मराठी बातम्या /बातम्या /ब्लॉग स्पेस /

माझी जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी !

माझी जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी !

mahesh_mhatre_ibnlokmatमहेश म्हात्रे,कार्यकारी संपादक, अायबीेएन लोकमत

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मनामध्ये उमटलेला हा "पंढरपुरा नेईन गुढी " च्या इच्छेचा  हुंकार गेल्या अनेक शतकांपासून मराठी मनामनामध्ये झंकारत आहे.  आज ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. काल संत तुकाराम महाराजांची पालखी देहू मधून निघाली. लक्षावधी वारकऱ्याच्या दिंड्या टाळ मृदुंगांच्या घोषात आणि ज्ञानबा - तुकारामच्या उद्घोषात आता पंढरीच्या वाटेने निघाले आहेत. पंढरीची वारी हा खरे तर महाराष्ट्राचा महा-धर्म, ज्येष्ठ अभ्यासिका इरावती कर्वे यांनी एका लेखात वारीचे आणि महाराष्ट्राचे नाते खूप समर्पक शब्दात मांडले आहे, त्या म्हणतात, " ज्या  प्रदेशातील लोक वारी करतात तो भाग म्हणजे महाराष्ट्र ".

ज्ञानेश्वर महाराजांच्या आधी पासून, खरे सांगायचे तर दीड हजार वर्षांपासून वारीची परंपरा आहे, असे अभ्यासकांचे मत आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांनी आपल्या मुलांसह पंढरपूरची वारी केली होती, ज्ञानेश्वर माउलीच्या एका अभंगात त्याचा उल्लेख आढळतो .

साधु संत मायबाप तिही केले कृपादान ।

पंढरीचे यात्रे नेले घडले चंद्रभागा स्नान॥

पंढरीची वारी हा महाराष्ट्र आणि जवळपासच्या ५-६ प्रांतातील लोकांचा कुलाचार आहे, हजारो गावांचा , लोकांचा तो लोकधर्म आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे कुंभमेळ्यासाठी सरकारला अनेक सोयीसुविधांची तयारी करावी लागते, रस्ते, पाणी, राहुट्या, एक ना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो, तसा इथे वारीत काहीही बडेजाव नसतो. साधे लोक, त्यांचे साधे जगणे, वारीत प्रत्येक पावलावर पाहायला मिळत असते. म्हणून प्रत्येक वारकरी  पांडुरंगाकडे एकच मागणे मागत असतो, " पंढरीचा वारकरी, वारी चुकू न द्यावी हरी".

vitthal_wariतुम्ही-आम्ही तीर्थयात्रेला जातो. पदरी पुण्य पडावं म्हणून गंगा-गोदावरीत स्नान करतो. साधू-संन्याशाला दान करतो. म्युझियममध्ये पाहावं तसं देवाचं दर्शन घेतो. तीर्थाच्या हाटात संसारोपयोगी वस्तूंची खरेदी करून यात्रा संपवतो. पण याला ‘यात्रा’ म्हणत नाहीत, तर ‘सहल’ म्हणतात. तीर्थस्थळी जायचं तर भक्ताच्या उत्कटतेनं जावं लागतं. भूक-तहान विसरून पायाखालची जमीन तुडवत जाणारे वारकरी पंढरीची वारी अशाच उत्कटतेनं करतात. हरिनामाची पताका खांद्यावर घेऊन ‘गाऊ नाचू प्रेमे, आनंदे कीर्तनी’ अशा विठ्ठलनामाच्या गजरात वारक-यांच्या दिंडय़ा पंढरीला पोहोचतात. नामभक्तीचा पूर चंद्रभागेच्या वाळवंटात दुथडी भरून वाहतो. म्हणूनच पंढरपूर हे नामभक्तीचं क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. आळंदीला मात्र ज्ञानेश्वरांच्या समाधीजवळ गेलं की, अध्यात्मज्ञानाचा दबदबा जाणवतो. तिथं गीतेच्या तत्त्वज्ञानाचा ऊहापोह कीर्तन-प्रवचनातून चालत असतो. ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीतून संन्याशाच्या धर्माची दीप्ती प्रकाशमान होताना दिसते. जवळच देहू आहे. शेजारी सोपान् काकांचे सासवड आहे,  आळंदीला ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली, तर देहूला तुकाराम महाराजांनी अध्यात्म प्रांताच्या नकाशावर अमर केले. ‘ज्ञानदेवे रचिला पाया। तुका झालासे कळस॥’ असे म्हटलय, ते खरे आहे.

वारकरी संप्रदायाचा श्वास ज्ञानोबाचा तर बाहेर पडणारा उच्हावास तुकोबाचा, असे म्हंटले तर अतिशोयक्ती होणार नहि.  एक बाल ब्रह्मचारी, पूर्ण विरागी संन्यासी तर दुसरा संसारी. संसारात राहूनही विरक्त, संत कसं होता येतं, याचं मूर्तिमंत उदाहरण. ‘जोडोनिया धन उत्तम वेव्हारे। उदास विचारे वेच करी॥’ हा तुकारामांचा जीवनादर्श. संसारात व्यापार-उदीम करून पैसा मिळवावा, पण त्याची आसक्ती बाळगू नये. अनासक्त राहून मिळवलेल्या धनाचा सहज त्यागही करावा. ‘सोने रूपे आम्हा मृत्तिकेसमान। माणिके पाषाण खडे तैसे॥’ अशी विरागी वृत्ती देहूला शिकावी. ज्ञानाची आळंदी, नामाची पंढरी आणि वैराग्याचं देहू असं या तीर्थक्षेत्रांचं वर्णन केलं जातं. पण दुर्दैवाने चार बुके शिकलेल्या अतिशहण्या मंडळीनी या संत विचारांना नेहमीच कमी लेखण्याचा प्रयत्न केला. हे टाळकुटे लोक, " जैसी स्थिती आहे, तैशापरी राहे", असे म्हणतात म्हणजे त्यांना परिस्थितीशरण जीवन जगायचे आहे, असा चुकीचा अर्थ काढून संतविचार नाकारण्याचा प्रमाद आपण केला आहे. या नव्या युगात आपण हे सगळे विचारधन नव्याने समजून घेतले पाहिजे. त्यासाठी, देहूला, आळंदीला, पंढरीच्या वारीला गेले पाहिजे.

आई-बाबांच्या दुर्दैवी मृत्युनंतर निवृत्ती, ज्ञानेश्वर , सोपानदेव आणि मुक्ताबाई या  संन्याशांच्या पोरांचे  जवळपास  २१ वर्षांपर्यंतचे वास्तव्य  आळंदी आणि आसपासच्या परिसरातच होते. पंढरपूर आणि त्रंबकेश्वर परिसरातील वारी आणि साधनेचा काळ वगळता त्यांनी, आळंदीमधेच वास्तव्य केले होते. त्यामुळे आळंदी वारकरी लोकांची पंढरी बनलि.

अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र |

तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र |

त्या आठविता महा पुण्यराशी |

नमस्कार माझा , सद्गुरु ज्ञानेश्वरशी |

तुकारामांचं सारं आयुष्य देहूतच गेलं. त्यामुळे देहूच्या प्रत्येक मातीच्या कणावर तुकारामांच्या चारित्र्याची मुद्रा आहे. गावात शिरण्यापूर्वी भंडारा डोंगर लागतो. तुकाराम महाराज तिथल्या बुद्धकालीन कोरलेल्या गुंफात बसून तपश्चर्या करत, तिथल्या सृष्टीरूपाशी तल्लीन होऊन अभंग रचत.

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे। पक्षी ही सुस्वरे आळविती॥

येणे सुखे रुचे एकान्ताचा वास। नाही गुणदोष अंगा येते॥’

असा एकान्तस्थळी ‘तुका म्हणे होय मनासी संवाद। आपुलाची वाद आपणासी॥’ सृष्टीचा एकान्त हा आपल्याच मनाशी संवाद मांडून बसण्यासाठी कसा उपयोगी पडतो, याचं एक निराळंच दर्शन भंडारा डोंगरावर घडतं.

f6wari_4094देहूला प्राचीन विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे, मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी इथं जोंधळ्याची कणसं बांधलेली दिसतात. ‘पाखरांच्या दाणापाण्याची दखल घेतल्याशिवाय देव दर्शनाला जाण्यात काय हशील?’ मंदिराच्या कळसावर वानर, सिंह अशा वनचरांच्या क्रीडामुद्रा आहेत. कळसावरच्या या मुद्रा केवळ नेपथ्याचा भाग नाही, तर तुकारामाच्या अभंवाणीतल्या त्या अनुभव मुद्रा आहेत. इंद्रायणीकाठी कीर्तन करता-करता नांदुरकीच्या झाडाखाली तुकाराम गुप्त झाले. ते सदेह वैकुंठाला गेले, अशी लोकमानसात श्रद्धा आहे. काही लोक महाराजांचा खून झाला असावा असेही म्हणतात, तर  आज या घटनेला साडेतीनशे वर्ष झाली.

पण लोकांची तुकाराम महाराजांवरील  श्रद्धा "अभंग" आहे. तुकारामबीजेच्या दिवशी देहूला या नांदुरकी वृक्षाखाली वैकुंठगमनाचं कीर्तन होतं. बरोबर दुपारी बारा वाजता बुवा कीर्तन संपवतात. त्यावेळी ‘आजही हा वृक्ष थरारतो’ असं म्हणतात. वारकरी भक्त या झाडाखाली उभे राहून आकाशाच्या दिशेनं फुलं उधळतात. आजच्या विज्ञानयुगात ‘वृक्ष थरारतो’ ही दंतकथा जरूर वाटेल, पण अशा दंतकथाही माणसांनीच निर्माण केलेल्या असतात. जसा दिंडी प्रस्थान समयी आळंदीला कळस हलल्याशिवाय दिंडी पुढे पाऊल टाकीत नाही, तशीच हि सुद्धा एक दन्तकथा.  ज्या तुकारामांनी वृक्ष-वेलींना सगेसोयरे मानले, त्या तुकारामाच्या वैकुंठगमनाला इतर सोय-याधाय-यांप्रमाणे हा वृक्ष थरारला असणार अशी लोकश्रद्धा असली, तर तिची टवाळी करता येणार नाही.

कस्तुरीत माती मिसळल्यावर मातीचं मोल निश्चितच वाढतं. तसंच तीर्थक्षेत्रीच्या कथा-आख्यायिकांचं असतं. म्हणूनच देहूच्या इंद्रायणीच्या डोहातले मासे आषाढी एकादशीला ज्ञानदेवांच्या आळंदीला, माऊलीला भेटायला जातात, असं म्हणतात. देहूच्या डोंगरावर, झाडांवर, मंदिराच्या कळसावर आणि सृष्टीच्या प्रत्येक रूपावर तुकारामाच्या भक्तिभावाची मुद्रा कोरली आहे. तिथल्या वृक्षवेली, पक्षी, जलचर सगळ्यांमध्ये ‘विठ्ठल’ भरून राहिला आहे. . . तो पाहायला तरी आपण दिंडीत सामील झाले पाहिजे. . . या दिंडीत तुम्हाला आपला देश, आपले लोक, आपली संस्कृती आणि आपली जीवनपद्धती कशी घडत गेली याचे साधेसुधे नाही, तर विराटदर्शन घडेल,

अनंताचा शेला। वा-यावरी झुले। पाहुनिया डुले। मन माझे।।

दु:खाचे आळव। वाहुनिये गेले। विठ्ठला साकव। नाम मुझे।।

आता आदी अंत। नुरले, नुरले।

अनहृत नाद। कानी वाजे।।


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


First published:

Tags: Wari, महेश म्हात्रे, वारी