नवी दिल्ली, 04 सप्टेंबर : वाहनांच्या सुरक्षिततेबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर काही निकष निश्चित केलेले असतात. प्रत्येक वाहन कंपनीला (Auto Maker Company) आपलं नवीन वाहन बाजारपेठेत दाखल करण्यापूर्वी हे निकष पूर्ण करावे लागतात. अनेकदा आपण वाचतो की, एखाद्या कंपनीची गाडी सुरक्षा चाचणीत अपयशी ठरली. अशावेळी त्या वाहनाला विक्री करण्याची परवानगी मिळत नाही. काही वेळा कंपनीला वाहनात काही दोष असल्याची शंका आली तर वाहन कंपन्या स्वतःच ती वाहने ग्राहकांकडून परत घेते आणि त्यातील दोष दूर करून मगच ग्राहकांना देते. अलीकडेच भारतातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) आपल्या 5 विविध मॉडेल्सच्या 1 लाख 81 हजार कार्स (Cars) परत मागवल्या आहेत. या कार्सच्या पेट्रोल इंजिनमधील (Petrol Engine) दोष शोधण्यासाठी या कार्स परत मागवण्यात आल्या आहेत.
मारुती सुझुकी ही देशातील सर्वांत लोकप्रिय कार उत्पादक कंपनी आहे. सर्वसामान्य ग्राहकांना परवडणाऱ्या छोट्या कार्सपासून अलिशान कार्सपर्यंत अनेक कार्स ती उपलब्ध करत असते. कंपनीच्या सियाज (Ciaz), व्हिटारा ब्रेझा (Vitara Breza), एस-क्रॉस (S-Cross), अर्टिगा (Ertiga) आणि एक्सएल 6 (XL6) अशा पाच कार मॉडेल्सचे पेट्रोल इंजिन सदोष असण्याची शक्यता आहे. या बिघाडामुळे कारची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. हे लक्षात घेऊन कंपनीनं मे 2018 ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत विक्री झालेल्या या मॉडेल्सच्या एक लाख 81 हजार कार्स तपासणीसाठी परत मागवल्या आहेत. कंपनी या गाड्यांची तपासणी करेल आणि त्यात दोष आढळले तर ते दूर केले जातील आणि मग या कार्स ग्राहकांना परत दिल्या जातील, असं वृत्त एबीपीलाईव्ह डॉट कॉमनं दिलं आहे.
बापरे..! या स्मार्टफोनवर WhatsApp चालूच शकणार नाही; यादीत तुमचा फोन तर नाही ना?
कंपनीनं 4 मे 2018 ते 27 ऑक्टोबर 2020 दरम्यान तयार झालेल्या सियाज, व्हिटारा ब्रेझा, एस-क्रॉस, अर्टिगा आणि एक्सएल 6 या मॉडेल्सच्या कार्स परत मागवल्या असून, त्यांच्या मोटर जनरेटर युनिटची तपासणी केली जाईल. त्यात दोष आढळले, तर कंपनी ग्राहकाकडून कोणतेही पैसे न घेता ती दुरुस्ती करेल आणि नोव्हेंबरपासून ग्राहकांना त्यांच्या कार्स परत दिल्या जातील. तोपर्यंत, ग्राहकांनी आपल्या कार पाण्यातून चालवू नयेत, तसंच इलेक्ट्रिक पार्टसवर थेट पाणी ओतू नये किंवा फवारू नये अशा सूचना कंपनीने केल्या आहेत.
मोदी सरकारला हवीये तुमची एक छोटीशी मदत; 50 हजार रुपयांचं बक्षीसही जारी
ग्राहकांना आपली गाडी कंपनीच्या या रिकॉल प्रक्रियेचा (Recall Process) भाग आहे की नाही, याची माहिती हवी असेल तर कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा मारुती नेक्साच्या वेबसाइटवर जाऊन ही माहिती घेता येईल, असं कंपनीनं जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.