Home /News /astrology /

जुलैमध्ये आहे लग्नाचा शेवटचा मुहूर्त! चातुर्मासात होणार नाहीत शुभ कार्य; जाणून घ्या तारखांची यादी

जुलैमध्ये आहे लग्नाचा शेवटचा मुहूर्त! चातुर्मासात होणार नाहीत शुभ कार्य; जाणून घ्या तारखांची यादी

हिंदू पंचांगानुसार 8 जुलैनंतर विवाहसोहळे होणार नाहीत. त्यामुळे त्यानंतर शुभ कार्यासाठी नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळेच जुलै महिन्यात लग्न उरकून घ्या. काय आहेत शुभ मुहूर्त जाणून घ्या.

मुंबई, 28 जून:  यंदा म्हणजेच 2022 या वर्षातील पहिल्या सहामाहीत लग्नाचे खूप मुहूर्त होते. दोन वर्षानंतर कोरोना (Corona) निर्बंधातून मुक्ती मिळाल्यानंतर धूमधडाक्यात विवाह (weddings) झाले. मात्र, आता लग्नाचे मुहूर्त नसल्याने लग्नसराई थांबणार आहे. होय, हिंदू पंचांगानुसार 8 जुलैनंतर विवाहसोहळे होणार नाहीत. त्यामुळे त्यानंतर शुभ कार्यासाठी नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. देवशयनी एकादशीला भगवान विष्णू आणि इतर देवता योगनिद्रेत जातात आणि प्रबोधिनी एकादशीला जागे होतात, असं मानलं जातं. त्या काळातील ते चार महिने म्हणजे चातुर्मास होय.
10 जुलै 22 रोजी देवशयनी एकादशी आहे. या तिथीला भगवान विष्णू चार महिने योगनिद्रात जातात. त्यामुळे हिंदू (Hindu Religion) या चार महिन्यांत कोणतंही शुभ कार्य करत नाहीत. यानंतर प्रबोधिनी एकादशीला शुभ मुहूर्त पुन्हा सुरू होतात. त्यामुळे तुम्हाला कोणतंही शुभ कार्य करायचं असल्यास ते 9 जुलैपूर्वी करून घ्या. नाहीतर पुढचे चार महिने तुम्हाला शुभ कार्य करता येणार नाही. पुढच्या चार महिन्यांत कोणते शुभ कार्य केलं जात नाही आणि कोणत्या दिवसापासून पुन्हा शुभ कार्य करता येतील, हे जाणून घ्या. याबद्दल एबीपी लाईव्हने वृत्त दिलंय.
यंदाचे उर्वरित विवाह मुहूर्त
  • जुलै - 3, 5, 6, 8
  • नोव्हेंबर - 21, 24, 25, 27
  • डिसेंबर- 2, 7, 8, 9, 14
  • हिंदू पंचांगानुसार 2022 या वर्षात जुलै, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांत विवाहासाठी एकूण 13 मुहूर्त आहेत.
 
कोणती शुभ कार्य चातुर्मासात केली जात नाहीत?
10 जुलै 2022 पासून देवशयनी एकादशीला भगवान विष्णू निद्रावस्थेत जातील आणि 4 नोव्हेंबर 2022 रोजी ते प्रबोधिनी एकादशीला झोपेतून जागे होतील. चातुर्मास सुरू झाल्यानंतर विवाह (Weddings), साखरपुडा (Engagement), गृह प्रवेश, जावळ, मुंज आणि इतर शुभ कार्यं केली जात नाहीत. सूर्यदेवाला प्रत्यक्ष देवता मानलं जातं. जेव्हा दक्षिणायन असतं तेव्हा सूर्यदेव दक्षिणेकडे झुकलेले असतात. म्हणून या चार महिन्यांच्या काळात शुभ कार्य केली जात नाहीत.
चातुर्मासात कोणती शुभ कार्ये केली जातात?
मान्यतेनुसार दक्षिणायनाचा काळ ही देवतांची रात्र मानली जाते. दक्षिणायन हे नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं आणि उत्तरायण हे सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. दक्षिणायनमध्ये सूर्य देव कर्क ते मकर राशीपर्यंत सहा राशींमधून भ्रमण करतात. यादरम्यान पितरांची पूजा आणि स्नान-दानाचं खूप महत्त्व आहे. दक्षिणायन काळात उपवास करणं, उपासना करणं आणि तांत्रिक साधना करणं फलदायी मानलं जातं. जेव्हा सूर्य पूर्वेकडून दक्षिण दिशेकडे जातो तेव्हा आरोग्याच्या दृष्टीने हा काळ वाईट असतो, अशी मान्यता आहे. म्हणूनच चातुर्मासात भोजनाकडे विशेष लक्ष द्यावं, असं सांगितलं जातं.
अशा रितीने यंदाचे उर्वरित शुभ मुहूर्त आहेत. तुम्हाला कोणतंही शुभ कार्य करायचं असेल तर ते 10 जुलैपूर्वी करून घ्या नाहीतर तुम्हाला नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
First published:

Tags: Marriage

पुढील बातम्या