औरंगाबाद, 10 एप्रिल : औरंगाबादमध्ये चोरट्यांनी थेट उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाचं कुलूप फोडून दारूचे बॉक्स लंपास केले आहे. विभागानं जप्त केलेल्या दारुवर चोरट्यांनी डल्ला मारला असून याठिकाणाहून जवळपास अडिच लाख रुपयांची दारू त्यांनी चोरून नेली असल्याची माहिती मिळाली आहे.
वाचा - 'संपूर्ण राज्यासाठी एकच निर्णय घेतला जाईल', अजित पवारांकडून कडक लॉकडाऊनचे संकेत?
औरंगाबादेत शासकीय दूध डेअरी परीसराच्या मागच्या बाजुला शासकीय कार्यालये आहेत. उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाबरोबर इतरही काही शासकीय कार्यालयं इथं आहेत. याठिकाणी असलेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात अवैध दारु विक्री करणाऱ्यांविरोधात केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आलेली दारु ठेवलेली असते. यात अनेक वर्षांपासूनच्या जप्त देशी-विदेशी दारुचा समावेश असतो. याठिकाणी सुरक्षारक्षकांचा कडक पाहाराही असतो. मात्र तरीही चोरट्यांनी या ठिकाणी चोरी करत दारुचे बॉक्स पळवले. पत्रे उचकटून चोरट्यांनी ही चोरी केली आहे. हा चोरीचा प्रकार समोर आल्यानं पोलिसांत तक्रार देऊन याचा तपास सुरू करण्यात आला. लोकमतनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
वाचा - इथून पुढे भीक मागणं गुन्हा नसणार? SC नं महाराष्ट्रासह 5 राज्यांना मागितलं उत्तर
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना संशयितांच्या घराबाहेर दारुच्या काही रिकाम्या बाटल्या आढळल्या. या बाटल्या जवळपास 4 वर्षे जुन्या होत्या. त्यावरून पोलिसांना संशय आला आणि पोलिसांना संशयावरून पवन चावरिया यांच्या घरावर छापा मारला. त्याच्या घरातून दारुचे सात बॉक्स जप्त करण्यात आले. त्याशिवाय त्याच्याकडून इतर आरोपींची नावंही समजली. राहुल घुसर, सूरच चावरिया आणि गोकुळ कागडा ही नावं त्यातून समोर आली. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केलीय. मात्र कडक पाहारा असूनही अशाप्रकारे चोरीचा प्रकार घडल्याने या प्रकरणी चर्चांना उधाण आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad News, Crime news