छोट्या मलालाची मोठी गोष्ट !

छोट्या मलालाची मोठी गोष्ट !

  • Share this:

jatin_desai_150x150-जतीन देसाई पत्रकार आणि पाकिस्तानातील राजकीय घडामोडींचे विश्लेषक

'मी आहे मलाला. माझी दुनिया बदलली आहे, पण मी नाही. 'मलालाचं आत्मचरित्र 'आय एम मलाला'(I AM MALALA) या पुस्तकाचं हे शेवटचं वाक्य. मलाला युसूफझाईचं मौन आता जगभरात पोहोचलं आहे. पाकिस्तानची ही बहादूर मुलगी गेल्या वर्षी 9 ऑक्टोबर रोजी स्वात खोर्‍यातील भिगोरा शहरात शाळेतून परतताना तालिबानी दहशतवाद्यांनी तिच्यावर गोळ्या चालवल्या. प्रचंड इच्छाशक्ती आणि चांगल्या औषधोपचारामुळे मलाला जगली. मलालाचं जगणं जगासाठी आवश्यक होतं. पाकिस्तानातीलच नव्हे तर जगभरातील मुलींना शिक्षण मिळावं, यासाठी चालणार्‍या आंदोलनाला मलालानं एक शक्ती दिली. 16 वर्षांच्या मलालाचं जीवन इतरांना प्रेरणादायक आहे. मलालाला शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळाला असता तर पुरस्काराची उंची वाढली असती आणि त्यासोबत मुलींच्या शिक्षणाला आणि महिला सक्षमीकरणाला जास्त बळ मिळालं असतं.

मलालाचं आत्मचरित्र म्हणजे मलालाचा जीवनसंघर्ष, अत्यंत सोप्या भाषेत लिहिण्यात आलेलं हे पुस्तक वाचकांसमोर स्वात खोर्‍यातील चित्र उभं ठरतं. अतिशय सुंदर अशा स्वात खोर्‍यात दहशतवादाची सुरुवात 2001 साली अमेरिकेनं अफगाणिस्तानवर केलेल्या आक्रमणानंतर झाली. स्वात खोरं अफगाणिस्तानच्या जवळ. सरहद्दीच्या दोन्ही बाजूंना पख्तुनांची वस्ती. पख्तुन म्हणजे पठाण. मलालादेखील पख्तुन. या समाजाची एकूण जीवनपद्धती पख्तुनवलीप्रमाणे चालते. अनेक वर्षांपासून पख्तुनवलीप्रमाणे लोक वागतात. येणार्‍या पाहुण्यांचं संरक्षण करणं, हा त्यातला एक भाग.

PAKISTAN-BRITAIN-CHILDREN-EDUCATION

मुलगी जन्माला आली की, पख्तुन समाजात तिला महत्त्व दिलं जात नाही. मलालाचे वडील मात्र त्याला अपवाद होते. मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण या समाजात खूप कमी आहे. मलाला हे नाव तिच्या वडिलांनी विचारपूर्वक ठेवलं होतं. पख्तुन आणि अफगाणिस्तानच्या इतिहासात माईवंडची मालालाई प्रसिद्ध आहे. मालालाईच्या शौर्‍याच्या अनेक कहाण्या आहेत. कंदहारच्या जवळ असलेल्या माईवंड इथं एका मेंढ्याकच्या घरी मालालाईचा जन्म झाला होता. तिचे वडील आणि ज्याच्याशी तिचं लग्न होणार होतं ते दोघंही ब्रिटिशांच्या विरोधात लढत होते. मालालाई लढणार्‍या अफगाणिस्तानांसाठी पाणी इत्यादी रणमैदानात घेऊन जायची. ज्याच्याशी तिचं लग्न होणार होतं तो मारला गेल्यानंतर आपला पांढरा बुरखा झुगारून देऊन ती रणमैदानात धावली. तिचा रणमैदानात मृत्यू झाला, पण तिनं अफगाणी जनतेला स्फूर्ती दिली. अफगाणांचा शेवटी विजय झाला. हौतात्म्य पत्करून मालालाईनं अफगाणिस्तानला वाचवलं.

आपल्या नावाप्रमाणे मालालानं मुलींच्या शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला. वडील झियाउद्दीननी भिगोटा इथं शाळा सुरू केली. मुलींची शाळा त्यांनी बंद करावी यासाठी त्यांच्यावर सतत दबाव येत होते. पण कुठल्याही दबावाला ते बळी पडले नाहीत. आपण लहान आणि मुलगी असल्यामुळे तालिबान आपल्यावर हल्ला करणार नाहीत पण ते आपल्या वडिलांवर करतील, अशी भीती मलालाला सतत वाटायची. पण झालं नेमकं उलट. तालिबाननं मलालावरच हल्ला केला. त्यापूर्वी मलाला पाकिस्तानात सतत प्रसिद्धीत असायची. शिक्षणाची आवड आणि मुलींना शिक्षण मिळावं यासाठी तिने मोहीमच आखली होती. तिच्या आईला प्रसिद्धीची भीती वाटायची, पण मलाला आणि तिचे वडील मात्र वेगळे होते.

तालिबानच्या दहशतीतील जीवन यावर मलालानं बीबीसीच्या उर्दू वेबसाईटवर गुल मकाईच्या नावानं लिहायला सुरुवात केली. पख्तुनांच्या इतिहासात गुल मकाई नावाची एक महिला येऊन गेली. शाळेतच मुसा खान नावाच्या एका विद्यार्थ्याच्या प्रेमात ती पडली. पण दोन्ही वेगवेगळ्या जमातीतील होते आणि त्यामुळे दोन्ही जमातीत युद्धाची सुरुवात झाली. पण गुल मकाईनं कुराणचा आधार घेत वरिष्ठांना हे वाईट असल्याचं समजावलं आणि शेवटी गुल आणि मुसा खानचा निकाह झाला. मलालानं गुल मकाई नाव पसंत केलं. गुल मकाईची ही डायरी जगभर लोकप्रिय झाली. तालिबानच्या हे लक्षात आलं की गुल मकाई म्हणजेच मलाला.

आपल्या पुस्तकात तिनं म्हटलं आहे की, 'शकालाका बुमबुम' नावाची टीव्ही सीरियल तिली खूप आवडायची. या सीरियलमध्ये संजू नावाच्या मुलाकडे जादूची पेन्सिल असायची. त्या पेन्सिलनं तो जे चित्र काढायचा ते जिवंत व्हायचं. आपल्याकडे संजूची पेन्सिल असावी, असं तिला नेहमी वाटायचं. या जादूच्या पेन्सिलनं आपण सगळ्यांना आनंदी करू, असं मलालाला सतत वाटत होतं. स्वातमध्ये 1969 साली पाकिस्तानचा भाग आला. याच वर्षी मलालाच्या वडिलांचा झियाउद्दीनला जन्म झाला. झिया-उल- हकच्या हुकूमशाहीची टीका करताना मलालानं म्हटलं की, झियांच्या काळात वडिलांवर मर्यादा आणण्याची सुरुवात झाली. झियांनी इस्लामीकरणाची मोहीमच राबवली. अमेरिकन एजन्सी सीआयएवर देखील मलालानं तोफ डागली आहे. सीआयएनं आमच्या भागात जिहादचा विचार पसरवायला सुरुवात केली. सोविएत रशियन अफगाणिस्तानवर रशियाविरुद्ध लढायला जात होते. मलालाचे वडीलदखील जिहादी बनून अफगाणिस्तानात जायच्या विचारात होते. पण परिस्थितीनं त्यांना बदललं.

मलालाला गोळी लागल्यानंतर सर्वात आधी भिगोराच्या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर औषधोपचार करण्यात आला. नंतर लगेच तिला पेशावर येथील हॉस्पिटलात, तिथून रावळपिंडी येथील आर्मी हॉस्पिटलात आणि शेवटी बकिंगहाम येथील क्वीन एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. बकिंगहाम येथील हॉस्पिटलमध्ये तिला टॉप क्लास ट्रीटमेंट मिळाली. जगभरात लोक तिच्यासाठी प्रार्थना करत होते. हजारोंच्या संख्येनं तिला शुभेच्छा देणारी कार्ड्स व इतर वस्तू लोक पाठवत होते. मलालाला नेहमी बेनझीर भुत्तोंचं आकर्षण राहिलं आहे. मलालाला लोकांनी अनेक भेटी पाठवल्या, पण तिला सर्वात पसंत पडल्या ते म्हणजे बेनझीर भुत्तोंच्या दोन शाल. संयुक्त राष्ट्र (यूएन)च्या सभेत बोलताना मलालानं बेनझीर भुत्तोंची शाल घातलेली. सुरुवातीला तिची इच्छा डॉक्टर बनून लोकांची सेवा करायची होती. आता तिला पंतप्रधान बनून एक नवीन पाकिस्तान बनवायचा आहे. 'I AM MALALA' हे पुस्तक सर्वांनी आवर्जून वाचलं पाहिजे.

First published: November 29, 2013, 10:29 PM IST

ताज्या बातम्या