Home /News /aurangabad /

मित्रांच्या मदतीने सख्ख्या भावाचा घोटला गळा; पोलिसांनाही दिला गुंगारा, बहिणीमुळे झाली अटक

मित्रांच्या मदतीने सख्ख्या भावाचा घोटला गळा; पोलिसांनाही दिला गुंगारा, बहिणीमुळे झाली अटक

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

Crime in Aurangabad: नवीन वर्षाच्या पहिल्याचं दिवशी औरंगाबाद जिल्ह्याच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील एका पडक्या वाड्यात अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला होता.

    औरंगाबाद, 05 जानेवारी: नवीन वर्षाच्या पहिल्याचं दिवशी औरंगाबाद जिल्ह्याच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील एका पडक्या वाड्यात अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला होता. बेवारस स्थितीत कुजलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळल्याने मृत नेमका कोण आणि त्याच्यासोबत काय घडलं? याबाबत गूढ बनलं होतं. तेव्हापासून वाळूज पोलीस या गुन्ह्याचा तपास करत होते. पण पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हतं. याप्रकरणी आरोपीच्या बहिणीने सिल्लोड पोलिसांकडे खुलासा केल्यानंतर या घटनेचं गूढ उलगडलं आहे. भावानेच आपल्या मित्रांच्या मदतीने संबंधित तरुणाची हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी सिल्लोड पोलिसांनी आरोपी भावाला आणि त्याच्या साथीदार मित्राला औरंगाबाद येथून अटक केली आहे. अन्य एक आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. गणेश रोहिदास वानखेडे आणि मित्र सुमित विजय सुतार असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. सिल्लोड पोलीस दोन्ही आरोपींची कसून चौकशी करत असून या घटनेचा पुढील तपास केला जात आहेत. हेही वाचा-बुलडाणा: पळून जाऊन लग्न करणं पडलं महागात;पोलीस ठाण्याच्या परिसरात तरुणाला भोकसलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अमोल रोहिदास वानखेडे याला दारूचं व्यसन होतं. दारू पिऊन आल्यानंतर तो नेहमी आईला, भावाला आणि कुटुंबातील इतर सदस्यांना त्रास द्यायचा. गेल्या बऱ्याच काळापासून अमोल कुटुंबीयांचा छळ करत होता. त्यामुळे आरोपी गणेश हा भावाच्या त्रासाला कंटाळला होता. यातूनच त्याने भावाची हत्या करण्याचा कट रचला. या कटात त्याने आपल्या दोन मित्रांना देखील सामील करून घेतलं. त्यानंतर औरंगाबाद मधील हनुमान नगर येथील आपल्या घरात आरोपीनं मित्राच्या मदतीने भावाचा गळा घोटला. हेही वाचा-हसत्या खेळत्या लेकराचा अज्ञाताने चिरला गळा;बीडमधील माणुसकीला काळिमा फासणारी घटना भावाची हत्या केल्यानंतर आरोपींनी मृत अमोलचा मृतदेह वाळूज एमआयडीसी परिसरातील एका पडक्या वाड्यात नेऊन टाकला. ही घटना 7 डिसेंबर रोजी घडली होती. त्यानंतर एक जानेवारी रोजी म्हणजेच जवळपास 25 दिवसांनी वाळूज पोलिसांना बेवारस स्थितीत कुजलेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडला. कोणताच पुरावा नसल्याने पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. त्यामुळे आरोपी पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाले होते. पण आरोपीनं अलीकडेच 'मीच भावाची हत्या केली' अशी कबुली बहिणीकडे दिली. यानंतर बहिणीने आणि आईने सिल्लोड पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेची माहिती दिली आहे. मृत तरुणाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी भाऊ गणेश आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aurangabad, Crime news, Murder

    पुढील बातम्या