-जतीन देसाई पत्रकार आणि पाकिस्तानातील राजकीय घडामोडींचे विश्लेषक
सीरियात जिथे जाल, तिथे ही घोषणा ऐकायला मिळेल. या महिन्यात पहिल्या आठवड्यात सीरियाची राजधानी दमास्कस आणि त्याच्या आजूबाजूच्या शहरात जाण्याचा योग आला आणि प्रसंग होता सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांची निवडणूक. या निवडणुकीकडे सगळ्या जगाचं लक्ष होतं. विशेषत: पाश्चात्त्य देशांचं अधिक लक्ष होतं. अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी सीरियावर युद्ध लादल्यासारखी स्थिती आहे. सीरियाच्या अध्यक्षाची निवडणूक न्यायी आणि योग्य पद्धतीने होते की नाही हे पाहण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळ बनविण्यात आलेलं. त्यात रशिया, ताजिकीस्तान, वेनेझुएला, युगांडा, इराण इत्यादी देशांच्या काही खासदारांसोबत माझादेखील समावेश होता.
गेल्या तीन वर्षांपासून अतिरेक्यांनी सीरियात धुमाकूळ घातला आहे. अतिरेकी आणि सरकारच्या लढाईने आतापर्यंत 1.60 लाखांहून जास्त लोक मृत्युमुखी पडले आहेत. सीरियन संस्कृती ही अतिशय जुनी आहे. येथे मोठ्या प्रमाणात सुन्नी, शिया आणि अलाबाई राहतात. ख्रिस्ती लोकसंख्या पण मोठी आहे. हे सर्वजण मिळून राहतात. प्रत्येक जण आपली ओळख सुरियाचा नागरिक म्हणून करून देतात. आपण सुन्नी, शिया, अलाबाई किंवा ख्रिस्ती आहोत असं सांगत नाही. ही सीरियन संस्कृती आहे. ही सीरियाची धर्मनिरपेक्ष संस्कृती. या संस्कृतीच्या विरोधात अतिरेकी उभे राहिले आहेत. ही सर्वसमावेशक संस्कृती अतिरेक्यांना नको आहे.
आज 50हून अधिक देशांतील अतिरेकी सीरियात सक्रिय आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान, सोमालिया, अमेरिका, ब्रिटन, उझबेकीस्तान, सुराण, इजिप्त इत्यादी देशांतील अतिरेकी सीरियन आहेत. सीरियात युद्धात होरपळून निघालेल्या लोकांमध्ये काम करणार्या लेबेनोनच्या मदर ऍग्नसच्या म्हणण्यानुसार सीरियात अमेरिका, ब्रिटन, जर्मनी यांसारख्या देशातील अतिरेकी पण आहेत. या अतिरेक्यांवर सलाफी आणि तकफ्रीरीचा प्रभाव आहे. या अतिरेक्यांना अमेरिका, साऊदी अरेबिया आणि कतारकडून मोठ्या प्रमाणात मदत मिळत आहे. टर्कीची भूमिकादेखील आश्चर्यकारक आहे. टर्कीहून मोठ्या संख्येने अतिरेकी सीरियात घुसविले जातात. टर्कीच्या अेरडोगन सरकारची अतिरेक्यांना उघड मदत आहे, असं सीरियन सरकार आणि सामान्य लोक सांगतात.
सीरियन सरकारने गेल्या काही महिन्यांत अतिरेक्यांच्या नियंत्रणाखालील अनेक शहरे मुक्त केली आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात मी सीरियात गेलो असताना दमास्कस एअरपोर्ट बंद होतं. दमास्कस शहर आणि एअरपोर्टमधला काही भाग अतिरेक्यांकडे होता. आता हा संपूर्ण परिसर सरकारच्या नियंत्रणात आहे. कमी का होईना, पण विमान येताना आणि जातात. सहसा विमानांची ये-जा सूर्यास्तानंतर असते. इराणच्या तेहरानहून निघालेलं आमचं विमानदेखील रात्री उशिरा दमास्कसला उतरलं. सीरियात विमानाच्या पंख्याची लाईटदेखील बंद ठेवण्यात आलेली. सीरियात आज युद्ध चाललं आहे आणि त्यात अशा स्वरूपाची सुरक्षेची पावलं उचलणं स्वाभाविक आहे. संपूर्ण शहरात आणि देशात पोलीस, लष्कराची हजेरी प्रकर्षाने जाणवते. त्यांच्या मदतीला लेबेनोनचे हिजबुल्ला पण आहेत. लोकांना नाकाबंदी आणि चेकपोस्टहून सतत जावं लागतं. दमास्कसचं वर्णन एक मॉडर्न शहर असं करता येईल. येथे महिला मोठ्या प्रमाणात काम करतात. वर्तमानपत्र आणि न्यूज चॅनलमध्ये काम करणार्या मुली रात्री उशिरा एकट्या आपल्या घरी जातात. या मुली अत्यंत मॉडर्न असे कपडे घालतात. साहजिकच अतिरेक्यांच्या विचाराच्या विरोधात आहेत.
मतदानाच्या दिवशी दमास्कस, जरमाना, गुंदानिया येथील काही मतदान केंद्रांची आम्ही भेट घेतली. मतदानात गोंधळ घालण्याची धमकी अतिरेक्यांनी दिलेली. बॉम्बस्फोटाचे आणि बंदुकीच्या गोळ्यांचे सतत आवाज येत असताना देखील मोठ्या संख्येनं लोक मतदानाला उतरले होते. उत्सवासारखं वातावरण होतं. सुरक्षेच्या दृष्टीने आम्हाला बुलेटप्रूफ कार देण्यात आलेली होती. आमचा ड्रायव्हर पोलीस होता. त्याच्याकडे मशीनगन पण होती. आपल्या ड्रेसवर त्यांनी असदचा फोटो लावलेला. त्यांनी एक फोटो मला लावायला दिला. मी निरीक्षकाच्या भूमिकेत असल्यामुळे लावला नाही. पण सीरियात सरकारी कर्मचार्यांपासून लष्करातील जवान आणि मतदान केंद्रातील अधिकारी देखील अध्यक्ष 'बशीर अल-असद'चे समर्थक. मतदान केंद्राच्या बाहेर तरुण मुलं-मुली 'अल्ला, सुरिया, बशीर अल-असद' अशा घोषणा देताना सर्वत्र आढळले. आम्हाला उत्साहाच्या भरात काही ठिकाणी मतदान केंद्रातील अधिकार्यांनी पण घोषणा दिल्या. मतदानाचा लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता. आपल्या आणि सीरियातील मतदानाच्या पद्धतीत खूप फरक आहे. मतदार यादी कुठेही आढळली नाही. नॅशनालिटी कार्ड ज्यांच्याकडे आहे आणि जे वयाची अट पूर्ण करतात ते सगळे मतदार. असदच्या विरोधात दोन उमेदवार उभे होते. मतपत्रिकेत तिन्ही उमेदवारांचे फोटो. ज्याला मत द्यायचं त्याच्या फोटोखाली मतदारांनी खूण करायची. सकाळी सात वाजता सुरू झालेलं मतदान सायंकाळी सात वाजेपर्यंत होतं, पण लोकांचा उत्साह पाहून मतदानाची वेळ रात्री बारा वाजेपर्यंत वाढवण्यात आली. सर्वत्र असदच दिसत होते. सीरियात सर्वत्र असदचे मोठमोठाले फोटो आढळतात. फोटोच्या स्वरूपात का होईना, पण असदची हजेरी सर्वत्र जाणवली. इतर दोन उमेदवारांचा कुठे पत्ताच नव्हता.
दुसर्या दिवशी रात्री आम्ही हॉटेल शेरेटॉनमध्ये जेवत असताना टीव्हीवर निकाल पाहिला. प्रचंड मताने बशीर अल-असदचा विजय झाला असल्याचं जाहीर होताच सगळीकडे लगेच जल्लोष साजरा करण्यात आला. दमास्कस शहरात लोक रस्त्यावर उतरले. लोक सीरियाचे झेंडे घेऊन नाचत होते. फटाके तर लोकांनी फोडलेच, पण त्याच्यासोबत बंदुकीतून हवेत गोळ्यांचा वर्षाव करूनदेखील लोकांनी सणासारखा असदचा विजय साजरा केला. शेरेटोनच्या रेस्टॉरंटमध्ये एकाने म्हटलं की, निकाल आम्हाला माहीत होता. तर दुसर्यानं म्हटलं की, निकाल तर सर्वांना माहीत होता. असदच्या विजयाबद्दल या सर्वांनी आनंद व्यक्त केला. सुरक्षेच्या कारणामुळे आम्हाला कर्मचार्यांनी हॉटेलच्या बाहेर जाऊ दिलं नाही पण संपूर्ण शहर रस्त्यावर उतरून आपला आनंद व्यक्त करत असल्याचं चित्र दिसत होतं. एकूण मतदानापैकी 88.7 टक्के मतं असदला मिळाली. रक्का प्रांतातील काही ठिकाणं सोडली तर इतर सर्वत्र मतदान झालं. रक्काचा काही भाग अतिरेक्यांकडे आहे. मोठ्या संख्येनं मतदान करून लोकांनी आपण अतिरेक्यांच्या विरोधात असल्याचं स्पष्ट केलं आहे. ही वस्तुस्थिती आम्ही पाहत होतो. आमच्यातील काहीजण सीरियाच्या वेगवेगळ्या शहरात गेलेले. मात्र बीबीसीने सीरियाच्या काही भागात मतदान झालं अशी बातमी दिली. पश्चिम देश असदच्या विरोधात असल्यामुळे पाश्चात्त्य मीडियादेखील चुकीची माहिती बातम्यांमार्फत देत होती.
अतिरेक्यांच्या हल्ल्यात आपले जवळचे नातेवाईक गमावून बसणारे अनेक जण भेटले. आपण असदच्या सोबत असल्याचं ते मतदान केंद्रात म्हणत होते. एका पत्रकाराने तर आपण असदला मतदान केल्याच्या क्षणाचा स्वत:चा फोटो घेतला आणि तो आम्हाला दाखवला. अतिरेक्यांना मात्र असद पराभूत होऊ शकतात, असं वाटत होतं. सर्वसमावेशक सीरियानं संस्कृती टिकवायची असेल तर असदला पर्याय नाही, या निष्कर्षावर ते आले. मेहदी शराफत नावाचा भारतीय पत्रकार गेली अनेक वर्षं इराणमध्ये आहे आणि तिथून या सगळ्या देशावर लक्ष ठेवून आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, अतिरेक्यांमुळे असदच्या बाजूने सहानुभूती होती. अतिरेकी नसते तर असदला एवढी सहानुभूती मिळाली नसती.
सीरियातील मतदान न्यायी आणि योग्य पद्धतीने झालं असल्याचं आमचं मत झालं. मात्र निश्चित निवडणुकीच्या पद्धतीत काही सुधारणा आवश्यक आहे. असदला मतदान करून लोकांनी पाश्चात्त्य देशालादेखील त्यांनी आपली भूमिका बदलावी असा स्पष्ट संदेश दिला आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: अफगाणिस्तान, अमेरिका, इजिप्त, पाकिस्तान, ब्रिटन, सीरिया