औरंगाबादेत बनावट ई-मेलद्वारे स्टील कंपनीच्या संचालकाला लुबाडलं; 36 लाखांचा घातला गंडा

औरंगाबादेत बनावट ई-मेलद्वारे स्टील कंपनीच्या संचालकाला लुबाडलं; 36 लाखांचा घातला गंडा

Cyber Crime in Aurangabad: औरंगाबाद एका स्टील कंपनीच्या संचालकाला तब्बल 36 लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सायबर भामट्याने बनावट ई-मेल आयडीचा वापर करत संचालकाला गंडा घातला आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 24 नोव्हेंबर: गेल्या काही काळापासून देशात सायबर गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सायबर चोरटे नागरिकांना लुबडण्यासाठी विविध प्रकारच्या पद्धती अवलंबत आहेत. कोरोना काळास सायबर फसवणुकीची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. यानंतर आता औरंगाबाद येथील एका स्टील कंपनीच्या संचालकाला तब्बल 36 लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सायबर भामट्याने बनावट ई-मेल आयडीचा वापर करून संचालकांच्या अकाउंटमधून 36 लाख रुपये अन्य चार खात्यात पाठवण्यास भाग पाडलं आहे.

आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर, स्टील कंपनीचे सरव्यवस्थापक विवेक प्रभाकरराव घारे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर भामट्याने आर. एल. स्टील्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीचे संचालक नितीन गुप्ता यांच्या नावानं बनावट ई-मेल आयडी तयार केला होता.

हेही वाचा-जळगावातील बँकेत 'मनी हाइस्ट' स्टाइल दरोडा; तिघांनी 3 कोटींचं लुटलं सोनं, पण...

या ई-मेल आयडीचा वापर करत आरोपीनं पंजाब नॅशनल बँकेत ईमेल पाठवला होता. एवढंच नव्हे तर आरोपीनं बँकेच्या व्यावस्थापकाला फोन करून आपण नितीन गुप्ता बोलत असल्याची खात्री पटवून दिली. तसेच विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीनं बँक व्यावस्थापकाला आरटीजीएसद्वारे रंजित कुमार गिरी, मनोज कुमार, परशुनदास आणि शंकर जैन यांच्या खात्यांवर 36 लाख 12 हजार 287 रुपयांची रक्कम पाठवण्यास भाग पाडलं आहे.

हेही वाचा-पतीच्या हत्येसाठी ऑनलाईन वेबसाईटवरुन बुक केला 'किलर'; महिलेसोबत पुढे घडलं भलतंच

हा प्रकार लक्षात आल्यानंतर आर. एल. स्टील अँड एनर्जी लिमिटेड कंपनीचे सरव्यवस्थापक विवेक प्रभाकरराव घारे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी सायबर पोलिसांनी एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे सायबर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

Published by: News18 Desk
First published: November 24, 2021, 2:18 PM IST

ताज्या बातम्या