Home /News /auto-and-tech /

इलेक्ट्रिक वाहनांना आग लागल्याच्या घटना का? DRDO चा महत्त्वाचा अहवाल

इलेक्ट्रिक वाहनांना आग लागल्याच्या घटना का? DRDO चा महत्त्वाचा अहवाल

भारतात गेल्या काही दिवसांमध्ये जसजशी इलेक्ट्रिक स्कूटर्सची संख्या वाढली, तशी या वाहनांना आग लागण्याच्या घटनाही समोर येऊ लागल्या आहेत. काही जणांचे मृत्यूही त्यामुळे झाले आहेत. या घटनांमागील नेमकं कारण आता समोर आलं आहे.

    नवी दिल्ली, 24 मे : इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooters) वापरणाऱ्यांच्या संख्येत देशात गेल्या काही दिवसांत भरपूर वाढ झाली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन पट जास्त म्हणजे 4,29,217 इतक्या ई-स्कूटर्सची विक्री झाली. आता पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमती आणि त्या तुलनेत ही वाहनं चालवण्यासाठी येणारा कमी खर्च ही यामागची काही कारणं आहेत. जसजशी इलेक्ट्रिक स्कूटर्सची संख्या वाढली, तशी या वाहनांना आग लागण्याच्या घटनाही समोर येऊ लागल्या. काही जणांचे मृत्यूही त्यामुळे झाले आहेत. याकडे गंभीरपणे पाहण्याची गरज ओळखून डीआरडीओने त्यामागची कारणं शोधली आहेत. वाहनातली बॅटरी चांगल्या दर्जाची नसेल, तसंच वेगवेगळ्या तापमानात या बॅटरीची तपासणी केलेली नसेल, तर आग लागू शकते, असं डीआरडीओनं (DRDO) त्यांच्या अहवालात म्हटलं आहे. याबद्दल माहिती देणारं वृत्त 'आज तक'ने प्रसिद्ध केलं आहे. इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटना वाढू लागल्यानं वाहनांच्या विक्रीवर परिणाम होऊ लागला. तसेच, जीविताचाही प्रश्न होता; त्यामुळे केंद्र सरकारने डीआरडीओच्या सीएफईईएस (CFEES) युनिटला तपासाचे आदेश दिले होते. डीआरडीओने तपासणी करून सरकारला अहवाल सादर केला असल्याचं सूत्रांनी 'बिझनेस टुडे'ला सांगितलं आहे. त्यांच्या अहवालानुसार, कमी दर्जाची बॅटरी व वेगवेगळ्या तापमानात बॅटरीची न झालेली चाचणी अशी कारणं आग लागण्यामागे असू शकतात. वाहनाची किंमत कमी करण्यासाठी वाहन निर्मिती कंपन्या चांगल्या दर्जाचं साहित्य वापरत नाहीत. त्यामुळे कंपन्यांसाठीचे नियम अधिक कडक करण्याची गरजही डीआरडीओने व्यक्त केली आहे. (परतूर शहरातील गल्लीला चक्क 'पाकिस्तान गल्ली' नाव, बबनराव लोणीकर संतापले) गेल्या वर्षभरात इलेक्ट्रिक स्कूटर्सना आग लागण्याच्या नऊ घटना घडल्या आहेत. त्यातल्या दुर्घटनाग्रस्त गाड्या ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) , ओकिनावा (Okinawa Autotech), प्युअर ईव्ही (Pure EV), बूम मोटर्स (Boom Motors), जितेंद्र इलेक्ट्रिक व्हेइकल्स (Jitendra Electric Vehicles) या कंपन्यांच्या होत्या. त्यामुळे या कंपन्यांना सरकारकडून गेल्या आठवड्यात समन्स बजावण्यात आले आहेत. त्यांना आपली बाजू मांडण्यास आणि स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आलं आहे. आगीच्या घटनांबाबत सरकारनं कठोर भूमिका घेतल्यानंतर आता वाहन कंपन्यांनी त्यांच्या अनेक दुचाकी परत घ्यायला सुरुवात केली आहे. ओला, ओकिनावा आणि प्युअर ईव्ही कंपनीनं त्यांच्या सुमारे 7 हजार स्कूटर्स परत घेतल्या आहेत. ओलानं त्यांच्या 1400 दुचाकी, प्युअर ईव्हीनं 2000, तर ओकिनावा कंपनीनं 3215 दुचाकी परत मागवल्या आहेत. सध्या दुचाकींच्या विक्रीमध्ये ई-स्कूटरचा वाटा 2 टक्के इतका आहे. 2030 पर्यंत हा वाटा 80 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळे त्यावर अधिक संशोधनाची गरज व्यक्त होत आहे. डीआरडीओच्या अहवालानंतर आता कंपन्या ई-स्कूटरमध्ये काही बदल करतील, अशी अपेक्षा आहे.
    First published:

    पुढील बातम्या