...तर युद्धाचा भडका अटळ, रशियाचं अमेरिकेला प्रत्युत्तर

सिरियातल्या रासायनिक अस्त्रांच्या वापरावरून आता रशियानंही अमेरिकेला प्रत्युत्तर दिलंय. अमरिकेनं सिरियात हल्ला केल्यास युद्धाचा भडका अटळ आहे अशा इशारा रशियानं दिलाय.

Ajay Kautikwar | News18 Lokmat
मॉस्को,ता.13 एप्रिल: सिरियातल्या रासायनिक अस्त्रांच्या वापरावरून आता रशियानंही अमेरिकेला प्रत्युत्तर दिलंय. अमरिकेनं सिरियात हल्ला केल्यास युद्धाचा भडका अटळ आहे अशा इशारा रशियानं दिलाय.सिरियातल्या युद्धामुळं जगातल्या दोन महासत्तांमधला तणाव आता शिगेला पोहोचलाय. सिरियातल्या डूमा शहरावर सरकार समर्थक लष्करानं केलेल्या हल्ल्यात 80 जणांचा मृत्यू झाला होता. हा हल्ल्यात रासायनिक शस्त्रांचा वापर केल्याचा आरोप अमेरिकेनं केलाय. या हल्ल्यात लहान मुलं आणि महिलांचा मोठा प्रमाणावर मृत्यू झाला होता. त्यामुळं संतप्त झालेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला थेट युद्धाचीच धमकी ट्विटरवरून दिलीय.यापुढं रशियानं सिरियात क्षेपणास्त्र डागल्यास, अमेरिका ते क्षेपणास्त्र पाडून टाकेल...असं करण्यापूर्वी रशियानं सावध राहावं...दोन्ही देशांचे संबंध सध्या विकोपाला गेले असून शितयुद्धाच्या काळातही हे संबंध एवढे ताणले गेले नव्हते असं ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

तर अमेरिकेच्या या धमकीला रशियानंही प्रत्युत्तर दिलंय...अमेरिकेनं सिरियात हल्ला केल्यास युद्धाचा भडका उडू शकतो असा इशारा संयुक्त राष्ट्रातले रशियाचे राजदूत वसिली नेबिंजिया यांनी दिलाय. काय होईल हे आत्ताच काहीही सांगता येणार नाही, काहीही घडू शकते असा इशाराही त्यांनी दिला.परिस्थिती निवळण्यासाठ आता ब्रिटन आणि फ्रान्सनेही पुढाकार घेतलाय. ट्रम्प यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे आणि फ्रान्सचे अध्यक्ष इम्यान्यूएल मॅक्रॉन यांच्याशी फोनवरून चर्चाही केलीय. ज्या शहरांत सिरियानं हल्ला केला तिथला फॉरेन्सिक अहवाल अमेरिकेनं तयार केलाय. त्यात मृतांच्या शरीरात घातक रसायनांचे अवशेष आढळून आले आहेत. त्यामुळं रासायनिक हल्लाच झाल्याचं स्पष्ट होत असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे.सिरियात गेल्या आठ वर्षांपासून तुंबंळ युद्ध सुरू आहे. आयसीस, सरकार समर्थक सेना आणि सरकारला विरोध करणारे बंडखोर असा तिरंगी सामना सुरू असून त्यात लाखो नागरिकांचा जीव गेलाय. तर अनेक मोठी शहरं उद्धवस्त झाली. सिरियन सरकारला रशियाचा, बंडखोर गटाला अमेरिकेचा तर आयसीसला काही कडव्या मुस्लिम देशांकडून रसद पुरवली जाते. त्यामुळं रशिया आणि अमेरिकेत ठिणगी पडली तर त्याचं तिसऱ्या महायुद्धात रूपांतर तर होणार नाही ना या काळीनं सध्या सर्व जगाला घेरलंय. 

Trending Now