त्या दोघी

त्या दोघी

  • Share this:

ketkiकेतकी जोशी,असोसिएट एडिटर, IBN लोकमत

त्या दोघी... दूरदूरहून पण त्यांचा एकमेकींशी संबंध नाही... पण तरीही दोघी एकाच नाळेनं जोडल्या गेलेल्या... स्वप्नांच्या, आशेच्या, उज्ज्वल भवितव्याच्या... त्यातली एकजण आपल्याला आता माहिती झालेली तर दुसरीची ओळख पुस्तकं आणि चित्रपटांतून झालेली... मलाला युसूफझाई आणि ऍन फ्रँक... मलालाचा लढा जगासमोर आला आणि तीव्रतेनं आठवण झाली ती ऍन फ्रँकची... या दोघींमधलं महत्त्वाचं साम्य म्हणजे त्या ज्यातून व्यक्त झाल्यात, त्या त्यांच्या डायर्‍या...

ऍन फ्रँकनं डायरी लिहायला सुरुवात केली ते दिवस होते, दुसर्‍या महायुद्धाचे... हिटलरच्या अनन्वित अत्याचारांना कंटाळून जीव वाचवण्यासाठी ऍन फ्रँकच्या कुटुंबीयांसारखे अनेकजण गुप्तनिवासात राहायचे. याच गुप्तनिवासात थोडीथोडकी नाही तर तब्बल दोन ते अडीच वर्षं ऍननं काढली. या काळात तिची जिवाभावाची मैत्रीण ठरली ती तिची डायरी, किट्टी... या किट्टीला उद्देशून ऍननं बरंच काही लिहिलं... ज्यूंवरचे अत्याचार, दुसर्‍या महायुद्ध काळातली राजकीय, सामाजिक परिस्थिती, तिचं तिच्या कुटुंबाशी असलेलं नातं, गुप्तनिवासातलं दुसरं कुटुंब आणि त्यांच्याशी नातं... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिची स्वप्नं... नाझींचे अत्याचार सहन करूनही तिचा माणुसकीवर असलेला विश्वास.. हीच गोष्ट मलालाच्या डायरीतूनही पुढे येते. तालिबान्यांनी केलेले अत्याचार सहन करूनही मला शिकायचंय, शिक्षण माझा हक्क आहे असं म्हणणार्‍या मलालाचाही माणुसकीवरचा विश्वास अबाधित आहे.

मलाला पाकिस्तानच्या छोट्याशा स्वात प्रांतातली... बीबीसी रेडिओसाठी गुल मकाई या नावानं तिनं डायरी लिहिली. या डायरीत स्वात प्रांतातली परिस्थिती, तालिबान्यांचे अत्याचार तर होते, पण त्याशिवाय होती ती तिची स्वप्नं... तिच्या शाळेबद्दलची... 13 वर्षांच्या मलालाची स्वप्नं ही तिच्यापुरतीच मर्यादित नाहीत. तिच्याएवढ्या शाळा शिकण्याची इच्छा असणार्‍या अनेकांच्या मनात तिनं ही स्वप्नं पेरली... मलालावर जीवघेणा हल्ला झाला आणि मग तर तिची स्वप्नं आणखीनच प्रबळ झाली...तिच्यासारख्या अनेक मलालांमध्ये तिनं आत्मविश्वास पेरण्याचं महत्त्वाचं काम केलं...

ऍन फ्रँक हॉलंड या छोट्याशा देशातली, दुसर्‍या महायुद्धाच्या काळातली... नाझींचे अत्याचार, अमानुषता आणि त्यामुळे सामान्य लोकांना सहन कराव्या लागणार्‍या यातना... हे सगळं काही तिच्या डायरीतून समोर आलं. पौगंडावस्थेतल्या ऍननं हे सगळं तिच्या नजरेतून मांडलं. त्यामुळेच ते जसंच्या तसं आपल्याला दिसलं. तिला स्वप्नं पाहायची होती पण तशी परिस्थिती नव्हती, तरीही तिनं आशा सोडली नाही...आज ना उद्या ही परिस्थिती बदलेल असा दुर्दम्य आशावाद तिच्या मनात होता. इतकं सगळं असूनही तिचा माणसांवर, त्यांच्या माणुसकीवर विश्वास होता...

हाच विश्‍वास मलालाच्या डायरीतूनही दिसतो. या दोघी एकाच वयाच्या... उमलत्या वयातल्या... या वयात मुलींना खरं तर स्वप्नं पडतात ती वेगळीच... पण या दोघींनी स्वप्नं पाहिली ती उद्याच्या भवितव्याची... फक्त त्यांच्यापुरतीच नाहीत... त्यांच्यात फरक आहेच... ऍनच्या डायरीत तिच्यासोबत राहणार्‍या कुटुंबाचं, तिच्या मित्र-मैत्रिणींचं वर्णनही आलंय. तसंच तिच्या वयानुसार तिच्या मनातल्या प्रेमाची भावनाही आलेली आहे. जे मलालाच्या डायरीत नाही. या दोघींमधलं आणखी एक महत्त्वाचं साम्य म्हणजे त्यांचं आपल्या वडिलांशी असलेलं नातं... पौगंडावस्थेतून जाताना ऍनचं आपल्या वडिलांशी असलेलं आणखीनच गहिरं होत जातं... तर मलालाला धैर्यानं प्रत्येक गोष्टीला सामोरं जाण्याचं धैर्य तिचे वडीलच देतात. प्रत्येक गोष्टीत या दोघीही जणी आपल्या वडिलांशी चर्चा करतात. त्यांच्या वडिलांनाही आपल्या मुली सामान्य नाहीत याची जाणीव आहे. त्यामुळेच त्यांना सामान्य मुलींसारखं त्यांनी वागवलेलं नाहीये. प्रत्येक गोष्टीत त्यांचे वडीलच त्यांचा आदर्श आहे, त्यामुळेच या दोघींच्याही डायरीतून बाप-मुलीचं सुंदर नातंही आपल्यासमोर येतं...

खूप कमी वयात मृत्यू इतक्या जवळून पाहिल्यामुळे या दोघींमधली प्रगल्भता सतत जाणवत राहतेच... पण त्यातही टिकून राहिलेली त्यांची निरागसता आणि स्वप्नं पाहण्याची आणि ती खरी होतील याबद्दलची त्यांची जिद्द हे जास्त स्पर्शून जातं...म्हणूनच सलाम करावासा वाटतो या दोघींना त्यांच्या धैर्यासाठी, त्यांच्या माणुसकीसाठी आणि त्यांच्या स्वप्नांसाठीही...

First published: December 1, 2013, 1:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading