रोशनी नाडर ठरल्या HCL टेक्नॉलॉजीजच्या नव्या अध्यक्ष आणि देशातील सर्वांत श्रीमंत महिला

रोशनी नाडर ठरल्या HCL टेक्नॉलॉजीजच्या नव्या अध्यक्ष आणि देशातील सर्वांत श्रीमंत महिला

हुरून रिच लिस्टनुसार, (Hurun Rich List) रोशनी नाडर या भारतातील सर्वांत श्रीमंत महिला आहेत. त्यांची एकूण संपत्ती 36 हजार 800 कोटी आहे.

  • Share this:

नuवी दिल्ली, 3 डिसेंबर : भारतातील सर्वांत श्रीमंत महिला असलेल्या रोशनी नाडर(Roshni Nadar Malhotra)  आता एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या  (HCL Technologies) नव्या अध्यक्ष झाल्या आहेत. त्यांनी आपले पिता आणि एचसीएल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक शिव नाडर (Shiv Nadar)यांच्याकडून अध्यक्षपदाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. या वर्षी जुलै महिन्यात 8.9अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेल्या एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या अध्यक्ष पदावरून पायउतार होण्याचा मानस शिव नाडर यांनी व्यक्त केला होता.

कंपनीच्या नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर रोशनी नाडर यांची संचालक मंडळाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली असून, त्या शिव नाडर यांची जागा घेतील, असं कंपनीच्या संचालक मंडळानं म्हटलं आहे. रोशनी नाडर यांनी कंपनीच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि सीईओ म्हणूनही कार्यभार सांभाळलेला आहे. तसेच कंपनीच्या उपाध्यक्ष आणि शिव नाडर फाउंडेशनच्या विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. रोशनी या प्रशिक्षित शास्त्रीय संगीतकार आहेत.

2013 मध्ये त्यांनी एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या संचालक मंडळात त्यांची नियुक्ती झाली. उपाध्यक्ष म्हणूनही त्या कार्यरत होत्या. आता त्या एचसीएल कार्पोरेशनच्या सीईओ म्हणूनही काम पाहतील. त्या वयाच्या 28 वर्षी कंपनीच्या सीईओ झाल्या होत्या. संचालक मंडळानं रोशनी यांची तत्काळ कंपनीच्या नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. शिव नाडर कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून आणि प्रमुख रणनीती अधिकारी म्हणून कार्यरत राहणार आहेत. कंपनीचे सीईओ सी. विजयकुमार म्हणाले की, हा कंपनीच्या उत्तराधिकारी योजनेचा भाग होता. आयआय एफएल वेल्थ हुरून इंडियाच्या माहितीनुसार रोशनी नाडर यांची एकूण संपत्ती तब्बल 36 हजार 800 कोटी रुपये इतकी आहे.

रोशनी यांनी दिल्लीतील वसंत व्हॅली स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले. तर अमेरिकेतील इलीनियोस इथल्या नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीमधून कम्युनिकेशनमध्ये पदवी घेतली. केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंट मधून त्यांनी एमबीए केलं. 2009 मध्ये एचसीएलमध्ये येण्यापूर्वी त्यांनी स्काय (Sky News) न्यूज आणि सीएनएन अमेरिका इथं न्यूज प्रोड्युसर म्हणूनही काम केलं होतं. एचसीएल हेल्थकेअरचे उपाध्यक्ष शिखर मल्होत्रा यांच्याशी 2010 मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांना अरमान आणि जहान हे दोन मुलगे आहेत.

हुरून रिच लिस्टनुसार, (Hurun Rich List) रोशनी नाडर या भारतातील सर्वांत श्रीमंत महिला आहेत. त्यांची एकूण संपत्ती 36 हजार 800 कोटी आहे. फोर्ब्स वर्ल्डच्या जगातील सर्वांत प्रभावशाली 100 महिलांच्या यादीत त्या 54 व्या स्थानावर आहेत. व्यवसाय तसेच समाजसेवा या दोन्ही क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार प्रपात झाले आहेत. फोर्ब्सच्या सलग 2017, 18 आणि 19 अशा तीन वर्षांच्या यादीत त्यांचे नाव समील होते. 2019 मध्ये त्या देशातील सर्वांत श्रीमंत महिला होत्या.

Published by: Meenal Gangurde
First published: December 3, 2020, 10:37 PM IST
Tags: women

ताज्या बातम्या