S M L

इफी २०१३ - द पास्ट : वर्तमानाचा सामना करताना...

Samruddha Bhambure | Updated On: Dec 24, 2013 04:27 PM IST

meena_karnik_blogमीना कर्णिक, चित्रपट समीक्षक

असगर फरहादी या इराणी दिग्दर्शकाच्या अ सेपरेशन या सिनेमाने दोन वर्षांपूर्वी सर्वोत्कृष्ट परदेशी सिनेमासाठीचं ऑस्कर पारितोषिक मिळवलं असल्यामुळे आणि जगभरच्या महोत्सवांमध्ये पुरस्कार तसंच प्रेक्षकांकडून वाहवा मिळवलेली असल्याने या वर्षीच्या इफीमध्ये सगळ्यांनाच त्यांच्या द पास्ट या नवीन सिनेमाविषयी उत्सुकता होती. आणि द पास्टने अजिबात निराशा केली नाही.नुकताच विमानातून उतरून तो बाहेर पडतोय. बाहेर, काचेच्या पलीकडे ती त्याला पाहते, हाक मारते. अर्थातच त्याला ती ऐकू जात नाही. एक मुलगी त्याचं लक्ष तिच्याकडे वेधते. तो तिच्या जवळ येतो. अजूनही ती काचेच्या पलीकडेच. तो काहीतरी बोलतो. तिला ऐकू येत नाही. ती काहीतरी म्हणते. त्याला समजत नाही. दोघेही एकमेकांकडे बघून हसतात आणि तो बाहेर पडायच्या दिशेने चालू लागतो...


सिनेमाचं पहिलंच दृश्य प्रेक्षक म्हणून आपली उत्सुकता चाळवतं. काय नातं आहे दोघांमध्ये? ती त्याची एवढ्या उत्सुकतेने का वाट पाहतेय? खूप वर्षांनी भेटताहेत का हे दोघे? काही क्षणांत निर्माण होणार्‍या मनातल्या प्रश्‍नांना इराणी दिग्दर्शक असगर फरहादी यांचा द पास्ट हळूहळू उत्तरं देऊ लागतो. ते करताना आणखी प्रश्‍न निर्माण करतो. प्रत्येक टप्प्यावर आता आपल्याला सगळं समजलं असं वाटू लागलेलं असतानाच नवीन धक्का देतो. थोडासा मेलोड्रामा, थोडीशी कलाकुसर, थोडा बेरकीपणा या सगळ्यांचा दिग्दर्शक म्हणून वापर करून आपल्यासमोर एक खणखणीत अनुभव सादर करतो.

Loading...

फरहादींचा या आधीचा अ सेपरेशन हा सिनेमा इराणमध्ये घडतो. त्यातली दोन्ही जोडपी ही इराणी आहेत. वेगवेगळ्या सामाजिक स्तरातली असली तरी त्यांचा भोवताल एक आहे. इथे, या सिनेमात गोष्ट घडते फ्रान्समध्ये. आणि सिनेमाचं नाव जरी द पास्ट असं असलं तरी ती भूतकाळाविषयी बोलत नाही. आपल्यासमोर पडद्यावर जे घडतं ते वर्तमानातच घडतं. पण त्यावर सतत भूतकाळाची गडद सावली असते. याही सिनेमाचा शेवट मात्र खास फरहादींच्या स्टाईलचा आहे. अ सेपरेशनशी नातं सांगणारा.

नायिका मारी ही फ्रेंच आहे. विमानतळावर ती न्यायला आलीय आपल्या इराणी नवर्‍याला, अहमदला. दोघे आता एकमेकांपासून दूर झाले आहेत. चार वर्षांनी भेटताहेत. या भेटीला कारणही आहे. मारीला  अहमदपासून घटस्फोट घ्यायचाय. खरं तर हे काम अहमदचा वकील करू शकतो, पण तरीही अहमद तेवढ्यासाठी पॅरिसला आलाय. कारण त्यालाही या नात्याचा शेवट चांगल्या पद्धतीने करायचाय. कोणतीही कटुता न येता. गाडीत बसल्यावर त्याला समजतं की मारीने आपली व्यवस्था हॉटेलमध्ये केलेली नाही, तर आपल्या घरातच केली आहे. अहमद किंचित अवघडतो. मारीच्या मुलींची चौकशी करतो. त्यांच्या संवादांमधून लक्षात येतं की या दोन मुली अहमदच्या नाहीत, त्या मारीच्या पहिल्या नवर्‍याच्या आहेत. पण त्यांना अहमदचा खूप लळा आहे. नंतर अहमदबरोबरच आपल्यालाही कळतं की मारीला समीर नावाच्या एका पुरुषाशी लग्न करायचंय आणि म्हणून हा घटस्फोट होणं तिच्यासाठी आवश्यक आहे. समीरलाही एक मुलगा आहे, मारीच्या लहान मुलीच्याच वयाचा. या दोघांचं चांगलं जमतंय. समीरची बायको आत्महत्येचा प्रयत्न करताना वाचलीय पण सध्या कोमामध्ये आहे. आणि मारीच्या मोठ्या मुलीला, ल्युसीला आईचं हे वागणं अजिबात पसंत नाही. किंबहुना, त्यामुळेच ती आईशी अत्यंत तुटकपणे वागू लागलीय आणि अहमदने तिला चार समजुतीचे शब्द सांगावेत अशी मारीची अपेक्षा आहे.

संपूर्ण गोष्ट या पात्रांच्या भोवती फिरते. प्रत्येकाची बाजू सांगते. ती पटली असं वाटेपर्यंत दुसर्‍याची बाजू समोर येते. याची उदाहरणं देता येतील पण त्यामुळे सिनेमाविषयीचं कुतूहल मारलं जाईल. पण एक नक्की, हा सिनेमा एखाद्या कांद्यासारखा उलगडत जातो. एक थर उलगडला की दुसरा सापडतो. त्याच्या आत शिरू लागलं आणि  तो संपला असं वाटलं की तिसरा थर मिळतो. प्रत्येक वेळी दिग्दर्शक आपले स्टेक्स उंचावतो. प्रेक्षकाला अधिकाधिक बांधून ठेवतो.

पटकथा कशी असावी याचं हा सिनेमा म्हणजे उत्तम उदाहरण म्हणता येईल. नाट्य कसं घडवावं याचंही. काही वेळा ते मुद्दाम निर्माण केल्यासारखं वाटतं, नाही असं नाही, पण त्यामुळे प्रेक्षक म्हणून येणार्‍या अनुभवात काही बाधा येत नसेल तर काय हरकत आहे असंही वाटतं. आणि हेच दिग्दर्शकाचं यश म्हणायला हवं. यातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेला स्वत:ची अशी बाजू आहे. अगदी परस्परविरोधी भूमिका मांडणार्‍यांनाही आहे आणि ती पटणारी आहे. त्यामुळेच त्या व्यक्तिरेखा आणि त्यांचं परस्पर नातं अगदी लॉजिकच्या लेव्हलवरही खरं वाटतं. ओढूनताणून काहीच नाही. उदाहरणार्थ, अहमद आणि समीरचा मुलगा यांच्यातले संवाद. अहमद आणि समीर एकमेकांसमोर येतात तेव्हा त्यांच्यातली केमिस्ट्री. अहमद आणि ल्युसी यांच्यातला जिव्हाळा. आणि अर्थातच अहमद आणि मारी यांच्या नात्यातला हळुवारपणा. त्यांच्यातले तंटे. एकमेकांना मॅन्युप्युलेट करण्याचा प्रयत्न. दुष्ट म्हणून नव्हे, आपल्या रोजच्या आयुष्यात आपणही सतत ते करतच असतो, याची जाणीव करून देणारा.

सिनेमा आपण पाहतो तो मुख्यत: अहमदच्या नजरेतून. त्याला जसजशा घटना कळू लागतात तेव्हाच त्या आपल्याला कळतात. अहमद म्हणजे मोडलेल्या गोष्टी दुरुस्त करणारा माणूस आहे. घरी आल्यावरही तो अंगणात खेळणार्‍या मुलांना त्यांची सायकल दुरुस्त करून देतो, स्वैपाकघरातला नळ नीट करतो, घरात सांडलेला रंग साफ करतो, इतकंच नाही तर माणसांमधली नाती दुरुस्त करण्याचाही प्रयत्न करतो. ल्युसीची समजूत काढण्याचा प्रयत्न करणं, मारीला समजून घेणं, सगळ्यांबरोबर समीरच्या मुलासाठीही प्रेझेंट आणणं, समीरविषयी सहानुभूती बाळगणं... सुरुवातीपासून एक प्रगल्भ व्यक्ती म्हणून तोे आपल्यासमोर येत असतो. मग मध्येच कळतं की पॅरिसला मारीबरोबर राहत असताना त्यानेही कधीतरी आत्महत्येचा प्रयत्न केलाय. एका प्रसंगात तो मारीला म्हणतो, आपण एकत्र असताना घडलेलं काहीतरी मला तुला सांगायचंय. त्याच्या दृष्टीने बहुधा त्यातूनच या नात्याला पूर्णविराम मिळणार असावा. पण मारी त्याला थांबवते. काहीच सांगू नकोस म्हणते. त्यामुळे आपल्यालाही ते समजत नाही. मात्र अहमदचाही एक भूतकाळ आहे याची जाणीव होते. तसा तर तो आपल्या सगळ्यांचाच असतो. या भूतकाळापासून पूर्णपणे फारकत घेता येते का? भूतकाळाला सामाेरं जाऊन, तेव्हाचे काही निसटलेले धागे गाठी मारून बंद करून टाकू असं आपण म्हणतो खरं, पण त्या धाग्यांबरोबर नवे धागेही हाती येतात त्याचं काय? त्यांना गाठी मारता मारता आणखी नवे धागे... मग, आता नव्याने आयुष्याला सुरुवात करू असं म्हटल्याने भूतकाळ थोडाच संपून जातो? आयुष्यातल्या अशा अनेक प्रश्‍नांचा सामना द पास्ट आपल्याला करायला लावतो. आणि मग सिनेमामधलाच एक प्रसंग समोर येतो. पॅरिसला आल्यावर अहमद आपल्या जुन्या मित्राच्या रेस्टॉरंटमध्ये त्याला भेटायला जातो. आणि बोलता बोलता मित्र त्याला म्हणतो, फार अडकू नकोस इथे, यू मस्ट लर्न टू कट्!

शेवटी, असं कट्! म्हणणं जमायला हवं हेच खरं का?

==============================================================

इराणमधलं वातावरण बदलू लागलंय - असगर फरहादी

==============================================================

आॅक्टोबर महिन्यात असगर फरहादी मुंबईच्या चित्रपट महोत्सवासाठी ज्युरी म्हणून आलेले होते. त्यावेळी त्यांच्याशी इंडिवायर या वेबसाईटने बातचीत केली होती. त्यातलीच ही काही प्रश्‍नोत्तरं-

प्रश्‍न: 'अ सेपरेशन' हा जागतिक स्तरावर हिट झालेला सिनेमा आहे. द पास्टवर काम करताना त्या यशाचा काही परिणाम झाला? आपल्याविषयीच्या अपेक्षांचं ओझं वाटत होतं?

उत्तर: सुदैवाने नाही. कारण 'अ सेपरेशन' प्रदर्शित होण्याआधीच मी द पास्टच्या लेखनाला सुरुवात केली होती.  त्यामुळे अ सेपरेशनच्या यशामध्ये आणि पुरस्कारांमध्ये मी फार गुंतलो नाही. मला वाटतं, हे पुरस्कार सर्वसाधारणपणे चांगले असले, तरी फिल्ममेकरसाठी धोकादायक असतात.

प्रश्‍न: 'द पास्ट'मध्ये अनेक दृष्यांमध्ये खिडक्या आणि काचा खूप ठळकपणे दिसतात जिथे व्यक्तिरेखांना दुसर्‍या बाजूला असलेल्याचं बोलणं ऐकू येत नाही. यामागे काय भूमिका आहे?

उत्तर: माझ्या इतरही सिनेमांमध्ये हे अशा प्रकारचं स्टेजिंग तुम्हाला आढळेल. पण 'द पास्ट'मध्ये मी त्याबाबत जास्त काळजी घेतली आहे. उदाहरणार्थ, सिनेमातलं पहिलंच दृष्य. काचेच्या पलीकडून दोघे एकमेकांशी बोलतात पण त्यांना ते ऐकू येत नाही. माणसं एकमेकांशी बोलतात पण ती एकमेकांना समजू शकत नाहीत. सिनेमाची ही सुरुवात पुढे काय घडणार त्याची एक प्रकारे नांदी आहे. खिडक्या आणखी एक काम करतात. खिडकीच्या पलीकडून तुम्ही लोकांना पाहत असता तेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचणं अशक्य असतं. एकाच काळात, एकाच चौकटीत ही माणसं असतात, जवळ असतात पण तरीही एकमेकांपासून दूर असतात. अ सेपरेशनमध्येही हे होतं.

प्रश्‍न: तुमच्या सिनेमांमध्ये कोणीही माणूस वाईट नसतो. किंबहुना, ही माणसं चांगलीच असतात, त्यांचे निर्णय चुकीचे असतात. 'द पास्ट'सारखी गोष्ट लिहीत असताना असा सगळ्यांना सारखा दोष देणं गोष्टीच्या वेगाला बाधा आणतं की आपोआप ते घडतं?

उत्तर: प्रत्येक वेळी लिहीत असताना मी छोट्या छाेट्या तपशीलांवर खूप काम करतो, तेही अशा पद्धतीने की सिनेमा पाहताना प्रेक्षकांना ते थेट कळणार नाही पण त्यांच्यावर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम होईल. सर्वसाधारणपणे प्रेक्षक यामुळे कंटाळत नाहीत. पूर्ण सिनेमा बघितल्यानंतर त्यांच्यावर या तपशीलांचा परिणाम होतो. मात्र, मी केलेले इतर सिनेमे ज्यांनी बघितलेले आहेत ते अधिक काळजीपूर्वक पुढचा सिनेमा पाहत असतात. त्यांना हे तपशील कळतात. भविष्यात, मला यासाठी वेगळे मार्ग शोधायला हवेत.

प्रश्‍न: ऑस्करसाठी इराणचा अधिकृत सिनेमा म्हणून 'द पास्ट'ची घोषणा झाली तेव्हा तुमच्या देशातल्या काहींनी या सिनेमात इराणी काही नाही अशी टीका केली. याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? हा सिनेमा इराणी आहे असं तुम्हाला वाटतं का?

उत्तर: मला वाटतं, 'द पास्ट' हा सिनेमा एका इराणी दिग्दर्शकाचा, म्हणजे माझा आहे. पण होय, मी हा सिनेमा दुसर्‍या देशात बनवलाय. आणि मला वाटतं, शेवटी सिनेमा काय आणि कसा आहे एवढंच महत्त्वाचं असावं.

प्रश्‍न: गेल्या वर्षी इराणने ऑस्करसाठी एन्ट्री पाठवली नव्हती. निषेध म्हणून. त्याआधीच्या वर्षी अ सेपरेशनसाठी पुरस्कार मिळालेला असतानाही. या विषयी तुम्हाला काय म्हणायचंय?

उत्तर: द इनोसन्स ऑफ मुस्लीम्सविषयी असलेली नाराजी हे त्यामागचं कारण असल्याचं इराण सरकारने सांगितलं होतं. ('द इनोसन्स ऑफ मुस्लीम्स' हा इस्लामविरोधी सिनेमा होता. यू ट्युबवर सिनेमाचं ट्रेलर अपलोड झाल्यानंतर अनेक इस्लामी राष्ट्रांमध्ये आणि मुसलमानांमध्ये निषेधाची तीव्र लाट उसळली. सिनेमामधल्या सर्व कलावंतांनी आपल्या संमतीशिवाय, शूटिंगनंतर डबिंगच्या वेळी हे करण्यात आलं असं सांगून आता या सिनेमाशी आपला कोणताही संबंध नाही असं जाहीर केलं होतं.) माझ्या मते हा निर्णय योग्य नव्हता. मला वाटतं कोणत्याही देशाने अशा संधीचा उपयोग करायला हवा. नाही केला तर ते तुमच्या देशाच्या विरोधात जातं. केवळ तेवढ्यासाठी मला हा निर्णय पटला नाही.

प्रश्‍न: इराणचं नवीन सरकार अधिक मोकळं आहे आणि देशातलं वातावरण हळूहळू बदलतंय असं दिसू लागलंय. तुम्हाला काय वाटतं?

उत्तर: इराणमध्ये आजच्या घडीला जे घडतंय त्याबाबत मी खूप आशावादी आहे. अगदी थोड्या वेळात नव्या सरकारने अनेक चांगल्या गोष्टी केल्या आहेत.

प्रश्‍न: मग आता तुम्ही पुन्हा एकदा इराणमध्ये सिनेमा करणार का?

उत्तर: माझा सिनेमा कुठे करायचा हे मी सहसा ठरवत नाही. मी ज्या गोष्टी लिहितो त्या माझ्यासाठी हे ठरवत असतात. इराणमध्ये सिनेमा करायला मला आवडतं, पण अचानक माझ्या मनात एखादी गोष्ट आली जी दुसर्‍या देशात घडते तर मी त्या देशात जाऊन तो सिनेमा करेन.

प्रश्‍न: अलीकडच्या काळात तुम्ही बरेचदा लॉस एन्जलीसला गेलात, तिथल्या लोकांशी तुमचा संवाद चालू आहे. अमेरिकन चित्रपट उद्योगाविषयी तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तिथे काम कराल असं वाटतंय तुम्हाला?

उत्तर: आजच्या घडीला यूएसमध्ये दोन प्रकारचे चित्रपट उद्योग आहेत. एक आहे हॉलीवूड ज्यावर कंपन्या आणि स्टुडिओज यांचं वर्चस्व आहे. आणि दुसरा आहे इंडिसिनेमा. मला वाटतं, जर एक दिवस मी तिथे काम करायला गेलो तर इंडिपेंडंट सिनेमासाठी मी काम करेन.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 24, 2013 02:11 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close