मुंबई, 31 डिसेंबर: बऱ्याच मोठ्या प्रतीक्षेनंतर अमेरिकन कार कंपनी टेस्ला (Tesla) भारताममध्ये धूम करण्यासाठी सज्ज झाली आहे. टेस्ला कंपनीचे CEO एलन मस्क (Elon Musk) यांनी 27 डिसेंबर रोजी एका ट्विटला उत्तर देताना याबाबतची घोषणा केली आहे. त्याचबरोबर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे.
कोणत्या मॉडेलची होणार एन्ट्री ?
टेस्ला कंपनीसाठी भारताची बाजारपेठ महत्वाची आहे. एलन मस्क यांनी यापूर्वी अनेकदा टेस्लाची कार भारतात येणार असल्याची ट्विटरवर घोषणा केली होती. आता नितीन गडकरींनी या बातमीला दुजोरा दिल्यानं भारतीय बाजारपेठेत पूर्ण तयारीसह येण्याची कंपनीची योजना आहे. त्यामुळे अगदी लगेच जानेवारी महिन्यात नव्या कारचं बुकींग सुरु होण्याची शक्यता नाही. नव्या कारच्या बुकींगसाठी मार्चपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.
टेस्ला कंपनीची Tesla Model 3 ही इलेक्ट्रीक कार भारतामध्ये सर्वात प्रथम दाखल होणार आहे. ही कंपनी सर्वात वापरली जाणारी कार असून जागतिक बाजारपेठेत 2013 साली दाखल झाली आहे. त्याचबरोबर ही टेस्लाची सर्वात जास्त विक्री होणारी कार आहे.
काय असेल कारची किंमत?
टेस्लाची कार संपूर्णपणे तयार होऊन भारतामध्ये दाखल होणार आहे. या कारला आयात कर द्यावा लागणार हे निश्चित आहे. मात्र इलेक्ट्रीक कारला प्रोहत्साहन देण्याचं सरकारचं धोरण असल्यानं करामध्ये काही प्रमाणात सूट मिळू शकते. भारतीय बाजारपेठेत या कारची किंमत 60 लाखांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
काय आहे वैशिष्ट्य?
Tesla Model 3 चे चार वेगवेगळे प्रकार असून 60 लाख ही सर्वात स्वस्त प्रकाराची किंमत असू शकते. या प्रकरातील बॅटरीची क्षमता ही 50 किलो मीटर प्रती तास ते 75 किलो मीटर प्रती तासापर्यंत आहे. त्याचबरोबर ही कार बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर 381 किलोमीटर ते 560 किलोमीटर्यंतचा प्रवास करु शकेल.
टेस्ला कंपनीचं यापूर्वीचं सर्व उत्पादन हे युरोपीन बाजारपेठ तसेच त्या देशातील रस्त्यांना डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेलं आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठ आणि विशेषत: देशातील खराब रस्ते यांचा विचार करुन कंपनी यामध्ये काही बदल करते का हे पाहवं लागणार आहे. त्याचबरोबर टेस्ला कार ही अनेक स्वयंचलित फिचर्ससाठी (Autonomous Features) ओळखली जाते. भारतामधील रस्ते विचारात घेता या फिचर्समध्येही काही बदल होऊ शकतो.
देशातील कार उद्योगात गेल्या काही वर्षांपासून मंदीचं वातावरण होतं. टेस्ला कारच्या आगमानानंतर 2021 मध्ये बाजारात नवा उत्साह येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भारतीय ग्राहकांचं टेस्ला कार घेण्याचं स्वप्न देखील आता 2021 मध्ये पूर्ण होणार आहे.