मुंबई, 17 नोव्हेंबर: इलेक्ट्रॉनिक वस्तू, स्पेअर पार्ट्ससह भारतातील बऱ्याचशा मार्केटवर चीनचं वर्चस्व सिद्ध होत आहे. अशातच भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रातही चीनची इंट्री होत आहे. चीनमधील QJMotor ही कंपनी भारतात आता एक, दोन नव्हे तर चार बाईक लाँच करणार आहे. क्यू जे मोटार ही बाईक निर्माती कंपनी Benelli या कंपनीची सिस्टर ब्रँड आहे. Qianjiang ग्रुपअंतर्गत या दोन्ही कंपन्या काम करतात. विशेष म्हणजे लाँच केल्या जाणाऱ्या चारही बाईक या 250 सीसी ते 500 सीसी क्षमतेच्या असणार आहेत.
पेट्रोलचे दर कितीही वाढले तरी बाईकप्रेमींची संख्या काही कमी होत नाही. बाजारात येणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या बाईक्सना तरुणाईकडून चांगली पसंती मिळत असते. भारतातील बाईक प्रेम पाहता चीनच्या ऑटोमोबाइल कंपनीकडून लाँच केल्या जाणाऱ्या बाईकना पसंती मिळेल, अशी आशा कंपनीला आहे.
SRC 500-
क्यू जे मोटार ही कंपनी SRC 500 ही पहिली बाईक लाँच करणार आहे. याचा रेट्रो लूक भल्याभल्यांना भुरळ घालू शकतो. या बाईकचं इंजिन 480 सीसीचं असेल. शिवाय 25.8hp आणि 36Nm पासून 40 Nm चा टॉर्क यातून जनरेट होईल. बाईकला गोल हेडलाईट आणि गोल मीटर आहे. व्हिंटेज फ्युएल टँक पाहताक्षणी लक्ष वेधून घेतो. बाईकला डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.
SRC 250-
कंपनीकडून SRC 250 ही दुसरी बाईक लाँच केली जाणार आहे. या बाईकचं पूर्ण नाव SRC 250 (QJ250-9) असं आहे. या बाईकला 249 सीसीचं इंजिन दिलं गेलं आहे. या शिवाय बाईकला ट्विन सिलिंडर इंजिन असणार आहे. ब्रेकिंग सिस्टीम अतिशय उत्तम असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. सुरक्षित आणि प्रवासाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर ही बाईक एक उत्तम पर्याय ठरू शकतो, असं कंपनीचं म्हणणं आहे. बाईकचं सीट लांब आणि आरामदायी आहे. बाईकस्वाराच्या पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीलाही व्यवस्थित बसता येईल, याची दक्षता कंपनीकडून घेण्यात आली आहे.
हेही वाचा: Royal Enfield ची सर्वात पॉवरफुल बाईक लवकरच होणार लाँच, पाहा Photos
SRK 400-
क्यू जे मोटार कंपनीकडून त्यांची तिसरी बाईक SRK 400 लाँच केली जाणार आहे. बाईकचा लूक अगदी शॉर्प आहे. स्ट्रीटफायटर बाईक म्हणूनही या बाईकला ओळखलं जातं. ही बाईक दिसण्यामध्ये थोडीफार KTM390 ड्यूकप्रमाणे दिसते. बाईकचं वजन 186 किलोग्रॅम इतकं आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्मिती झालेली ही बाईक मॉर्डन स्टायलिंगची आहे. याला ड्युएल प्रोजेक्टर एलईडी हेडलाईट, एलईडी टेललाईट आणि इंडिकेटर्स आहेत.
SRV300-
QJMotor ची चौथी बाईक SRV300 ही आहे. लाईटवेट रोडस्टर बाईक म्हणून याची ओळख आहे. ही बाईक हार्ले डेव्हिडसनसारखी दिसते. बाईकचं इंजिन 296 सीसीचं असून यात 6 स्पीड गियर बॉक्स आहेत. हिला डबल डिस्क ब्रेक असून, ही बाईक 26Nm चा टार्क जनरेट करते.
दरम्यान, वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करण्यासाठी आणि बाईकस्वारीची हौस फेडून घ्यायची असेल तर क्यू जे मोटार कंपनी भारतात लाँच करत असलेल्या चारही मॉडेलच्या बाईक सर्वांच्या पसंतीला उतरतील, अशी आशा कंपनीला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bike