FIFA World Cup 2018: नेमारची जादू चालली नाही, ब्राझील-स्वित्झर्लंडची बरोबरी

फिफा विश्वकप स्पर्धेत रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीत स्वित्झर्लंडने ब्राझीलला १-१ बरोबरीत रोखले.

Sonali Deshpande
रशिया, १८ जून :  फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीत स्वित्झर्लंडने ब्राझीलला १-१ बरोबरीत रोखले. ब्राझीलतर्फे फिलिपे काउटिन्होने (१७ वा मिनिटं) तर स्वित्झर्लंडतर्फे स्टीव्हन झुबेर (५० वा मिनिटं) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. पाचवेळा जेतेपदाचा मान मिळवणा-या ब्राझीलला अखेर १-१ ने बरोबरीवर समाधान मानावे लागले.  मध्यंतरापर्यंत ब्राझीलने १-० अशी आघाडी घेतली होती.सामन्याच्या सुरुवातीपासून ब्राझील वर्चस्व राखून होता. पण सामन्याच्या ५० व्या मिनिटाला स्वित्झर्लंडच्या स्टीव्हन झुबेरने पेनल्टी कॉर्नरवर हेडरच्या सहाय्याने शानदार गोल करत संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर ब्राझील आणि स्विस संघाने परस्परांवर गोल डागण्याचे जोरदार प्रयत्न केला पण कोणालाही यश मिळाले नाही. अखेर ग्रुप ईमधला हा सामना १-१ असा बरोबरीत सुटला.ब्रेकला एक मिनिटाचा अवधी शिल्लक असताना नेमारला गोल नोंदवण्याची चांगली संधी होती, पण थियागो सिल्वाच्या पासवर चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविण्यात तो अपयशी ठरला. जगातील सर्वांत महागडा खेळाडू असलेल्या नेमारला पहिल्या हाफमध्ये स्विस खेळाडूंनी जखडून ठेवले होते.

Trending Now