News18 Lokmat

शेजारील राष्ट्रांना नव्या सरकारची उत्सुकता !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 29, 2014 10:55 PM IST

शेजारील राष्ट्रांना नव्या सरकारची उत्सुकता !

jatin_desai_150x150-जतीन देसाई पत्रकार आणि पाकिस्तानातील राजकीय घडामोडींचे विश्लेषक

संपूर्ण जगाचं लक्ष भारतीय निवडणुकांकडे लागलं आहे. भारत एक आर्थिक महासत्ता म्हणून पुढे येत असल्याने तसेच दक्षिण आशियात भारताचं एक वेगळं महत्त्व असल्याने साहजिकच अमेरिका आणि इतर प्रगत राष्ट्रांसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. प्रगत राष्ट्रांप्रमाणे आपल्या शेजारील देशातही भारताचा नवा पंतप्रधान कोण होणार आणि त्याचं धोरण काय असणार यावर चर्चा होत असताना दिसते. वर्तमानपत्रांतून तसेच टीव्हीच्या माध्यमातून ही चर्चा लोकांपर्यंत जात आहे. भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी जणू आपणच पंतप्रधान होणार आहोत या स्टाईलने भाषण करायला सुरुवात केली आहे.

अफगाणिस्तानात काही दिवसांपूर्वी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. त्याचा निकाल येण्यास अजून काही दिवस लागतील. शक्यता ही आहे की, निवडणूक कदाचित दुसर्‍या फेरीत जाईल. या सोबत या वर्षाच्या अखेरपर्यंत अमेरिका आणि मित्रराष्ट्र अफगाणिस्तानाहून आपले सैन्य परत बोलावणार असल्याने तालिबान परत सत्तेवर येऊ नये, ही सर्वांसाठी महत्त्वाची बाब आहे. भारत अफगाणिस्तानचे संबंध खूप जुने आहेत. भारताबद्दल अफगाणिस्तानात लोकांमध्ये आदर आहे. भारतात येणार्‍या नवीन सरकारने अफगाणिस्तानला सक्रिय भूमिका पार पाडवी लागणार आहे. पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेशशी संबंध सुधारण्याचं काम नवीन सरकारला करावं लागणार.

5362304971040885277_Midएक महिन्यापूर्वी पाकिस्तानच्या लाहोर शहरात एका खासगी कामासाठी गेलो होतो. तिथे अनेक लोकं भेटली. त्यात पत्रकार, सामाजिक- राजकीय कार्यकर्ते इत्यादींचा समावेश होता. भारतासोबत व्यापार करणार्‍या काही लोकांसोबत देखील भेट झाली. प्रत्येक जण भारताच्या निवडणुका आणि कोण पुढचं सरकार बनविणार, हमखास विचारत होते. नरेंद्र मोदी सत्तेवर येणार की काय, याची भीती कार्यकर्त्यांना वाटत होती. 2002 हा इतिहास हे कार्यकर्ते विसरलेले नाहीत तर मोठमोठ्या व्यापार्‍यांच्या दृष्टीने 2002 हा इतिहास झाला आहे.

या व्यापार्‍यांच्या दृष्टीने मोदी पंतप्रधान झाले तर दोन्ही देशातील परस्पर व्यापार वाढणार. त्यांच्या म्हणण्यानुसार, मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान दोन्ही व्यापार आणि उद्योगाच्या बाजूने आहेत. आज दोन्ही देशात 2.67 अब्ज डॉलर रकमेचा सरळ व्यापार होत आहे. तिसर्‍या देशामार्फत होणार्‍या व्यापाराचा विचार केला तर सगळं मिळून 8 अब्ज डॉलर एवढा व्यापार होत आहे. ही रक्कम अतिशय कमी आहे. दोन्ही देशातील व्यापार वाढावा यासाठी दोन्ही सरकार आणि व्यापार्‍यांकडून आशा बाळगली जात आहेत. यासाठी देखील भारतीय निवडणुकीला पाकिस्तानात महत्त्व मिळत आहे आणि त्यावर चर्चा होत आहे.

Loading...

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि पाकिस्तानचे भारतातील हायकमिशनर अब्दुल बशीतने भारतात येणारं सरकार शांतता प्रक्रियेला वेग देईल, अशी आशा व्यक्त केली आहे. नवीन सरकारला पाकिस्तानच्या भेटीचं औपचारिक निमंत्रण देखील पाकिस्तान देणार आहे. दहा वर्षांच्या आपल्या पंतप्रधानपदाच्या काळात मनमोहन सिंगांनी पाकिस्तानचा एकदाही दौरा केला नाही. भारताचे नवीन पंतप्रधान आणि नवाझ शरीफ यांची नोव्हेंबर महिन्यात नेपाळ येथे नक्की भेट होणार आहे. साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल को-ऑपरेशन (सार्क) ची शिखर परिषद नेपाळला होणार आहे. जगभरातील पत्रकार या सार्कसाठी येणार पण त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार ते म्हणजे दोन्ही देशातील पंतप्रधान.

पाकिस्तानात इंग्रजी वर्तमानपत्रांचा खप खूप कमी आहे. इंग्रजी न्यूज चॅनल तर एकही नाही. डॉन (Dawn) वृत्तपत्र समूहाने इंग्रजी चॅनल सुरू केलं पण त्यांना लगेच उर्दूत बदलावं लागलं. पाकिस्तानातून प्रसिद्ध होणार्‍या इंग्रजी वर्तमानपत्रांत भारतीय निवडणुकांचं तटस्थ विश्लेषण केलं जात आहे. काही भारतीय पत्रकारांचे लेख, विश्लेषणं पाकिस्तानात प्रसिद्ध होत आहेत. विविध टीव्ही चॅनलवर चर्चा होत आहेत. या चर्चांचं स्वरूप भारतीय निवडणुकांचं पाकिस्तानावर काय परिणाम होईल आणि त्याची मदत दोन्ही देशातील संबंध सुधारण्यात होईल की नाही, असं आहे.

sc-asks-ec-to-install-electronic-voting-machines-issuing-paper-receipts-to-voters-for-2014-polls_081013010529भारत आणि पाकिस्तानच्या दृष्टीने अफगाणिस्तान महत्त्वाचं आहे. नवा अध्यक्ष कोण होणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. अफगाणिस्तानला उभं करण्यासाठी भारताने मोठी गंुतवणूक आणि मदत केली आहे. बहुसंख्य अफगाण हे पख्तून आहेत. पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वा प्रांतात पण पख्तून बहुसंख्य आहेत. त्यांच्यात रोटी-बेटीचा व्यवहार आहे. तालिबानने अमेरिकेवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानवर आक्रमण केलं तेव्हा बहुसंख्य पख्तून व परकीय तालिबानी आणि अल कायदाच्या अतिरेक्यांनी खैबर-पख्तूनख्वाचा आश्रय घेतला.

पाकिस्तानात नॉर्थ वझिरास्तानातील अतिरेकी संघटन हक्कानी नेटवर्क अफगाणिस्तानात मित्रराष्ट्रांच्या सैन्यावर हल्ले चढवितो. हक्कानी नेटवर्कला आयएसआयची मदत आहे. हक्कानी नेटवर्कच्या मदतीने आयएसआय अफगाणिस्तानात आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्नात आहे. काबूल येथे पूर्वी झालेल्या भारतीय हायकमिशनवर हल्ल्यामागे आयएसआयचा हात होता ही गोष्ट लपून राहिलेली नाही. अफगाणिस्तान मध्य आशियाला जोडणार असल्याने देखील त्याचं विशेष भौगोलिक महत्त्व आहे. अफगाणिस्तानात तालिबान सत्तेवर येणार नाही, हे पाहण्याचं काम भारताला करावं लागणार आहे. अफगाणिस्तानच्या संदर्भात पाकिस्तानात जेवढी चर्चा होते तेवढी भारतात होत नाही. अफगाण लोकांच्या देखील भारतात येणार्‍या नवीन सरकारकडून खूप अपेक्षा आहेत.

पाकिस्तानात अटलबिहारी वाजपेयी सर्वात लोकप्रिय भारतीय नेते आहेत. भाजपबद्दल तेव्हा पाकिस्तानात लोकांचं कटू मत होतं. पण, वाजपेयींनी आपल्या धोरणातून पाकिस्तानी लोकांचं मन जिंकलं. भारतात नरेंद्र मोदी किंवा इतर कोणीही पंतप्रधान झाला तरी जागतिक परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचा एवढा दबाव असणार की, शेजारी राष्ट्राशी संबंध अधिक सुधारण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. याशिवाय सत्तेचं एक स्वत:च कॅरेक्टर असतं. सत्तेत गेल्यानंतर आक्रमक भूमिका घेता येत नाही. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर जबाबदारी नसते आणि म्हणून त्यांना जहाल भूमिका घेणे परवडते. पण सत्ता लोकांना शहाणं बनवते. याची जाणीव आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करणार्‍यांना असते आणि म्हणूनच काँग्रेसऐवजी भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आलं तरी आंतरराष्ट्रीय धोरणात फारसा फरक पडत नाही. ही वस्तुस्थिती असल्याने भारतात येणार्‍या नवीन सरकारशी चर्चा करण्यास सर्व उत्सुक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 29, 2014 10:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...