Home /News /auto-and-tech /

लाँचपूर्वी खरेदी केलेल्या सोनी PS5 कन्सोलला मिळणार नाही वॉरंटी

लाँचपूर्वी खरेदी केलेल्या सोनी PS5 कन्सोलला मिळणार नाही वॉरंटी

एवढी मोठी किंमत मोजूनही ग्राहकांना या कन्सोलची वॅारंटी मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

    नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : सोनी कंपनीचे नेक्स्ट जेन पीएस 5 कन्सोल अधिकृतपणे बाजारात दाखल झालेले नाहीत. मात्र, अनाधिकृत विक्रेते भारतीय ग्राहकांना ते जास्त दराने विक्री करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सुमारे 90 हजार रुपयांपर्यंत या कन्सोलची विक्री करण्यात आली असून एवढी मोठी किंमत मोजूनही ग्राहकांना या उत्पादनाबाबत वॉरंटी (हमी) देण्यात आलेली नाही. भारतात सोनी प्लेस्टेशन 5 ची किंमत 49,900 रुपये आहे. मात्र अनधिकृत किरकोळ विक्रेते ग्राहकांना जादा किंमतीत कन्सोलची विक्री करीत आहेत. काही ठिकाणी तर या कन्सोलची विक्री 90 हजार रुपयांपर्यंत करण्यात आलेली आहे. एवढी मोठी किंमत मोजूनही ग्राहकांना या कन्सोलची वॅारंटी मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतात एक्सबॉक्स सिरीज एक्सचा तुटवडा निर्माण झाल्याने गेमर्समध्ये निराशा आहे. त्यातच प्लेस्टेशन 5 भारतात कधी लाँच होणार याबाबत सोनी कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही. असे असतानाही आयातदारांनी देशातंर्गत काळ्या बाजारात कन्सोलची विक्री सुरु केली आहे. नेक्स्ट जनरेशनमधील प्लेस्टेशन कन्सोल ग्राहकांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावेत. कन्सोलसोबत सोनी इंडीयाचे अधिकृत वॉरंटी कार्ड असणे आवश्यक आहे. ज्या भारतीय ग्राहकांनी अनाधिकृत विक्रेत्यांकडून कन्सोल खरेदी केले आहेत, त्यांना वॉरंटीचा (हमी) लाभ मिळणार नाही, असे `सोनी`च्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. सोनी कंपनीच्या या म्हणण्याला दुजोरा देत मेन्स एक्सपीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, वॉरंटीचा लाभ मिळावा यासाठी भारतीय ग्राहकांनी उत्पादन खरेदीवेळी उत्पादनासोबत सोनी इंडियाचे अधिकृत वॉरंटी कार्ड आहे का हे तपासून घेणे गरजेचे आहे. तसेच सोनी इंडियाची प्ले स्टेशनची उत्पादने ही बीआयएसने ठरवलेल्या भारत सुरक्षा मानांकानावर आधारित आहेत. ग्राहकांनी इम्पोर्टेड प्लेस्टेशन 5 कन्सोल खरेदी केला आणि तो कन्सोल खराब असेल किंवा कन्सोलबाबत काही समस्या उदभवल्यास वॉरंटी कार्डाअभावी तो ग्राहकांना बदलून मिळणार नाही, असे देखील अहवालात नमूद करण्यात आले आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    पुढील बातम्या