मुंबई, 24 डिसेंबर : शनी (Saturn) आणि साडेसाती (Sadesati) म्हटलं की प्रत्येक जण भयभीत होतो. अर्थात यामागे अनेक कारणं आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार (Jyotish Shastra), प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यात शनिच्या साडेसातीचा सामना हा करावाच लागतो. साडेसातीच्या काळात माणसाला अपयश, अनारोग्य, खर्च, नुकसान, अप्रतिष्ठा अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं, असा एक समज जनमानसात दिसून येतो. त्यामुळे साडेसातीदरम्यान शनि महाराजांना प्रसन्न करुन घेण्यासाठी संबंधित व्यक्ती अनेक आध्यात्मिक उपाय करते.
शनिचा प्रकोप कमी व्हावा, साडेसाती त्रासदायक ठरू नये यासाठी निरनिराळी व्रतवैकल्यं करण्याकडेही अनेकांचा कल असतो. शनि महाराजांना प्रसन्न करण्याची एक संधी तुम्हाला या महिन्याच्या अखेरीस मिळणार आहे. या दिवशी शनि पूजन केल्यास तुम्हाला नक्कीच दिलासा मिळू शकेल. कारण या दिवशी एक विशेष योग होत आहे. या योगावर शनिचे पूजन केल्यास ते विशेष फलदायी ठरू शकतं.
झी न्यूजच्या रिपोर्टनुसार शनि महाराजांची कृपादृष्टी राहावी यासाठी त्यांचे पूजन करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी 25 डिसेंबर (शनिवार) हा दिवस महत्त्वाचा असेल.
हे वाचा - वर्षातील शेवटचा प्रदोष व्रत; भगवान शंकराच्या पूजेने द्या सरत्या वर्षाला निरोप
25 डिसेंबर अर्थात शनिवारी उत्तर भारतात प्रचलित हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी आहे. या दिवशी चंद्र (Moon) सूर्याच्या सिंह राशीत (Leo) असेल. तसंच या दिवशी सकाळी 11 वाजून 23 मिनिटांपर्यंत प्रीती योग आहे. यानंतर आयुष्मान योग असेल. हे दोन्ही योग शनि पूजनासाठी सर्वात चांगले मानले जातात. या दिवशी शनि पूजन केल्यास अधिक चांगलं फळ मिळू शकतं, असं जाणकार सांगतात.
हे वाचा - Shani Rashi Parivartan 2022: नवीन वर्षात कुंभ राशीत प्रवेश करणार शनी, 'या' राशींना असेल साडेसाती
या दिवशी शनिशी संबंधित कोणत्याही वस्तू दान कराव्यात. तसंच गरीब, असहाय्य व्यक्तींना मदत केल्यास तुम्हाला अधिक लाभ होऊ शकतो. या दिवशी शनिला मोहरीचं तेल (Mustard oil) अर्पण करून, शनि मंत्र किंवा शनि चालिसाचं (Shani Chalisa) पठण करावं. तसेच शनिवारी शनि मंदिरात जाऊन शनिचे पूजन करावं. हे पूजन करताना तुम्ही शनी मूर्तीच्या अगदी समोर उभं न राहता, थोडसं बाजूला उभं राहावं. हे उपाय केले असता, तुमच्यावर शनिची कृपादृष्टी होईल आणि तुमच्या सर्व अडचणी दूर होण्यास मदत होईल असं जाणकारांनी सांगितलं आहे.
(सूचना - ही माहिती सर्वसामान्य ज्योतिषशास्त्र माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.