सिम्फनीच्या सुरांसोबत 'त्यांनी' घेतलं मरणाला कवेत!

ऑस्ट्रेलियातील १०४ वर्षांचे शास्त्रज्ञ डेव्हिड गुडॉल यांनी स्वित्झर्लंडमध्ये येऊन सिंम्फनीच्या सुरांचा आनंद घेत अतिशय हटके पद्धतीने इच्छा मरणाचं स्वागत केलं.

Sonali Deshpande
स्वित्झर्लंड, 11 मे : समजा एखाद्याला इच्छा मरण हवं असेल आणि तेच इच्छामरण त्याला सिम्फनीच्या सुमधूर सुरात स्वीकारायला मिळालं तर ! ही कल्पनाच किती हटके आणि भन्नाट आहे नाही. हीच जगावेगळी कल्पना ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञ डेव्हिड गुडॉल यांनी प्रत्यक्षात आणलीय.स्वित्झर्लंडमधील एका रुग्णालयात सुरू असलेली ही सगळी तयारी काही एखाद्या रुग्णाला अॅडमिट करण्यासाठी नाही तर त्यांना इच्छामरण देण्यासाठी आहे. विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे. ऑस्ट्रेलियातील १०४ वर्षांचे शास्त्रज्ञ डेव्हिड गुडॉल यांनी स्वित्झर्लंडमध्ये येऊन सिंम्फनीच्या सुरांचा आनंद घेत अतिशय हटके पद्धतीने इच्छा मरणाचं स्वागत केलं. जगण्याला आता कंटाळलोय, असे सांगत गुडॉल हे इच्छामरणासाठी ऑस्ट्रेलियाहून स्वित्झर्लंडमध्ये आले होते. जगणे परिपूर्ण झाले, असे त्यांनी मृत्यूपूर्वी म्हटलंय.ऑस्ट्रेलियात इच्छामरणाला परवानगी नाही म्हणूनच डेव्हिड खास इच्छा मरणासाठी स्वित्झर्लंडमध्ये आले होते. स्वित्झर्लंडमध्ये १९४०पासून वैद्यकीय साह्याने इच्छा मरणाचा अधिकार प्राप्त आहे. माझ्या या इच्छा मरणामुळे तरी यासंबंधीच्या कायद्यात दुरूस्ती होईल, अशी अपेक्षाही डेव्हिड गुडॉल यांनी मृत्यूला सामोरं जाताना व्यक्त केलीय. डॉक्टरांनी सलाईनद्वारे इजेक्शन देऊन सिंम्फनीच्या सुरमयी वातावरणात त्यांना हे इच्छामरण दिलं.

इकडे भारतातही मुंबईतल्या लवाटे दाम्पत्याने स्वेच्छामरणाची मागणी केली होती, पण सुप्रीम कोर्टाने त्याला साफ नकार दिलाय.आजही स्वित्झर्लंडसारखे काही मोजके देश सोडले तर बहुतांश देशांमध्ये इच्छामरणाला कायद्याने परवानगी नाहीये. या पार्श्वभूमीवर डेव्हिड गुडॉल यांनी स्वीकारलेलं हे सूरमयी इच्छामरण नक्कीच या वादाच्या मुद्याकडे पुन्हा लक्ष वेधून घ्यायला भाग पाडतं.

Trending Now