S M L

नवं वर्ष बदलाची दिशा दाखवणारं !

Sachin Salve | Updated On: Jan 1, 2014 09:20 PM IST

नवं वर्ष बदलाची दिशा दाखवणारं !

rajendra hunje IBN Lokmat

राजेंद्र हुंजे, डेप्युटी न्यूज एडिटर, आयबीएन लोकमत

चला नवीन वर्ष सुरू झालं...गेल्या वर्षात अनेक गोष्टी मनाविरुद्ध घडल्या असतील, किंबहुना त्या घडलेल्या गोष्टीतून बरंच काही प्रशासनापासून ते सर्वसामान्यांपर्यंत खूप काही शिकायला मिळालं. एवढंच नाही तर राजकारणातही मोठे बदल घडत असताना, त्यात झालेली उलथापालथही पाहायला मिळाली. कदाचित या वर्षात येणार्‍या निवडणुका हे राजकारणातल्या बदलाचं कारण असू शकतं. आम आदमी पार्टीचं सरकार आल्यानं आता सर्वसामान्यांच्या मनातल्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काय होतं या वर्षात हे पाहणंच मात्र मोठं औत्सुक्याचं असणार आहे.


थोडंसं गेल्या वर्षातल्या गोष्टींचा मागोवा घेतला, तर प्रत्येक टप्प्यावर अशा काही घडामोडी घडल्या की त्याचा विचार सर्वांनाच करावा लागला. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, सामाजिक स्थित्यंतराचा मुद्दा असेल, दुष्काळानं होरपळून निघालेल्या विविध प्रदेशातल्या जनतेचा आक्रोश असेल. एवढंच नाही, तर वर्ष सरताना झालेल्या निवडणुकांमुळे राजकीय पक्षांचा बदलत असलेला चेहरामोहरा असेल. या सगळ्याच घडामोडी नव्या वर्षात आपल्याला काहीतरी नवं करायला लावणार्‍या आहेत. त्याहीपेक्षा समाज बदलतोय हे द्योतक मानायला हवं असं सांगणारं 2013 हे वर्ष होतं. त्यातूनच आता नवे अनेक बदल होताना आपल्याला पाहायला मिळतील.

अण्णांच्या लोकपालच्या आंदोलनामुळे देशाला पुन्हा एकदा एक नवी संजीवनी मिळाली, असं म्हणायला हरकत नाही. त्याच्या श्रेयाची लढाई मात्र काँग्रेसमध्ये सुरू झाली. कदाचित चार राज्यांच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानं धसका घेतलेल्या काँग्रेसनं हे आमच्या सरकारनंच केलं असं सांगणं अगदी स्वाभाविक होतं. तरीदेखील त्याच मुद्द्याचा आधार घेत संसदेत हे विधेयक संमत होत असताना भाजपनं मात्र याचं श्रेय अण्णांशिवाय दुसर्‍याला जाऊच शकत नाही, असं सांगतच, त्यापूर्वी पहिल्यांदा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी हे विधेयक संसदेत सादर केलं होतं, असंही म्हटलं. म्हणजे यातून हे स्पष्ट दिसत होतं की, दोन्ही पक्षांची लोकसभेची लढाई सुरू झालीय आणि त्याच मुद्द्याला धरून गेल्या अडीच वर्षांपूर्वी आपल्या राजकारणाला सुरुवात केलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीनं सत्ताधारी आणि विरोधकांच्या मनसुब्यांना चारी मुंड्या चीत करत नव्या बदलणार्‍या राजकारणाची सुरुवात झालीय याची जाणीव  देशातल्या सगळ्याच राजकीय पक्षांना करून दिली.

Loading...

Arvind Kejriwal

महाराष्ट्रातही वेगानं बदलणारी राजकीय परिस्थिती पाहायला मिळतेय. आदर्श प्रकरणामुळे कोंडीत सापडलेले मुख्यमंत्री आणि त्यानंतर राष्ट्रवादीची काँग्रेसवर सुरू असलेली कुरघोडी पाहता राज्यातही बदलाचे वारे वाहतील का? अशा परिस्थितीची जाणीव करून देणारा हा काळ आहे. ज्या पद्धतीनं आम आदमी पार्टीनं दिल्लीत यश मिळवलं, त्याचा परिणाम आता इतर राज्यांतही दिसू लागला आहे. तिथल्या सरकारला लोकहिताचे निर्णय घेणं भाग पडू लागलंय. नव्या वर्षात येणारी बदलाची ही नवी दिशा ठरावी.

ajit pawar and cm

समाज बदलतोय, लोक बदलताहेत, राजकारण बदलू पाहतंय. जोपर्यंत हा बदल तळागाळापर्यंत जाणार नाही, तोपर्यंत बदलणारं जग आपल्याला दिसणार नाही. आशा करूया वेगानं धावणार्‍या जगाला गेल्या वर्षांत काही आर्थिक पडझडीच्या काळामुळे थोडासा वेग कमी करून मंदीच्या गर्तेत जावं लागलं होतं. पण कदाचित या सगळ्या आव्हानांवर मात करून हे नववर्ष आपल्याला याही पलीकडे घेऊन जाईल आणि नव्या वर्षाच्या सोबतीनं आपल्यापर्यंत पोहोचलेली सूर्यकिरणं आपल्या यापुढच्या 364 दिवसांत बदलणार्‍या घडामोडींसह प्रकाशाचा नवा झोत घेऊन येतील, अशी आशा बाळगायला हरकत नाही. नवीन वर्षाचा नवा संकल्प सोडा, नव्या बदलाचा, नव्या आकांक्षांचा, नव्या विचारांचा, नव्या प्रेरणेचा... नवीन वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !!!

-

Follow on Twitter : @RajendraHunje

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 1, 2014 09:19 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close