मुंबई, 21 डिसेंंबर : डिसेंबर (December) महिना आला की विविध कार कंपन्यांच्या (Car Companies) जाहिरातींचा मारा सुरू होतो. किमतीवर मोठ्या सवलती, अनेक आकर्षक ऑफर्स दिलेल्या दिसतात. त्यामुळे आपली आवडती कार आपल्या बजेटमध्ये खरेदी करण्यासाठी ही वर्षअखेर अगदी योग्य वेळ असते. सणासुदीच्या काळात किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी कंपन्या जशा सवलती देतात. तशा या महिन्यात दिल्या जातात. त्यामुळे एखादी महागडी कार खरेदी करण्याचे स्वप्न ही सहज साकारता येते.
अनेक नामांकित कंपन्यांन्यांच्या गाड्यांवर सवलती
सध्याही अनेक नामांकित कंपन्यांनी मोठ्या सवलती दिलेल्या दिसत आहेत. मारुती सुझुकी (Maturi Suzuki) 45,000 रुपयांपर्यंत, ह्युंदाई (Hyundai) 50,000 रुपयांपर्यंत, टाटा (Tata) 40,000 रुपयांपर्यंत, महिंद्रा (Mahindra) 65 हजार रुपयांपर्यंत, रेनो (Renault) 1.30 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. याशिवाय होंडा (Honda), निस्सान (Nissan), स्कोडा (Skoda ) आदी कंपन्याही चांगल्या सवलती देत आहेत. यामध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट सवलत यांसारख्या विविध ऑफर्सचा समावेश आहे. 'दैनिक भास्कर'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
डिसेंबर महिन्यात कार स्वस्त का?
या कंपन्या डिसेंबरमध्ये अशा ऑफर्स का देतात असा प्रश्न पडला असेल ना? तर याचे उत्तर आहे वर्ष अखेर.
डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा महिना (Last Month Of Year). त्यानंतर कॅलेंडर बदलते. म्हणजेच आता वर्ष 2021 संपेल आणि 2022 सुरू होईल. वर्ष संपले की कार उत्पादनाचे वर्षही बदलते. म्हणजेच 2021 मध्ये जी कार तयार झाली आहे, तिचे मॉडेल वर्ष बदलताच एक वर्ष जुने होईल. आता जानेवारी 2022 मध्ये कार खरेदी करणारे ग्राहक डिसेंबर 2021 मध्ये उत्पादन कार खरेदी करणार नाहीत, कारण ती एक वर्ष जुनी मानली जाईल. याच कारणामुळे बहुतेक कंपन्या डिसेंबरमध्ये कारचे उत्पादन थांबवतात आणि जुना स्टॉक संपवण्यावर भर देतात. यामुळे डीलर्सही कारवर चांगली सूट देतात. सवलतींसोबत अॅक्सेसरीजही दिल्या जातात. मात्र ज्या गाड्यांचा स्टॉक (STOCK)आहे त्यावरच सवलत मिळते. त्यामुळे ग्राहकाला कार निवडण्याची संधीही कमी असते.
हेही वाचा : शिवसेना आमदार रविंद्र वायकरांची तब्बल 7 तास ईडी चौकशी
आता आपण घेत असलेली कार कोणत्या वर्षातील आहे हे कसे ओळखता येते ते जाणून घेऊया.
सर्व कार कंपन्या त्यांच्या वाहनांवर एक वाहन ओळख क्रमांक (VIN) लिहितात. हा एक प्रकारचा कोड आहे जो कारच्या उत्पादनाचा महिना आणि वर्ष शोधण्यासाठी उपयुक्त ठरतो. प्रत्येक कारमध्ये एक ओळख क्रमांक (VIN) असतो जो बहुतांश इंजिनजवळ असतो. याचे एक उदाहरण बघू. मारुतीचा VIN 17 वर्णांचा आहे. बहुतेक VIN 'MA3' ने सुरू होतात. यातील 10वा वर्ण वर्ष तर 11 वा वर्ण उत्पादनाचा महिना दर्शवतो. उदाहरणार्थ, 10 वा वर्ण एफ (F) असेल तर वर्ष 2015 असेल. 11 वा वर्ण एच ( H) असेल तर महिना ऑगस्ट असेल. VIN मध्ये I, O आणि Q वापरले जात नाहीत. काही वर्षांपासून मारुतीने यात आकडेही वापरले आहेत.
हेही वाचा : राज्यात Omicron चा धोका वाढला, रुग्णांची संख्या पोहोचली 65 वर
पुढच्या वर्षी 'या' कंपन्या कारच्या किमती वाढवणार
1 जानेवारी 2022 पासून अनेक कंपन्या कारच्या किमती (Price) वाढवणार आहेत. यामध्ये मारुती, टाटापासून ते लक्झरी कार बनवणारी मर्सिडीज, ऑडी, स्कोडा यांचा समावेश आहे. कच्च्या मालाची वाढती किंमत हे कारण आहे. किती टक्के दर वाढवणार हे अद्याप या कंपन्यांनी जाहीर केलेले नाही. मात्र नवीन वर्षात कारच्या किमती वाढवल्या जातात. त्यामुळे डिसेंबरमध्ये कार खरेदी करणे फायद्याचे ठरते. तसेच डिलर्सकडे स्टॉक असेल तेव्हाच डिसेंबरमध्ये डिस्काउंटसह कार खरेदी करता येईल. कारण बहुतांश कंपन्या चिप्सअभावी कारचे उत्पादन करू शकत नाहीत. त्यामुळे प्रतीक्षा कालावधी सहा महिन्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे ज्या कंपन्यांच्या कारची मागणी कमी आहे, त्यांच्याकडे स्टॉक आहे. त्या बुकिंग झाल्यानंतर 7 ते 10 दिवसात ते कारची डिलिव्हरी करत आहेत. त्यामुळे आवडती कार स्वस्तात खरेदी करायची असेल तर आताच योग्य संधी आहे, त्याचा जरूर लाभ घ्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.