मुंबई, 13 जानेवारी : जीप इंडियाने (Jeep India) आपल्या कंपास या प्रीमियम एसयूव्हीवर जानेवारी महिन्यात 1.5 लाखांपर्यंत सवलत जाहीर केली आहे. नुकत्याच दाखल करण्यात आलेल्या जीप कंपासच्या (Jeep Compass) नव्या आवृत्तीनंतर जीप कंपासच्या जुन्या मॉडेलच्या विक्रीला चालना मिळावी या दृष्टीनं ही भरघोस सवलत देण्यात येत आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत ग्राहकांना या सवलतीचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे.
या अमेरिकन एसयूव्ही ब्रँडनं ही कार खरेदी करणाऱ्या महिला ग्राहकांसाठी काही अधिक फायदे देऊ केले आहेत. याबाबत अधिक माहिती जवळच्या जीप शोरूममध्ये मिळू शकते.
जीपच्या खरेदीदारांना मिळणाऱ्या लाभांमध्ये रोख रक्कम तसेच ईएमआय योजनांचा समावेश आहे. आता एखादी व्यक्ती दरमहा 22 हजार 823 रुपयांच्या ईएमआयवर ही एसयूव्ही कार खरेदी करू शकते. हायब्रिड ईएमआयचा पर्यायदेखील कंपनीनं दिला आहे.
जीप कंपासची नवी फेसलिफ्ट आवृत्ती या महिन्याच्या सुरूवातीस दाखल करण्यात आली. स्पोर्ट प्लस, लाँजिट्युड ऑप्शन, लिमिटेड प्लस, नाईट ईगल आणि ट्रेलहॉक अशा पाच प्रकारांमध्ये ही कार बाजारात येणार आहे. येत्या फेब्रुवारीमध्ये नवीन कार बाजारपेठेत दाखल होण्याची शक्यता आहे. फेसलिफ्ट आवृत्तीत जीप कंपास कारला नवीन फॉक्स स्किड प्लेट आणि नवीन अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.
160 बीएचपी आणि 250 एनएम असलेले 1.4 लीटरचे टर्बो पेट्रोल इंजिन आणि 170 बीएचपी आणि 350 एनएमसह 2.0 लिटर टर्बो डिझेल इंजिन अशा दोन प्रकारात ही कार उपलब्ध आहे. कारच्या डिझेल व्हेरियंटमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि 9-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असतील. दुसरीकडे, पेट्रोल इंजिन व्हेरियंटमध्ये 6- स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड ट्विन क्लच ऑटोमॅटिकसह दोन गिअरबॉक्स असतील.