Home /News /aurangabad /

नेमकं काय आहे औरंगाबदच्या 14 वर्षीय दीक्षाच्या NASA फेलोशिपचं सत्य? वाचा सविस्तर

नेमकं काय आहे औरंगाबदच्या 14 वर्षीय दीक्षाच्या NASA फेलोशिपचं सत्य? वाचा सविस्तर

गेल्या आठवड्यात औरंगाबादमधील दीक्षा शिंदे या विद्यार्थिनीची स्टोरी व्हायरल झाली होती. महाराष्ट्राच्या लेकीने थेट जगभरातल्या विद्यार्थ्यांमध्ये बाजी मारल्याचं वृत्त होतं

    औरंगाबाद, 26 ऑगस्ट: गेल्या आठवड्यात औरंगाबादमधील दीक्षा शिंदे या विद्यार्थिनीची स्टोरी व्हायरल झाली होती. महाराष्ट्राच्या लेकीने थेट जगभरातल्या विद्यार्थ्यांमध्ये बाजी मारल्याचं वृत्त होतं. अशी बातमी होती की जगातल्या सर्वांत मोठ्या अवकाश संशोधन केंद्रात पॅनलिस्ट म्हणून तिची निवड झाली आहे. औरंगाबादच्या 14 वर्षांच्या दीक्षाने 14 व्या वर्षी तिने लिहिलेला black holes and God या विषयावरील शास्त्रीय निबंध NASA ने प्रकाशित केला आहे आणि आता त्यांनी MSI फेलोशिपसाठी तिची निवड (NASA's MSI Fellowships Virtual Panel) केल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान हे वृत्त वेगाने सर्वत्र पसरले होते. ANI ने देखील या संदर्भात वृत्त दिले होते. दरम्यान ही स्टोरी जेव्हा व्हायरल झाली तेव्हा अनेकांनी यासंदर्भात करण्यात आलेल्या दाव्याची तपासणी केली. दरम्यान Boom Live ने दिलेल्या वृत्तानुसार हे दावे खोटे आहेत. नासाच्या अधिकार्‍यांनी बूमला दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यक्षात दीक्षाची तृतीय पक्ष सेवेद्वारे 'तज्ज्ञ पॅनेलिस्ट' म्हणून निवड झाली होती, मात्र तिची झालेली निवड तिची पार्श्वभूमी आणि क्रेडेन्शियलबाबत चुकीच्या माहितीवर आधारित होती. तिच्याकडून कोणताही शोधनिबंध स्वीकारणे, किंवा तिला नोकरी, फेलोशिप देणे किंवा अमेरिकेत येण्यासाठी फंड देण्याचे दावे नासाने फेटाळून लावले. नासाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार NASA सध्या संभाव्य पॅनेलिस्टच्या पार्श्वभूमीची पडताळणी करण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेत आहे. दरम्यान असे वृत्त विविध प्रसारित करण्यात आले होते की, औरंगाबादेच्या दीक्षा शिंदेने मोठं यश मिळवलं आहे. तिने Black holes and God या थिअरीवर लिहिलेल्या निबंधाला NASA कडून दखल घेतली गेली आहे, पण हा दावा आता फेटाळण्यात आला आहे. दीक्षाचा शास्त्रीय लेख NASA ने त्यांच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केल्याचंही यात नमुद करण्यात आलं होतं. दीक्षानेच याबाबतची माहिती ANI ला दिली होती. इंटरनॅशनल जर्नल फॉर सायंटिफिक अँड इंजीनिअरिंग रिसर्च (IJSER) य़ासाठी दीक्षाने एक शोधनिबंध लिहिला होता. आपण कृष्णविवरात राहतो का? (We live in Black hole?) या शीर्षकाखाली तिने मे महिन्यात लिहिलेला हा प्रबंध NASA ला पसंत पडला असल्याचं हे वृत्त होतं. बूम लाइव्हच्या वृत्तानुसार, आणखी एका नासाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, Black holes and God हा विषय NASA साठी अप्रासंगिक आहे. आणि असे पेपर्स स्विकारले जात नाहीत. ANI या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिल्यानंतर अनेक मीडिया हाऊसनी ही बातमी दिली होती. दरम्यान एएनआय एडिटर स्मिता प्रकाश यांनी मुळ बातमी बरोबर असल्याचं सांगणारं ट्वीट त्यानंतर केलं होतं. ही स्टोरी फेक नसून आम्ही त्याविषयी ठाम आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. ही बातमी व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून दीक्षाचं कौतुक केलं जात होतं. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही आम्हाला तुझा अभिमान वाटतो दीक्षा असं म्हणत तिचं कौतुक केलं होतं. दरम्यान सोशल मीडियावर अनेकांनी ट्वीट करत दीक्षाला फेलोशिप मिळाल्याचं वृत्त फेटाळलं आहे. अनेकांनी यासंदर्भात शेअर करण्यात आलेली कागदपत्र आणि रिसर्च पेपरवरील माहिती चुकीची असल्याचं म्हटलं आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Aurangabad

    पुढील बातम्या