेऊन पुरली. पण पुरत असताना तिला त्यात काहीतरी वळवळतंय असं दिसलं. ती वार पुन्हा उकरून तिनं पाहिल्यानंतर आणखी एक बाळ त्यात असल्याचं तिला निदर्शनास आलं आणि हे बाळ म्हणजे बाळू ऊर्फ अंकुश खाडे... इथपासून आपल्या आयुष्याची सुरुवात केलेल्या या महान कलाकारानं आपल्या आयुष्यातली सगळी सुखदु:ख विसरून त्यांनी जगाचं अविरत मनोरंजन केलं.

Kalu Balu Tamasha

तमाशातील वगसम्राट अंकुश ऊर्फ बाळू खाडे यांनी शनिवारी या जगाचा निरोप घेतला...ही बातमी आली तशी वगनाट्यातून सादर होणारी त्यांची विनोदी शैली झर्रकन डोळ्यासमोर आली. वगनाट्यातल्या विनोदाच्या माध्यमातून समाजाचं मनोरंजन करणार्‍या या जोडीनं अनेकांच्या आयुष्यात हास्याचे फवारे फुलवत आपलं आयुष्य मात्र अत्यंत हालअपेष्टांत काढलं. कलाकार म्हणून रंगमंच जरूर त्यांनी गाजवल. त्यांना मानमरातब मिळाला, पण उतारवयात एका कलाकाराला जी प्रतिष्ठा मिळायला हवी, ती मात्र त्यांना मिळाली नाही, याचीच खंत त्यांच्या मनात शेवटपर्यंत राहिली. जहरी प्याला या नाटकामधून आपली कला सादर करत असताना, या जोडीनं आपल्या आयुष्यातले कटू अनुभव गिळून जगाला हसवण्याचं काम केलं. शेवटपर्यंत त्यांच्या वाट्याला उपेक्षेचं जगणं आलं. ते असेपर्यंत या जगाला त्यांची फारशी आठवण झाली नाही, पण जेव्हा त्यांनी या जगाचा निरोप घेतला, त्यावेळी अनेकांनी त्यांच्या कुटुंबीयांना भेट देऊन त्यांचं सांत्वन केलं. खरं तर याच सगळ्या गोष्टी त्यांच्या हयातीत झाल्या असत्या, तर त्यांना कितीतरी समाधान मिळालं असतं. असो...! अशा अनेक गोष्टी सांगता येतील.

बाबूराव पुणेकरांच्या जहरी प्याला या वगनाट्यातून खरं तर या जगाला त्यांची ओळख झाली. यानंतर राजा हरिश्चंद्र, राम नाही राज्यात आणि सोंगाड्या ही त्यांची वगनाट्य प्रेक्षकांचं अमाप प्रेम घेऊन गेली. या सगळ्या वगनाट्यांमध्ये ते सोंगाड्याची भूमिका साकारत असत. यात्रा आणि जत्रांचे काळू-बाळू हे विशेष आकर्षण असायचे. बाळू यांचे भाऊ काळू ऊर्फ लहू खाडे यांनी न थकता सलग 60 वर्षं आपली कला या रंगमंचावरून ते सादर करत राहिले. पण बाळू यांचे प्रयोग मात्र आजारपणामुळे पुढच्या काळात थांबले. जहरी प्याला या वगनाट्यावरूनच त्यांना काळू-बाळू असं नाव पडलं. त्यांच्या लोकप्रिय कलाविष्कारामुळे गावागावात काळू-बाळूची जोडी असा वाक्‌प्रचारच रूढ झाला. उत्स्फूर्त विनोद निर्मितीचं कसब त्यांच्याकडे होतं. जहरी प्याला या वगनाट्यातून त्यांना अफाट प्रसिद्धी मिळाली. 'हॅम्लेट' आणि 'मॅकबेथ' या कथांचं देशी रूप म्हणजे जहरी प्याला. राणीला विश्वासात घेऊन राजाचा खून करणारा प्रधान आणि त्या खुनाचा घेतला जाणारा सूड ही जहरी प्यालाची कथा... या वगनाट्यातून काळू-बाळू हे राजकीय, सामाजिक घटनांवर सोंगाड्यांच्या पात्रांमधून मार्मिक भाष्य करीत असत.

या दोघांनी आपलं आयुष्य एक अजातशत्रू म्हणून जगलं. ते जुळे असल्यामुळे अनेक विनोदाचे प्रसंग त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडायचे. जसे की, चहा काळू पिऊन जायचे आणि पैसे बाळूला द्यावे लागायचे, तर कधी बाळू दाढी करून जायचे आणि पैसे काळू यांना द्यावे लागायचे. इतकंच नाही, त्या दोघांच्या कौटुंबिक जीवनातही अनेकदा विनोदाचे प्रसंग घडले आहेत. काळू-बाळूंचं दिसणं, बोलणं आणि वागणं हे अगदी सारखं असायचं.

76kalu_balu_tamashaत्यांनी आयुष्यात कधीच त्यांच्या समव्यावसायिकांशी स्पर्धा केली नाही. उलट त्यांना कार्यक्रमासाठी नेहमीच प्रोत्साहित केलं. एवढंच काय तर हॉस्पिटल, शाळा आणि स्मशानभूमी उभारण्यासाठी त्यांनी आपल्या वगनाट्याचे मोफत प्रयोग केले. कुठल्याही सामाजिक कारणासाठी त्यांनी सदैव पुढाकार घेतला. श्रद्धा-अंधश्रद्धा संदर्भात घटनांवर भाष्य करून त्यांनी आपल्या कार्यक्रमात समाजप्रबोधनाचंही काम केलं. ग्रामीण भागात काळू-बाळूची ही जोडी त्या काळात सुपर-डुपर हिट होती. घरात आजोबांपासूनच या कलेची परंपरा असल्यामुळे रक्तातच कला रुजली होती.

या दोन गुणी कलाकार भावंडांच्या कलेविषयी आणि त्यांच्या कार्यक्रमाविषयी बोलताना ज्येष्ठ अभिनेते निळू फुले म्हणायचे, "त्याकाळी आम्ही कथा अकलेच्या कांद्याची या लोकनाट्याची कला सादर करायचो. तेव्हा त्याच गावात किंवा गावातल्या जत्रेमध्ये जर काळू-बाळूचा कार्यक्रम लागला असेल, तर त्यांचा कार्यक्रम हाऊसफूल जायचा आणि आम्हाला प्रेक्षकांची वाट बघायला लागायची. त्यामुळे त्यांच्या कलेकडे पाहताना मला आमच्या काळातल्या जाड्या-रड्याची आठवण व्हायची" निळूभाऊंची ही प्रतिक्रिया म्हणजे काळू-बाळू यांच्या कलेला मिळालेली पावती होती. विशेष म्हणजे आताच्या काळातल्या तमाशाविषयी काळू-बाळू हे अत्यंत खेदानं बोलायचे. तमाशामधला मूळ गाभाच कुठंतरी आपण हरवून बसतोय, असं ते म्हणायचे.

त्यांनी वगनाट्य प्रकाराला कलाक्षेत्रात एक प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या कलाकारीची दाद म्हणून त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. राज्य सांस्कृतिक पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार, शरद पवार मुख्यमंत्री असताना मिळालेला महाराष्ट्र गौरव पुरस्कार..या सगळ्या पुरस्कारांमुळे त्यांनी सादर केलेल्या कलेला राजमान्यता मिळाली. पण एक कलाकार म्हणून त्यांच्या वाट्याला उपेक्षेचं जिणं आलं, याबाबत मात्र खंत वाटते. तमाशाचा इतिहास हा काळू-बाळूंवर अनेक पानं लिहिल्याशिवाय पूर्णच होऊ शकणार नाही, हेही तितकंच खरं... काळू-बाळू या वगसम्राटांना भावपूर्ण आदरांजली...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2014 10:02 PM IST

ताज्या बातम्या