आवड...गरज आणि गॅजेट्स

आवड...गरज आणि गॅजेट्स

  • Share this:

amruta dhurve- अमृत्ता दुर्वे, सीनिअर  एडिटर प्रॉड्यूसर,IBN लोकमत

गेल्या दोन आठवड्यात तीन व्यक्तींसोबत नवीन मोबाईल फोन घेण्यासाठी जाणं झालं. तीनही व्यक्ती वेगवेगळ्या वयाच्या, वेगवेगळ्या गरजा आणि वापर असणाऱ्या. पहिल्या होत्या बँकेतून रिटायर झालेल्या एक मावशी. फोन घ्यायचाय, असं सांगायला फोन आला तेव्हाच त्यांनी मला ठासून सांगितलं, 'स्मार्टफोन' घ्यायचाय. दुसरा होता नोकरी करणारा, बहुतेक सगळी कामं इंटरनेटवर करणारा, भरपूर ट्रॅव्हल करणारा तरूण, तर तिसरी वर्किंग वुमन.

तुमच्या गरजा नेमक्या काय आहेत, कशाकशासाठी त्या फोनचा वापर होणार हे लक्षात घेऊन त्यानुसार फोन घेणंच योग्य. ज्या गोष्टी आपण वापरणार नाही, त्याचे पैसे कशाला द्यायचे? नुसतं मिरवण्यासाठी हाय-एन्ड फोन घेण्यात अर्थ नाही. फोन घेताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी - ज्याप्रमाणे सर्वगुणसंपन्न सून किंवा जावई मिळणं शक्य नाही, त्याचप्रमाणे सर्वगुणसंपन्न - सगळी फीचर्स चांगली असणारा आणि आपल्या बजेटमध्ये बसणारा फोन मिळणं अशक्य आहे. त्यामुळे आपल्याला हव्या त्या गोष्टी चांगल्यात चांगल्या कोणत्या फोनमध्ये आहेत, ते शोधायचं. प्रत्येक फोनमध्ये कोणती ना कोणती उणीव असणारंच. आता गरजांनुसार फोन कसा घ्यायचा ते पाहू. या तिघांच्या गरजा आणि बजेट वेगवेगळं होतं. म्हणून मग खरेदी त्याप्रमाणे झाली.

पहिल्या मावशींच्या बाबतीत फोनचा वापर मर्यादित होता. कॉल्स घेणं - करणं, कधीकाळी ईमेल्स, परदेशातल्या नातवंडांसोबत वीक-एन्डला स्काईप आणि लेकासोबत अधल्या-मधल्या चॅटिंगसाठी व्हॉट्स अ ॅप . इतका मर्यादित वापर असेल तर मग फोनही तसाच शोधायला हवा. वय हा देखील तुमचा फोन घेतानाचा महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकतो. म्हणून इथे आम्ही थोडा मोठा स्क्रीनवाला फोन घेतला. म्हणजे आयकॉन्स आणि फॉन्ट्स दिसायला - वाचायला टपटपीत. फोनचा इंटरफेस वापरायला सोपा हवा. वाय-फाय - ३जी कनेक्टिव्हिटी आणि निवडक अप्स डाऊनलोड करायला पुरेशी मेमरी स्पेस. ५ मेगापिक्सेलचा कॅमेराही पुरेसा. व्हिडिओज पाहणं, किंवा फार जास्त इंटरनेट सर्फिंग या फोनवरून होणार नव्हतं, म्हणून मग AMOLED किंवा Gorilla Glass स्क्रीनसाठी पैसे घालवण्यात अर्थ नाही.

347 mobils phone 34

दुसरी व्यक्ती होती नोकरी करणारी. ही व्यक्ती ब्लॅकबेरीवरून या नव्या टचफोनवर शिफ्ट होणार होती. सतत येणारे ईमेल्स, फोन कॉल्स, ऑन द गो चॅटिंग आणि मेसेजिंग, बाहेर जाताना लागणारं मॅप्स अप्लिकेशन, यूट्यूबचे व्हिडिओ पाहणं आणि डिसेंट कॅमेरा अशा इथे गरजा होत्या. फोनचा जास्तीत जास्त वापर इमेल्ससाठी होता. म्हणजे फोनचा प्रोसेसर आणि बॅटरीलाईफ चांगलं असायला हवं. व्हर्च्युअल कीपॅडचा वापर ईमेल्स टाईप करायला होणार म्हणजे तो किती वेल स्पेस्ड आहे तेदेखील महत्त्वाचं. म्हणजे त्यासाठी स्क्रीनसाईजही पुरेशी हवी.

तिसरी देखील नोकरी करणारी. ऑफिसमध्ये असतानाचे १०-१२ तास फोन तिच्या हातात आणि घरी आल्यावर तिच्या ३-४ वर्षांच्या लेकीच्या ताब्यात. इमेल्स कनेक्टिविटी हवीच. पण लेकीचे मूड्स टिपून ठेवण्यासाठी चांगला कॅमेरा हवा. शिवाय तिच्यासाठीची गाणी आणि इतर अप्लिकेशन्स आणि गेम्स डाऊनलोड करता यावेत म्हणून मग मेमरी स्पेसही महत्त्वाची. म्हणून फोन घेताना असा घेतला ज्याचा स्टिल कॅमेरा तर चांगला होताच पण ज्याने HD व्हिडिओजही शूट करता येतील. शिवाय लहान मुलाच्या हातात फोन असणार म्हणजे तो पडणं आलंच. म्हणून मग फोन घेताना असा घेतला की ज्याची बॉडी मजबूत असेल आणि पडण्याने बॅक कव्हरला लगेच तडा जाणार नाही.

फोन घेताना बजेटसोबतच या गोष्टीदेखील पाहणं महत्त्वाचं आहे. नुसतंच इम्प्रेस होऊन मोठी स्पेसिफेकेशन्स वाला फोन घेण्याऐवजी आपल्याला हवी तेवढ्या गोष्टी चांगल्यात चांगल्या पाहून घेणं महत्त्वाचं आहे. पहिल्याच फेरीत जाऊन फोन घेऊन येण्यापेक्षा एकदा मोठ्या स्टोअरमध्ये जाऊन आपल्याला आवडलेला फोन हाताळून पहा. कारण अनेकदा इंटरनेटवरचे व्हिडिओ आणि कागदावरची स्पेसिफेकेशन्स पाहून हातात घेतलेला फोन आपल्याला आवडत नाही. त्यामुळे फोन हाताळून पहा. टाईप करायला, धरायला जमतंय का ते पहा. कॅमेरा क्वालिटी चेक करा आणि मगच तुमचा फोन विकत घ्या

First published: February 9, 2014, 2:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading