चाळीसगाव, 08 ऑक्टोबर: कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मागील पावणे दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. अनेक विद्यार्थी पुन्हा आनंदानं शाळेत जाऊ लागले आहेत. अशात सोशल मीडियावर एक फोटो वेगानं व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये एक हात नसलेला व्यक्ती सायकलवरून आपल्या मुलीला शाळेत सोडायला जात असताना दिसत आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर पुण्यातील एका शिक्षकानं संबंधित मुलीला शाळेत जाण्यासाठी नवी कोरी सायकल भेट दिली आहे. यामुळे एक हात नसलेल्या वडिलांच्या डोक्यावर काहीसा भार कमी झाला आहे.
संबंधित मुलीचं नाव पूजा कोळी असून तिचे वडील सुनिल कोळी यांना एक हात नाहीये. एक हात नसला तरी सुनिल कोळी हे आपल्या मुलीला रोज शाळेत सोडवायला आणि आणायला जातात. पूजा ही इयत्ता सातवीत शिक्षण घेते. दरम्यान शाळेत जात असताना, चाळीसगावचे छायाचित्रकार सागर खेडकर यांनी हा बापलेकीचा प्रवास आपल्या कॅमेऱ्यात टिपला. मंगळवारी हा फोटो दिव्य मराठी वृत्तप्रत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला.
हेही वाचा-NDA पाठोपाठ आता राष्ट्रीय मिलिट्री कॉलेज आणि शाळांमध्ये मिळणार महिलांना प्रवेश
चाळीसगाव येथील जिल्हा परिषदेचे शिक्षक नितीन खंडाळे यांनी देखील हा फोटो शिक्षकांच्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केला. यावेळी हा फोटो पुण्यातील शिक्षक बाळासाहेब कानडे यांनी पाहिला. यानंतर त्यांनी खंडाळे यांच्याशी संपर्क साधून संबंधित मुलीला सायकल भेट द्यायची असल्याचं बोलून दाखवलं. तसेच त्यासाठी लगेच पैसेही पाठवले. दुसऱ्याच दिवशी खंडाळे यांनी नवीन सायकल विकत घेत पूजाला दिली आहे.
हेही वाचा-ISRO Online Course: ISRO नं आणला 5 दिवसांचा ऑनलाईन सर्टिफिकेशन कोर्स
पूजाची शाळा तिच्या घरापासून तीन किमी अंतरावर आहे. शाळा दूर असल्याने वडील सुनिल कोळी एक हात नसूनही आपल्या लेकीला शाळेत सोडायला नेहमी जातात. पण दिव्य मराठीनं एक फोटो प्रसिद्ध केल्यानं पूजाला सायकल मिळाली आहे. यामुळे आपल्या वडिलांचा बराचसा त्रास कमी होईल, असं पूजानं यावेळी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad