भारत आणि स्विडन दरम्यान सहकार्याच्या नव्या पर्वाची सुरुवात

Ajay Kautikwar
स्टॉकहोम,ता.17 एप्रिल: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्विडनचे पंतप्रधान स्टिफन लोफव्हेन यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांदरम्यान आज विविध करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. संशोधन, विज्ञान, तंत्रज्ञान, ऊर्जा इत्यादी महत्वांच्या करारांवर सहकार्य करार झाले. पंतप्रधान मोदींच्या या भेटीमुळं सहकार्याचं नवं दालन खुलं झाल्याची प्रतिक्रिया स्टिफन यांनी व्यक्त केलीय.पंतप्रधान मोदी हे पाच दिवसांच्या स्विडन आणि ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा पहिला दिवस होता. शिष्टाचाराला फाटा देत पंतप्रधान स्टिफन लोफव्हेन यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. स्टॉकहोममध्ये मोदींनी भारतीय समुदायासमोर भाषणही केलं. स्विडनच्या प्रमुख कंपन्यांच्या सीईओंनी पंतप्रधानांशी भेट घेऊन चर्चाही केली.गेल्या 30 वर्षात स्विडनला भेट देणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत. स्विडन दौरा आटोपून पंतप्रधान मोदी रात्रीच ब्रिटनला रवाना होणार असून उद्यापासून सुरू होणाऱ्या राष्ट्रकूल देशांच्या संमेलनात ते सहभागी होणार आहेत. दशकभरानंतर भारताचे पंतप्रधान राष्ट्रकूल देशांच्या संमेलनात सहभागी होणार असून त्यासाठी ब्रिटनने खास प्रयत्न केले होते.

 

Trending Now