दिवाळीला तुमच्या स्वप्नातली कार घेताय?; फसवणूक टाळण्यासाठी या टिप्स नक्की वाचा

दिवाळीला तुमच्या स्वप्नातली कार घेताय?; फसवणूक टाळण्यासाठी या टिप्स नक्की वाचा

पहिल्यांदाच कार घेत असताना आपली भावनिक गुंतवणूकही होत असते. त्यामुळे आर्थिक जबाबदाऱ्या आणि घराच्या बजेटचे नीटपणे काटेकोर नियोजन केलं तर सहजपणे कार विकत घेता येऊ शकते. पहिल्यांदा कार घेणाऱ्यांनी सवड काढून वाचाव्यात अशा टिप्स.

  • Share this:

मुंबई, 05 नोव्हेंबर: आपल्या स्वप्नातली चारचाकी दारात आणून उभी करणं तशी आता फारशी अवघड गोष्ट राहिलेली नाही. सणासुदीच्या काळात वेगवेगळ्या आकर्षक ऑफर्स दिल्या जात असतात. शिवाय वाहन कर्ज देणाऱ्या बँका, वित्तीय संस्थांच्याही योजना असतात. नवीन कार घ्यायची असेल खालील बाबींचा नीट अभ्यास करणं आवश्यक आहे.

1. बजेट आणि फायनान्स

कार खरेदीचा विचार पक्का झाला की आधी आपलं बजेट किती ते निश्चित केलं पाहिजे. म्हणजे त्यानुसार आपण कार निवडू शकतो आणि आपल्या पैशांचा रास्त मोबदला देणारं वाहन घेऊ शकतो. रोखीने खरेदी करणं कधीही चांगलं असलं तरी प्रत्येकाला हे शक्य होईलच असं मात्र नाही. त्यामुळे बाहेरून आर्थिक मदत घ्यावी लागतेच.

2. वाहन वापराच्या गरजा ठरवा

कामाच्या ठिकाणी ये-जा, इतर ठिकाणचा प्रवास दररोजचा किती आहे आणि वाहनाची आपल्याला कितपत गरज भासते याचा विचार करा. यावरून मग कार घ्यायची की एसयूव्ही हे ठरवता येऊ शकतं. त्यानंतर मग आपल्या बजेटमध्ये बसू शकतील अशा वाहनांच्या वेगवेगळ्या मॉडेल्सची पडताळणी करा.

3. शोध आणि संशोधन

एकदा का बजेटची आकडेमोड झाली की मग तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि बजेटमध्ये बसू शकेल अशा कारवर संशोधन सुरू करा. ऑनलाइन-ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे हे काम तुम्ही करू शकता. इंटरनेटवर काही ऑफर आहेत का? आपल्या एरियाबाहेरील कुठल्या डीलरकडून काही वेगळ्या ऑफर दिल्या जात आहेत का? याचा शोध घ्या. ऑनलाइन रिसर्चमध्ये तुम्हाला भरपूर चॉईस मिळू शकतात. ऑटो रँकिंग, सेफ्टी फीचर्स आदी गोष्टी तपासा.

4. फायनान्स आणि खरेदीचे पर्याय

रोखीने कार घेण्यासाठी तुम्ही पुरेशी बचत केलेली असेल तर उत्तमच. पण तसं नसेल तर तुम्हाला फायनान्स म्हणजेच वाहन कर्ज घेण्याची गरज भासू शकते. तुम्हाला कसं आणि किती फायनान्स द्यायचा हे त्या त्या बँकेवर अवलंबून असतं. तुमची जी कोणती बँक असेल त्यांच्याकडे आधी जा किंवा माहितीतील एखादी कर्ज देणारी संस्था असल्यास त्यांच्याकडून कोटेशन घ्या.

5. क्रेडिट स्कोअर सुधारा

बँक किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन कार खरेदीचा विचार असेल तर तुमचा क्रेडिट स्कोअर व्याज ठरवण्यात महत्त्वाची भूमिका निभावू शकतो. क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर वाजवी दरांत कर्ज मिळू शकेल. बहुतांश बँका आणि क्रेडिट कार्ड पुरवठादार संस्था तुमचा क्रेडिट स्कोअर तपासत असतात.

6. प्री ओन्ड किंवा सेकंड हँण्डचा पर्याय

पहिल्यांदा कार खरेदी करणाऱ्यांच्या बजेटचा विचार करता वापरलेली जुनी कार खरेदी करणं योग्य ठरतं. पाच किंवा तीन वर्षं जुनी वापरलेली मॉडेल खरेदी करायची तर डीलर्स चांगल्या ऑफर्सही देतात.

7. टेस्ट ड्राईव्ह घ्या

बजेट आणि गरजेच्या निकषांत फिट बसणारी कार एकदा का ठरली की मग त्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेण्यात अजिबात हयगय करू नका. गाडी चालवतानाचा फील कसा वाटतो. गाडीचा परफॉर्मन्स आपल्याला कसा वाटतो ते यातून लक्षात येतं.

8. किमतींवर घासाघीस करा

किंमतीवरून डीलर किंवा वापरलेली कार विक्रेत्याशी घासाघीस करण्यात गैर काहीच नाही. करार तसंच फायनान्सच्या नियम व अटी आणि वॉरंटी करार तपशीलासह वाचून काढा. समजून घ्या आणि मग व्यवहार करा. यामुळे नंतर पुढे पश्चात्ताप करावा लागत नाही.

9. कार नीट तपासून घ्या

तुम्ही एखादी वापरलेली कार घेत असाल तर एखादा नातेवाईक, मित्र किंवा विक्रेत्याकडून, विश्वसनीय सूत्रांकडून त्या कारची कसून तपासणी करून घ्या. एखाद्या ऑटो मेकॅनिक शॉपवर नेऊन बारकाईने गाडीच्या सर्व सुट्या भागांची तपासणी करून घ्या. यामुळे पुढच्या अनेक अडचणी टळतात.

10. प्रक्रियेतली मौज, नव्या कारचा आनंद घ्या

वरची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर आपल्या गरजा आणि बजेटमध्ये बसू शकेल अशी कार निवडा. या संपूर्ण प्रक्रियेतली मौज अनुभवा आणि नव्या वाहनाच्या खरेदीचा आनंद घ्या. नियोजन, बजेटिंग आणि स्पष्ट निगोसिएन्स यामुळे एक चांगला व्यवहार केल्याचं समाधानही तुम्हाला मिळू शकेल.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 4, 2020, 7:39 AM IST
Tags: carmoney

ताज्या बातम्या