मराठी बातम्या /बातम्या /ब्लॉग स्पेस /सैराट...जाळ आन धूर संगटच !

सैराट...जाळ आन धूर संगटच !

    chandrakant_funde_ibnlokmat- चंद्रकांत फुंदे, सिनिअर प्रोड्युसर आयबीएन लोकमत

    नागराज मंजुळेच्या सैराटनं उभ्या महाराष्ट्राला शब्दश: याड लावलंय...शहर म्हणू नका की खेडं...थिएटर म्हणू नका की मल्टिफ्लेक्स...सगळीकडेच सैराटचे शो अगदी हाऊसफुल्ल सुरू आहेत...नागराजचा हा सिनेमा फक्त पुरस्कारच पटकावून थांबला नाहीतर बॉक्स ऑफिसवरही सैराटने अक्षरश: धुमाकूळ घातलाय...गल्ला जमवण्याचे सगळे रेकॉर्ड सैराटने मोडलेत...

    सैराटने खरोखर सगळ्यांना याड लावलंय...फेसबुक म्हणू नका की व्हॉट्सअप....सगळीकडे फक्त फक्त सैराटचीच चर्चा सुरू आहे. त्यातही भाव खाऊन गेलीय ती....आर्ची...किंबहुना तीच या फिल्मची खरी हीरो आहे....तसं पाहिलं तर ही आर्ची रूढार्थाने सुंदर नाही, गोरीही नाही. पण ती सशक्त आहे...डॅशिंग आहे, बिनधास्त आहे...म्हणूनच ती प्रेक्षकांना सर्वाधिक भावलीय. नुकतंच राष्ट्रपतींच्या हस्ते तिचा पुरस्कार देऊन गौरवही करण्यात आलाय... तिच्या या कामगिरीचा अकलूजकरांना सार्थ अभिमान आहे....म्हणूनच अख्खं अकलूज सैराटमय झालंय. तिची शाळा म्हणू नका की गावातलं थिएटर, सगळीकडेच आर्चीचं गोडकौतुक सुरू आहे...महिलांसाठीही स्पेशल शो सुरू करण्यात आलाय.

    sairat_movie (3)फक्त आर्चीच नाहीतर परशा, लंगड्या आणि सल्या ही सगळीचं पात्र प्रेक्षकांना आपल्या आजूबाजूचीच वाटताय. थोडक्यात, काय तर सगळ्यांनाच सैराटची झिंग चढलीय...ही झिंग फक्त अकलूजमध्ये नाहीतर अख्ख्या महाराष्ट्रात सुरू आहे. कारण हा सैराट सिनेमाच मुळी जबराट...तो तुम्हाला प्रेम करायला शिकवतो...प्रेमात पडून झाल्यानंतर तुम्हाला वास्तवाचं भानही दतो...नुसतं भानावरच आणत नाही तर आपल्या पुरोगामित्वाचा बुरखाही टराटरा फाडतो...म्हणूनच सिनेमाच्या पूर्वार्धात झिंग झिंग झिंगाटवर ठेका धरणारा प्रेक्षक थिएटरबाहेर पडताना मात्र माथं बधीर झाल्यागत सुन्न मनाने बाहेर पडतो....हीच तर खरी नागराज मंजुळेची जादू आहे...अर्थात सैराटच्या अशा या अनपेक्षित क्लायमॅक्समुळे आणि पोस्टरफाड यशामुळे काहीजण दुखावलेही गेलेत...पण त्याची फिकीर ना नागराजला आहे ना प्रेक्षकांना... कारण सगळेच जण सैराट झालेत...

    सैराटची आणखी एक जमेची बाजू म्हणजे हा सिनेमा अस्सल मातीतला आहे, त्याचं बरचंसं शुटिंगही नागराजच्या करमाळ्यातच झालंय. गावाकडची शेतं आणि परिसर सिनेमाच्या गाण्यांमध्ये कदाचित पहिल्यांदाच एवढी सुंदर दाखवली गेली असतील...करमाळ्यातली 96 पायर्‍यांची विहीर...उजनीच्या बॅकवॉटरमध्ये बुडालेला कुगावचा इनामदारवाडा...करमाळ्याचं बसस्टँड...कमलादेवी मंदिर अशी सगळीच ठिकाणं सिनेमात अतिशय सुंदरपणे चित्रित करण्यात आलीत त्यासाठी कॅमेरामन सुधाकर रेड्डीला शतश: धन्यवाद....प्रेमातल्या क्लुप्त्या देखील अस्सल ग्रामीण आहेत...विशेषत: ग्रामीण भागातील मुलींना पटवण्यासाठी मध्यस्थाची भूमिका निभावणार्‍या चिमुरड्याचे पुरवले जाणारे लाड तर अनेकांना त्या मोरपंखी दिवसांमध्ये घेऊन गेले...कदाचित त्यामुळेच सैराट हा सिनेमा ग्रामीण तरुणाईशी थेटपणे रिलेट झालाय. बहुतांश मुलांना तर ही आपलीच प्रेमकहाणी वाटतेय. खरं तर प्रेमावर आजवर खंडीभर सिनेमे निघालेत. पण तरीही नागराजची स्टोरीच प्रत्येकाला आपलीशी का वाटतेय तर त्यातला सच्चेपणा आणि सहजसुंदर सादरीकरण...हे झालं प्रेमाचं...पण प्रेमात पडून झाल्यानंतरचा खोट्या प्रतिष्ठेपायी होणारा संघर्षही नागराजने तितक्याच ताकदीने मोठ्या पडद्यावर मांडलाय...हे करताना त्याने कुठेही फिल्मीपणाचा आव आणलेला नाही...आंतरजातीय विवाह करू इच्छिणार्‍या जोडप्यांना प्रत्यक्ष जीवनात काय काय अडचणींचा सामना करावा लागतो याचंही मन हेलावून टाकणारं वास्तववादी चित्रण आपल्याला 'सैराट'मध्ये बघायला मिळतं.

    sairat_movie (2)फँड्रीच्या माध्यमातून नागराजने समाजातल्या जातीय विषमतेवर दगड भिरकावला होता...सैराटमध्ये नागराजनं मात्र त्याही पलीकडे जाऊन ऑनर किलिंगचं भयानक वास्तव समाजासमोर मांडलंय...शेवटचे ते 'म्यूट' केलेले 20 सेकंदच तुमच्यातल्या संवेदनशील माणसाला गदागदा हलवतात...सुन्न करून सोडतात...आणि तोच खरा 'नागराज इम्पॅक्ट' आहे...नागराज हे सगळं स्वत: जगला असल्याकारणानेच कदाचित तो एवढ्या ताकदीने मांडू शकलाय. कारण सगळ्याच गोष्टी या काही कल्पनाविलासातून खुलवता येत नसतात, त्यासाठी तुम्हाला टाकीचे घावही सोसावे लागतात...आणि नागराज हा तर मुळातच दगडफोड्याच्या घरात जन्मेलला पोरगा...म्हणूनच त्याने घडवलेलं कलारूपी शिल्प अवघ्या महाराष्ट्राला सैराटमय करून गेलंय.

    sairat_movie (1)सैराट रिलीज झाल्यानंतर अनेक सो कॉल्ड पत्रपंडित समीक्षकांनी सिनेमाच्या लांबीवर भाष्य केलं...पण इथं कंटेंटच मुळी इतका तगडा आहे की नागराजने 4 तासांचा सिनेमा काढला असता तरी प्रेक्षकांनी तो तेवढ्याच गोडीने पाहिला असता...असो! सैराटबद्दल आणखी आक्षेप घेतला गेला आणि म्हणजे तो मराठा समाजावर अन्याय करणारा आहे म्हणून...पण प्रत्यक्षात सिनेमात तसं काहीही नाही...कारण नागराजने ग्रामीण महाराष्ट्रात जातीच्या खोट्या प्रतिष्ठेपायी जे घडतं तेच दाखवलंय...त्यात कुठेही बटबटीतपणा नाही...उलट शेवटच्या सीनमध्ये नागराजने केलेला सिम्बॉलिकतेचा वापर हा सर्वाधिक प्रभावशाली म्हणावा लागेल....नाहीतर आजवर सिम्बॉलिकता म्हणजे आपल्याला फक्त दिवा विझणे म्हणजे मृत्यू होणे...दोन फुलं एकमेकांवर आदळणे म्हणजे प्रेमीयुगुलाचं मिलन एवढंच दाखवलं जायचं...गाण्यांमधली स्लो मूव्हमेंटही हा देखील खास 'नागराज टच' होता...

    हे झालं सिनेमाबद्दल...आता थोडं त्याच्या सामाजिक परिणामांबद्दल बोलूयात...सैराटमधून नागराजला जो अपेक्षित इम्पॅक्ट हवा होता...त्यातही तो बर्‍यापैकी यशस्वी झालाय. कारण सैराट रिलीज झाल्यानंतर थेट सिनेमागृहांमधूनच आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचे जाहीर सत्कार सोहळे आयोजित केले जाऊ लागलेत...बाकी अजय-अतुलच्या संगीताची जादू ही एक सैराटची खूप मोठी जमेची बाजू म्हणावी लागेल...'याड लागलंय या'...,'झिंग झिंग झिंगाट'...,'सैराट झालं जी'...,आणि 'का बावरली' या चारही गाण्यांनी प्रेक्षकांना शब्दश: याड लावलंय...सगळेच सैराट झालेत...झिंगाट झालेत... काहींनी तर स्वतःचे सैराटफेम डबस्मॅशही करून यू ट्यूबवर अपलोड केलेत...तर हा 'सैराट'ज्वर असाच चढत जाओ, हीच सदिच्छा!

    sairat_movie (4)ताजा कलम- सैराटमध्ये ग्रामीण नेत्यांना जातीयवादी दाखवलं गेल्यामुळे दुखावले गेलेल्यांनी आता महाराष्ट्रातल्या राजकारणात आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांची उदाहरणं पुढे करून आम्ही आजही कसे पुरोगामी आहोत हे सोदाहरण पटवून द्यायला सुरुवात केलीय....उदाहरणार्थ - सुप्रिया सुळे, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आदी. स्वर्गीय विलासराव देशमुख यांनीदेखील मोठ्या मनाने मुलांना आंतरजातीय विवाहासाठी परवानगी दिली...त्यांच्या या पुरोगामी कृतीमुळे बाभुळगावच्या चिरेबंदी गढीला तडे गेल्याचं अजून तरी ऐकिवात नाही.... सो....गावोगावच्या पाटलांनो, तुम्ही देखील मोठ्या मनाने आंतरजातीय विवाहांना परवानगी द्या, जेणेकरून नागराजला 'सैराट'चा सिक्वल काढण्याची संधीच मिळणार नाही...


    बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

    Follow @ibnlokmattv


    First published:
    top videos

      Tags: Ajay-Atul, Nagraj Popatrao, Nagraj Popatrao Manjule, Sairat