Success Story: रिक्षावाल्याच्या मुलीने देशाला दिले सुवर्णपदक

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी स्वपना बर्मनने इतिहास रचला. स्वपना बर्मनने हेप्टाथलन प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. स्वपनाच्या या सुवर्णभरारीमुळे भारताच्या खात्यात अकरावे सुवर्णपदक जमा झाले. स्वपनाने हेप्टाथलनचे एकूण ७ इव्हेंट पार केले. यामध्ये शेवटच्या इव्हेंटमध्ये चीनची क्विनलिंग वांगला मागे टाकत तिने ६०२६ गुणांसह प्रथम स्थान पटकावले. २२ वर्षीय स्वपनाचा जन्म पश्चिम बंगालमध्ये गरीब घरात झाला. तिचे वडील पंचानन बर्मन हे रिक्षा चालवून त्यांचे घर सांभाळायचे.

घरात दोन वेळच्या जेवणाची वानवा असताना खेळासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी पैसे कुठून येणार. घरची अशी बिकट परस्थिती असतानादेखील सुकांत सिन्हा या तिच्या प्रशिक्षकांनी तिची भरपूर साथ दिली. तरी स्वपनाने धीर सोडला नाही. ती वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. खेळातून मिळालेल्या बक्षिसाच्या रक्कमेमधून त्यांचे घर चालत होते. अशा अवस्थेत राहुल द्रविडच्या गो स्पोर्ट फाऊंडेशन या अॅथलीट मॅण्टॉरशिप कार्यक्रमाद्वारे तिला मदत करण्यात आली. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर आता तिच्यावर पैशांचा वर्षाव होत आहे. बंगाल सरकारने तिला सरकारी नोकरी देऊ केली आहेत.

Trending Now