या 7 कार्सना आहे मोठी डिमांड; भारतात तुफान लोकप्रिय होत असलेल्या नव्या गाड्या

या 7 कार्सना आहे मोठी डिमांड; भारतात तुफान लोकप्रिय होत असलेल्या नव्या गाड्या

यातल्या काही गाड्यांच्या खरेदीसाठी तर तब्बल 9 महिन्यांची प्रतीक्षायादी आहे. गाडी घ्यायच्या विचारात असाल तर आधी ही लिस्ट पाहा.

  • Share this:

नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी : सध्या कोरोनाच्या संकटाचं सावट विरत असल्यानं अर्थव्यवस्थाही रुळावर येऊ लागली आहे. दैनंदिन जीवनही पूर्वपदावर येत आहे. लोकांमध्ये खरेदीचा उत्साह वाढला आहे. घर, वाहन अशा मोठ्या खरेदीकडं लोक वळत आहेत. वाहन कंपन्यांही नवनवीन उत्पादनं दाखल करत असून, आकर्षक सवलतीही देत आहेत. नाविन्यपूर्ण फीचर्स, प्रगत तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असलेल्या नवीन कार्स (Cars) खरेदीकडं ग्राहकांचा ओढा वाढत आहे. त्यामुळं काही नवीन कार्सच्या खरेदीसाठी ग्राहकांना बराच काळ प्रतीक्षा (Waiting Period) करावी लागत आहे. या कार्सची मागणी इतकी आहे की, नोंदणी करून काही महिन्यांनी ती कार ग्राहकांना मिळत आहे.

गाडीवाडी डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार, महिंद्रा थार, निस्सान मॅग्नाईट आदी सात कार्सासाठी ग्राहकांना किमान एक ते नऊ महिने प्रतीक्षा करावी लागत आहे.

महिंद्रा थार (Mahindra Thar) :

महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीची न्यू जनरेशन थार ही दणकट कार घ्यायची असेल तर ग्राहकांना तब्बल 9 महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. ही ऑफ रोड कार असली तरी हिच्या नवीन आवृत्तीत देण्यात आलेल्या सुविधांमुळे ती शहरातही तितक्याच सहजपणे चालवणे शक्य होते.

निस्सान मॅग्नाईट(Nissan Magnite) :

सब 4 मीटर एसयूव्ही (SUV) प्रकारातील ही निस्सानची नवीन कार असून, या विभागातील ती सर्वात किफायतशीर दरातील कार आहे. स्टायलीश लूक, नाविन्यपूर्ण अनोखे फीचर्स यामुळं या कारला चांगला प्रतिसाद मिळत असून, ही कार खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना तब्बल आठ महिने प्रतीक्षा करावी लागत आहे.

ह्युंदाई क्रेटा (Hyundai Creta) :

ह्युंदाई कंपनीची क्रेटा ही कार सध्या भारतात सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही आहे. मध्यम आकाराच्या या एसयुव्हीने जानेवारी 2021 मध्ये देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारचा मान अबाधित राखला आहे. या कारला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून, तिची मागणी अद्यापही टिकून आहे. त्यामुळे ही कार घेण्यासाठी ग्राहकांना नोंदणी केल्यानंतर किमान सात महिने वाट पहावी लागत आहे.

मारुती सुझुकी एर्टीगा (Maruti Suzuki Ertiga) :

मारुती सुझुकीची ही मल्टीपर्पज व्हेईकल प्रकारातील कार आजही लोकप्रिय असून, तिची मागणी कायम आहे. आजही ही कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना सहा ते आठ महिने वाट पहावी लागत आहे. 1.5 लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन असलेली ही कार 105 पीएस पॉवर आणि 138 एनएम टॉर्क देते. ही कार 7.69 ते 10.47 लाख (एक्स शोरूम) रुपये किंमतीत उपलब्ध आहे.

हे देखील वाचा -  QR कोड स्कॅन करून पेमेंट करताय? या फ्रॉडपासून वेळीच सावध व्हा, अन्यथा बसेल मोठा फटका

किया सोनेट(Kia Sonet) :

अलिकडेच भारतीय बाजारपेठेत दाखल झालेल्या या सब फोर मीटर एसयूव्हीनं भारतीय ग्राहकांना जिंकलं असून, लोकप्रियतेत तिनं आघाडी मिळवली आहे. सध्या ही कार घ्यायची असल्यास नोंदणी केल्यानंतर ग्राहकांच्या हातात ही कार पडेपर्यंत पाच महिन्यांचा कालावधी जात आहे.

टोयोटा फॉर्च्युनर(Toyota Fortuner) :

टोयोटानं अलीकडेच फॉर्च्युनर या आपल्या लोकप्रिय कारची सुधारीत आवृत्ती दाखल केली. त्यामुळं या विभागात या कारचा दबदबा कायम राहिला आहे. भारतीय बाजारपेठेत या कारला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला असून, सध्या ही कार घेण्यासाठी किमान चार महिने प्रतीक्षा करावी लागत आहे.

ह्युंदाई आय ट्वेंटी(Hyundai i20):

ह्युंदाई गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आय ट्वेंटी कारची न्यू जेन आवृत्ती दाखल केली. प्रीमियम हॅचबॅक विभागात या कारनं लोकप्रियतेचे नवीन मापदंड निर्माण केले असून, सध्या ही कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना किमान एक महिना प्रतीक्षा करावी लागत आहे.

Published by: Aditya Thube
First published: February 9, 2021, 8:29 AM IST

ताज्या बातम्या