काय झालं संमेलनात...

काय झालं संमेलनात...

  • Share this:

ketki joshiकेतकी जोशी,असोसिएट एडिटर, IBN लोकमत

87वं अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडलं. परिसंवाद, चर्चा संपल्या आणि मागे उरला तो फक्त वादाचा धुरळा...सासवडमध्ये भरलेल्या या संमेलनाला आधीपासूनच राजकीय झालर होती. फक्त संमेलनात ती जास्त ठळक झाली इतकीच. आपल्याच मतदारसंघात संमेलन भरवण्याचा अट्टहास, कोलतेंनी स्वत:हून स्वागताध्यक्षपदी जाहीर केलेलं आपलं नाव यांच्यासह संमेलनाच्या निधीबाबतच्या वादाबद्दलही हळूहळू चर्चा होत होती. पण या सगळ्यावर कडी केली ती साहित्य संमेलन सुरू झाल्यानंतर...

या संमेलनाकडून साहित्यप्रेमींच्या अगदी साध्या अपेक्षा होत्या. त्या तरी किमान पूर्ण झाल्यात का याचं उत्तर मात्र बऱ्याच अंशी नकारात्मकच आहे. सगळ्यात पहिली अपेक्षा होती ती म्हणजे संमेलनाध्यक्ष लोकप्रिय कवी फ.मुं शिंदे यांच्या भाषणाबद्दलची. आपण छापील भाषण वाचणार नाही, तर उत्स्फूर्तपणे मुक्तचिंतन करणार आहोत, असं फ.मुंनी आधीच जाहीर केलं होतं. त्यामुळेच काहीतरी चांगलं आणि वेगळं ऐकायला मिळेल अशी सगळ्यांचीच अपेक्षा होती. पण माननीय संमेलनाध्यक्षांनी मात्र अत्यंत बेताल आणि निरर्थक भाषण करून जमलेल्या  रसिकांची फक्त निराशाच केली. एक व्यक्ती म्हणून तुम्ही कसेही आणि कोणीही असा, पण अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या पदाचे पावित्र्य फ.मुंना राखता आलं नाही. त्यांच्या भाषणात ना चिंतन होतं ना विचार...होती ती फक्त एखाद्या सामान्य कवीची राजाश्रयाकरिता असलेली आणि तो मिळाल्यानंतर टिकवण्यासाठीची केविलवाणी धडपड...

sasawad samelan blog

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संमेलनाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडण्यात फ.मुं फक्त अयशस्वीच ठरले. कारण सामाजिक कार्यकर्ते आणि साधनाचे संपादक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या निषेधाबद्दल एक चकार शब्दही त्यांना काढावासा वाटला नाही. पुण्यामध्ये डॉ. दाभोलकरांचा खून झाला. त्यांचे मारेकरी सापडलेले नाहीत. याचा एक संवेदनशील व्यक्ती म्हणून तरी फ.मुंनी उल्लेख करायला हवा होता. पण तो तर झाला नाहीच. पण त्याबद्दल फ.मुंनी समारोपापर्यंत दिलगिरीही व्यक्त करावीशी वाटली नाही, ही त्याहूनही दुर्दैवी गोष्ट आहे. उद्घाटनानंतर जेव्हा भाषणाबद्दल मीडियानं प्रचंड आरडाअोरडा सुरू केला, तेव्हा फमुंना समारोपाच्या दिवशी भाषणाच्या सुरुवातीलाच डॉ. दाभोलकरांच्या खुनाच्या निषेधाचा मुद्दा उपस्थित करावा लागला. पण हे त्याहूनही वाईट होतं. ‘ माझे चळवळीतले जुने मित्र गमावल्याचं मला दु:ख आहे. तीनही दिवसांत जर मी बोललो नसतो तर वेगळी गोष्ट होती. पण मी डॉ. दाभोलकरांच्या खुनाचा निषेधच करतो’, असं म्हणत त्यांनी अत्यंत केविलवाणी सारवासारव केली. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी परिवर्तनवादी साहित्य, हा परिसंवाद डॉ. दाभोलकरांना अर्पण करण्याचं जाहीर करण्यात आलं. महामंडळाच्या डॉ. माधवी वैद्य सांगत असल्या की हे आम्ही आधीच ठरवलं होतं, तरी त्यांना हे उशिरा आलेलं शहाणपण आहे, हे न समजण्याइतके मराठी वाचक मूर्ख नक्कीच नाहीत. महामंडळाला डॉ. दाभोलकरांचा विसर पडलेला नाही आणि इतरांच्या भाषणावर माझं नियंत्रण नाही. इतर काय बोलणार हे मी कसं ठरवू, असं माधवी वैद्य मीडियाला सतत सांगत होत्या. प्रश्न इतकाच होता, इतर वक्त्यांच्या भाषणात उल्लेख आला नाही, तरी डॉ. माधवी वैद्य स्वत:च्या भाषणात तरी तो करू शकत होत्या ना?

ही गोष्ट नक्कीच खटकणारी आणि त्याहूनही मन विषण्ण करणारी आहे. उद्घाटनाच्या समारंभात व्यासपीठावर केवळ राजकीय गर्दी होती. रानकवी ना.धों. महानोर आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले सोडले तर साहित्याशी थेट संबंध असणारी एकही व्यक्ती उपस्थित नव्हती. राजकारण्यांनी साहित्य संमेलनात येऊच नये असं नाही, पण केवळ त्यांचीच गर्दी असेल, तर त्याला राजकीय मेळ्याचं स्वरूप येतं. सासवडला नेमकं हेच घडलं. त्यानंतरही जे परिसंवाद झाले त्यातले एकदोन वगळता, ज्यामध्ये सामान्य वाचकाला फारसा रस नसेल असेच विषय होते. कुमार केतकर यांची संतोष शेणई आणि शुभदा चौकर यांनी घेतलेली मुलाखत सोडली तर इतर परिसंवाद अक्षरश: केवळ वक्त्यांची हौस भागवण्यासाठी होते की काय अशी शंका येत होती. मराठी साहित्य आणि राजकीय घडामोडी या परिसंवादाकडून खूप अपेक्षा होत्या. पण तिथेही फारसं काही घडलंच नाही आणि एनडीचे पहिले मराठी अध्यक्ष वामन केंद्रे यांची शफाअत खान यांनी घेतलेली मुलाखतही रंगली नाही.

असं असलं तरी सासवडच्या या संमेलनात फक्त निराशाच होती असं नाही. उलट तिथे अनुभवायला मिळालं तरुणाईचं एक नवं रूप...आपल्या गावात साहित्य संमेलन भरतंय, म्हणजे नेमकं काय होतंय, या कुतूहलापोटी पहिल्या दिवशी येणारे आणि कविसंमेलन आवडलं म्हणून तीनही दिवस येणारे अनेक तरुण-तरुणी होते. या संमेलनाला खरी शोभा आणली ती सासवडच्या शाळा-कॉलेजमधल्या या नव्या पिढीच्या उत्साहादायी हजेरीनं आणि सहभागानं.. त्यामुळेच साहित्य संमेलनातून नेमकं त्यांना काय मिळायला हवं याचा विचार गांभीर्यानं करण्याची आता वेळ आलीय.

एक मात्र नक्की, संमेलनातल्या कविसंमेलनाला प्रत्येक वेळेस उत्स्फूर्त दाद मिळाली. पण साहित्य संमेलन म्हणजे फक्त कविसंमेलन किंवा साहित्य संमेलन म्हणजे फक्त राजकीय भाऊगर्दी इतकं समीकरण होणं हे धोकादायक आहे. साहित्य संमेलनातून तरुणांना त्यांच्या पिढीचे साहित्यिक मिळतात का, त्यांची किमान ओळख तरी होतेय का याचा विचार झाला पाहिजे. आधीच्या साहित्यिकांचं चांगलं, सकस साहित्य यानिमित्तानं त्यांच्यापर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. आपली भाषा, त्याचा अभिमान हे सगळं त्यांच्यापर्यंत रुजवता आलं पाहिजे. आपलं लोकसाहित्य, लोककला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी साहित्य संमेलन हे एक उत्तम व्यासपीठ बनवता आलं पाहिजे. पण खेदाची गोष्ट म्हणजे असं होताना दिसत नाही...अगदी मोजके साहित्यिक सोडले तर नवीन पिढीला आपल्या साहित्यिकांची साधी ओळखही नाही. अगदी साधी गोष्ट म्हणजे वाचायचं कसं आणि काय हे जरी आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवता आलं तरी खूप आहे. पण त्याऐवजी आपण काही चुकीचा आदर्श त्यांच्यापुढे ठेवतोय का याचा विचार आता साहित्य महामंडळाला आणि योजकांना करावाच लागणार आहे.akhil-bhartiya-sahitya-sammelan-2014

सासवडच्या या संमेलनात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तो ग्रंथनगरीला...ग्रंथप्रदर्शनाला... पहिल्या दिवसापासून आवर्जून फक्त सासवडच नाही, तर आसपासच्या गावांमधूनही लोकांनी पुस्तकं पाहायला आणि ती विकतही घ्यायला भरपूर गर्दी केली होती. हीसुद्धा एक सकारात्मक बाजू...

सगळ्यात शेवटी संमेलनाध्यक्षांनी केलेलं समारोपाचं भाषण म्हणजेही सामान्य भाषणाचा एक नमुना होता. वाट्टेल त्या कोट्या, उदाहरणं यांनी हे भाषण फक्त वाईटच नाही तर अत्यंत अपेक्षाभंग करणार ठरलं. संमेलनाध्यक्षांच्याच भाषणाचीच ही तऱ्हा तर इतरांची काय असतील. उद्धव ठाकरे, हर्षवर्धन पाटील किंवा पतंगराव कदम यापैकी कोणाचंही भाषण हे काहीही देणारं ठरलं नाही. उलट व्यासपीठावरच्या राजकीय गर्दीचं समर्थन करणारीच होती. समारोपाला छगन भुजबळ आणि आर.आर. पाटील आले नाहीत...उद्घाटनाच्या दिवशीची टीका पाहता ते का आले नाहीत याचीच चर्चा नंतर रंगली होती...

सासवडवासीयांनी खरोखरच हे संमेलन अत्यंत देखणं करण्याचा प्रयत्न केला. राज्यभरातून केवळ मराठी साहित्यप्रेमापोटी आलेले असंख्य लोक होते. तसंच गेली अनेक वर्षं पदरमोड करून संमेलनाला हजर राहणारेही अनेक होते. तीन दिवसांचा हा मेळा संपला. आता पुढच्या वर्षीचं संमेलन कुठं होईल, कसं होईल याची चर्चा सुरू झालीय.

सारस्वतांच्या या मेळ्यांतून मला तरी एक गोष्ट नक्की मिळाली. या संमेलनातून अनेक बिनचेहऱ्याचे असलेले आणि तरीही साहित्यावर मनापासून निस्वार्थी असलेले अनेक साहित्यप्रेमी आणि त्यांच्यासाठी किमान काहीतरी करण्याची जबाबदारीची जाणीव..

First Published: Jan 11, 2014 10:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading