S M L

मला भेटलेली मुक्ता !

Sachin Salve | Updated On: Nov 11, 2013 11:36 PM IST

मला भेटलेली मुक्ता !

neelima kulkarni- नीलिमा कुलकर्णी सिनिअर करस्पाँडंट, IBN लोकमत

काय शोधाया निघाले, कुठे येउन ठेपले

कसे अनोख्या दिशेने, असे पाऊल पडले


वाट अनवट पुसट,चालताना फरपट

तरी जिंकावासा वाटे, अनोळखी सारीपाट

मुक्ताची ही कविता तिच्याविषयी बरंच काही सांगून जाते. मुक्ता बर्वे.. एक सक्षम अभिनेत्री. मुंबईत बारा वर्षांपूर्वी करियर करण्यासाठी आली आणि पाहता पाहता हे सोनेरी तप कसं सरलं कळलंच नाही. प्रेक्षकांच्या हृदयात तिने खास स्थान मिळवलं. व्यावसायिक रंगभूमीवर मोजकीच पण दर्जेदार नाटकं करत तिने रंगभूमीशी नातं कायम ठेवलं. ललित कला केंद्रातून नाट्यप्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेली मुक्ता अभिनयानंतर आता निर्मितीक्षेत्रात पाऊल टाकतेय. यानिमित्ताने तिच्यासोबत एक खास मुलाखत करायचं ठरलं. मनस्वी मुक्ताला बोलतं करायचं असेल तर समुद्राशिवाय आणखी कुठली जागा शोधणार? मुंबईतल्या मुक्ताच्या आवडत्या ठिकाणी नरिमन पॉईंटला मुलाखत घ्यायचं ठरलं.

Loading...

mukta barve3

नेहमीप्रमाणे मुक्ता वेळेवर आली आणि आवडती जागा पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं ते मुलाखत संपेपर्यंत कायम होतं ही माझ्यासाठी समाधानकारक बाब. कॅमेरा रोल झाला आणि औपचारिकपणे न बोलता दोघींच्याही नकळत एक शेअरिंग सुरु झालं. मुक्ता आपल्या प्रोजेक्ट्सच्या निवडीबद्दल भरभरून बोलली. ज्या भूमिका मनापासून आवडल्या त्याच केल्या असं ती मनमोकळेपणे सांगते. creative freedom मिळावा आणि आजच्या काळाचे नाटक करता यावं यासाठी ती निर्माती झालेय. दर्जेदार उत्तम नाटकं प्रेक्षकांसमोर आणावीत हा तिचा मानस आहेच पण यासाठी तिला कुठलीच तडजोड स्वीकारायची नाही. संहिता उत्तम असावी आणि contemporary असावी हा तिचा आग्रह आहे.

माझ्या प्रश्नांवर मुक्ता शांतपणे आणि मोकळेपणे उत्तरं देत होती. सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये आढळणारा कुठलाच अभिनिवेश किंवा अहम तिच्यात चुकुनही दिसला नाही . त्याविरुद्ध अधिक मोकळा आणि सकस संवाद तिच्याशी साधता आला . समुद्राकडे पाहताना आपली नजर जितकी खरी असते तितक्याच खरेपणाने ती माझ्याशी बोलत होती. चित्रपट,नाट्य क्षेत्रासारख्या वेगळ्या वाटेवरून इतक्या सहजगत्या वावरणं प्रत्येकाला जमतंच असं नाही. पण मुक्तानं हे करून दाखवलंय आणि हे करून दाखवल्याचा कुठलाच अविर्भाव तिच्या चेहऱ्यावर नव्हता. मुक्ताशी साधलेला हा निखळ संवाद माणूस म्हणून मला समृद्ध करून गेला. मुक्ता, अशीच उन्मुक्तपणे बरसत राहा. ज्या समुद्राकडे पाहून तू स्वप्नं पाहायला शिकलीस त्या समुद्रासारखं अथांग करियर तुला लाभो यासाठी मनापासून शुभेच्छा !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 11, 2013 11:36 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close