औरंगाबाद, 1 मे : मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) याचा जाऊ तिथं खाऊ हा चित्रपट तुम्हाला आठवतो का? प्रशासनावर कडक प्रहार करण्यासाठी यात नायक त्याची विहीर चोरी झाल्याची तक्रार करतो आणि भ्रष्टाचाऱ्यांची भांडाफोड होते. अगदी हुबेहूब असाच सीन औरंगाबादच्या (Aurangabad) अजिंठ्यात (Ajantha) घडला आहे. प्रशासनानं केलेल्या चुकीमुळं एका शेतकऱ्याचा विहिरीचा प्रस्ताव वारंवार नामंजूर होत होता. त्यावर पर्याय म्हणून हे अस्त्र शेतकऱ्यानं वापरलं.
औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठ्यामध्ये अनाड नावाचं गाव आहे. याठिकाणचे शेतकरी बावराव गदाई यांनी चक्क पोलिसांत विहीर हरवल्याची तक्रार दिली आहे. तलाठ्यांनी स्वतः शेतात विहीर असल्याची नोंद सातबाऱ्यावर केली. मात्र आता माझी विहीरच हरवली आहे. या विहिरीत पाच परस पाणी होतं आणि त्या पाण्यावर मिरचीचं पिक मी घेणार होतो. त्यामुळं मोठं संकट कोसळलं असून माझी विहीर शोधून द्यावी अशी तक्रार त्यांनी पोलिसांत दिली. आता अशा तक्रारीनं सगळेच बुचकाळ्यात पडले. गदाई यांनी अशी तक्रार का दिली याचा शोध सुरू झाला आणि मग समोर आली खरी परिस्थिती.
(हे वाचा-बीडमध्ये बोगस HRCT स्कोर देणारे रॅकेट सक्रिय, वंचित आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार )
शक्कल कामी आली
भावराव गदाई यांची गदाई शिवारामध्ये शेती आहे. शेतीमध्ये उत्पन्नात वाढ होण्यासाठी पाण्याचा स्त्रोत अत्यंत गरजेचा आहे. त्यामुळं गदाई यांनी शेतात विहीर घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी अनेकदा अर्ज केले. पण त्यांचा अर्ज वारंवार नाकारला जात होता. गदाई यांच्या शेतात एक बोअरवेल आहे. पण त्यांच्या सातबाऱ्यावर विहिर असल्याची नोंदही तलाठ्यांनी केली होती. त्यामुळं त्यांचा विहिरीचा अर्ज मंजूर होत नव्हता. ही नोंद दुरुस्त करण्यासाठी त्यांनी अनेकदा विनंती अर्ज केले. पण त्याचा फायदा झाला नाही. अखेर गदाई यांनी हा खास मार्ग अवलंबला आणि त्यांना यशही आलं.
(वाचा-अमरावती पॅटर्न ठरतोय हिट! डब्ब्यात चिट्ठी टाकून घरी जा, असं होईल Vaccination)
या प्रकारानंतर तलाठ्यांनी शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर तांत्रिक अडचणीमुळं चुकून विहीर असल्याची नोंद झाल्याचं स्पष्ट केलं. ही चूक दुरुस्त करण्यासाठी अहवाल वरिष्ठांकडे पाठवला असून दोन दिवसांत त्यावर कारवाई होईल असं सांगण्यात आलं. त्यामुळं गदाई यांची ही शक्कल त्यांच्या चांगलीच कामी आली. त्यामुळं कागदोपत्री दाखवलेली विहीर भविष्यात त्यांच्या जमिनीवर खरंच निर्माण होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad News, Farmer