अरे देवा… या अनोख्या विक्रमाची विराटने कल्पनाच केली नसेल

प्रत्येक खेळाडूला आपल्या नावावर एखादा तरी रेकॉर्ड असावा असं वाटतं. याला विराट कोहलीही काही अपवाद नाही. पण आता त्यांच्या नावावर असा एक अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे, ज्याची त्याला लाजच वाटेल.

आतापर्यंत विराटच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. पण आता असाही एक अनोखा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे, जो आपल्या नावावर व्हावा अशी कोणत्याच खेळाडूची इच्छा नसेल. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटीत पुन्हा एकदा विराट कोहली कमनशिबी ठरला. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यासोबत विराट कोहली पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्व सामन्यांत नाणेफेक हरणारा भारताचा तिसरा कर्णधार ठरला. याआधी १९४८-४९ च्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर लाला अमरनाथ यांना पाच कसोटी सामन्यांपैकी एकही नाणेफेक जिंकता आली नव्हती.

लाला अमरनाथ प्रमाणेच कपिल देवनेही वेस्ट इंडिजविरुद्ध अमरनाथ यांचाच कित्ता गिरवला. १९८२-८३ मध्ये वेस्ट इंडीज भारत दौऱ्यावर असताना कपिल देव सर्व सामन्यांत नाणेफेक जिंकण्यात अपयशी ठरला होता. मंसूर अली खान पतौडी एकमेव भारतीय कर्णधार आहेत ज्यांनी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत सर्व सामन्यांत नाणेफेक जिंकली होती. १९६३-६४ मध्ये इंग्लंडविरूद्ध घरगुती मालिकेत त्यांनी सर्व सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकली होती.

Trending Now