मार्क झकरबर्ग म्हणतोय,"मला माफ करा !", काय घडलं नेमकं ?

माझं काम लोकांना विभागण्यासाठी वापरलं गेलं, खरंतर ते लोकांना एकत्र आणण्यासाठी होते, असं त्यानं लिहिलंय.

Sachin Salve
03 आॅक्टोबर : फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झकरबर्गनं नुकतीच सर्वांची माफी मागितली. माझं काम लोकांना विभागण्यासाठी वापरलं गेलं, खरंतर ते लोकांना एकत्र आणण्यासाठी होते, असं त्यानं लिहिलंय.हे बघा जगाचा संवादक मार्क झकरबर्ग काय म्हणतोय. मला माफ करा म्हणतोय!! पण माफी कशासाठी? नाही, त्यानं कोणता गुन्हा वगैरे केलेला नाही. त्याला वाटतंय, फेसबुकचा वापर हा लोकांमध्ये विभक्तपणाची जाणीव वाढवण्यासाठी, द्वेष आणि शत्रुत्वाची भावना पसरवण्यासाठी केला जातोय.मार्क झकरबर्गने पोस्टमध्ये काय लिहिलंय?

"आज योम किप्पूर सणाची सांगता होतेय. ज्यूंसाठी हा वर्षातला सर्वात पवित्र दिवस. या दिवशी आपण सरत्या वर्षाचा आढावा घेतो आणि चुकांसाठी क्षमा मागतो. ज्यांना मी यावर्षी दुखावलं, मी माफी मागतो. ज्याप्रकारे माझ्या कामाचा वापर लोकांना विभागण्यासाठी केला गेला, खरंतर त्याचा उपयोग लोकांना एकत्र आणण्यासाठी केला पाहिजे होता. मी माफी मागतो. यापेक्षा चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न करीन. आपण सर्वांनीच येत्या वर्षात प्रगती करावी, आणि आयुष्याच्या पुस्तकात तुमचं नाव कोरलं जावं, ही इच्छा. "- मार्क झकरबर्ग या पत्राला राजकीय परिमाण आहेत. अमेरिकेच्या 2016च्या अध्यक्षीय निवडणुकीत रशियन कंपन्यांनी ट्रम्प यांना मत द्या, असं सांगणाऱ्या जाहिराती फेसबुकवर दिल्या. हिलरी क्लिंटन यांच्याबद्दल अपप्रचार करणाऱ्याही जाहिराती त्यांनीच दिल्या. फेसबुकया जाहिराती नाकारू शकत होतं. पण तसं झालं नाही. आणि आताही हे सगळं फेसबुकनं कबुल केलेलं नाही. अमेरिकेच्या काँग्रेसनं केलेली चौकशी आणि शोध पत्रकारांच्या मेहनतीतून हे सगळं पुढे आलंय. दुसरं म्हणजे, राजकीय नेते, त्यांचे समर्थक फेसबुकचा वापर अफवा पसरवणे किंवा कोणत्या समुदायाला टार्गेट करण्यासाठीही करत असतात. फेसबुकला यालाही आळा घातला आलेला नाही. या सगळ्यामुळेच मार्कनं माफी मागितली असावी, असं तज्ज्ञांचं मत आहे.काहीही असो, त्यानं जाहीर माफी मागण्याचा मनाचा मोठेपणा दाखवला, याचीही दखल घेतलीच पाहिजे.

Trending Now