ईद मुबारक !

ईद मुबारक !

  • Share this:

bashir jamadar- बशीर जमादार, सीनिअर  असोसिएट एडिटर,IBN लोकमत 

आजची सुरुवात प्रसन्न झाली. नमाज अदा करून. प्रार्थनेनं. नमाजानंतर दुआ मागायची असते अल्लाह तआलाजवळ... ईश्वराजवळ. आज इमामांनी सर्वांच्या वतीनं दुआ मागितली. सर्वांच्या जीवनात सुखसमृद्धी येण्यासाठी..सर्वांची दुःखं दूर होण्यासाठी. आज त्यांनी जे जे मुस्लिमांसाठी मागितलं ते ते सर्व हिंदू आणि इतर धर्मीय बांधवांसाठीही मागितलं. आपल्या शहराच्या आणि देशाच्या शांततेसाठी, प्रगतीसाठी आणि ऐक्यासाठी प्रार्थना केली. मी पश्चिम महाराष्ट्रातला असल्यानं सामाजिक घुसळण माझ्यासाठी नवीन नाही. तरीही आजचा अनुभव वेगळा होता. आनंददायी होता. माझी प्रार्थना सार्थकी लावणारा होता.

 

माणसाला जन्माला घालताना देवानंही कल्पना केली नसेल की,हा माणूस आपल्यालाच ईश्वर, अल्लाह, गाॅड अशा नावांखाली विभागून टाकेल. समाज म्हणून संपन्न आयुष्य जगण्यासाठी माणसानं धर्माची निर्मिती केली असावी. वास्तविक पाहता धर्म हा शब्द ज्या धृ या धातूपासून तयार झालाय त्याचा अर्थ होतो धारण करणे. म्हणजे धर्माच्या व्याख्येतच आपल्याला हवी ती विचारसरणी धारण करण्याचं स्वातंत्र्य आहे. पण विचारांचं स्वातंत्र्य देणार्‍या धर्मात नंतर समाजावर वर्चस्व राखण्याच्या हेतूनं कर्मकांडांचा शिरकाव झाला आणि धर्माची अधोगती झाली. पुढे पुढे कुणाचा धर्म श्रेष्ठ या स्पर्धेत विचार कुराण आणि पुराणातच राहिले. आणि धर्म हीच फक्त ओळख माणसामाणसात संघर्ष पेटला.

 

आपला धर्म वेगळा असे दावे होत असले तरी वेगळं काय आहे. लहानपणी एक कथा ऐकली होती. चांगुणा नावाची देवाची निस्सीम भक्त भिक्षुकाचं रूप घेऊन दारात आलेल्या देवाच्या हट्टाखातर आपल्या लहानग्या बाळाचा बळी देऊन जेवण करण्यासाठी तयार होते. तिच्या अढळ निष्ठेवर प्रसन्न होऊन देव तिला तिचं मूल परत करतो. तर कुण्या एका नबीनी अल्लाहच्या आदेशानुसार आपल्या अतिशय प्रिय गोष्टीचा म्हणजे मुलाचा बळी देण्याचा प्रयत्न केला. अल्लाहनं प्रसन्न होऊन मुलाच्या ठिकाणी बकरा ठेवला. त्या दिवसाची आठवण म्हणजे ईद-उल-अझहा म्हणजेच बकरी ईद. ईश्वर आणि अल्लाहला प्रसन्न कण्यासाठी ही खटाटोप. या कथा कुणी तयार केल्या माहीत नाही. पण सांगायचा मुद्दा हा आहे की श्रेष्ठत्वाचा वादच निरर्थक आहे.

 

म्हणूनच धार्मिक कार्यात कुणी सर्वांसाठी प्रार्थना करत असेल तर त्याचं विशेष वेगळ॓पण नसावं. पण धर्माचं आजचं रूप पाहता इमामांनी केलेल्या प्रार्थनेचं मला कौतुक वाटलं. तरीही धर्माचा उल्लेख टाळून केवळ माणसासाठी प्रार्थना होईल, तोच खरा सण आणि तीच खरी ईद.

 

बनानेवालेने तो सिर्फ इन्सान को बनाया है

इन्साननेही खुदको जाति-धर्म में बांटा है।

जानले इस सच्चाई को, छोड दे दंगे फसाद को,

मत बना खंडहर स्वर्ग सी इस धरती को!

First published: October 16, 2013, 3:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading