या अटीवर सचिनने पाणीपुरी विकणाऱ्या बॅट्समनला दिली त्याची बॅट

मुंबई, 11 जुलै : क्रिकेट विश्वात ज्याला देव मानलं जातं त्या सचिन तेंडुलकरनं त्याच्या उत्कृष्ट खेळीमुळे सगळ्यांची मनं जिंकली. आता निवृत्तीनंतरही सचिन अशी काही कामं करत आहे की त्याच्या चाहत्यांमध्ये त्याच स्थान आणखी उंचावतंय. नुकतंच सचिनने एका सामान्य कुटुंबातिल क्रिकेट खेळाडूला त्याची बॅट गिफ्ट केली आहे. बरं इतकंच नाही तर त्याच्या पुढच्या सामन्यामध्ये याच बॅटने खेळ असंही त्याला सांगितलं आहे. हा खेळाडू म्हणजे यशस्वी. यशस्वी जयस्वालची टीम इंडियाच्या अंडर - 19 संघातून निवड झाली आहे. 19 वर्षांखालील संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर दोन-चार दिवसीय सामना खेळणार आहे. या संघात सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही खेळणार आहे. सचिनने यशस्वीला खेळाविषयी अनेक टिप्स दिल्या. यानंतर सचिनने त्याची बॅट यशस्वीला दिली आणि त्यावर एक खास मेसेजही लिहिला. नुकत्याच संपन्न झालेल्या कूच बेहार ट्रॉफी स्पर्धेत जयस्वालने 500 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या.

खरंतर या शिखरावर पोहचण्यासाठी यशस्वीला मोठा खडतर प्रवास करावा लागला आहे. यशस्वी मुंबईच्या मुस्लिम युनायटेड क्लबच्या एका गार्डसोबत 3 वर्ष त्याच्या झोपडीत राहिला. त्याआधी तो दुधाच्या डेअरीमध्ये काम करायचा. त्यावेळी तो अवघ्या 11 वर्षांचा होता. 2 भावंडात यशस्वी छोटा आहे. तो मुळचा उत्तर प्रदेशचा आहे. त्याच्या वडिलांचं छोटं दुकान आहे. अगदी लहान वयात क्रिकेटर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगत यशस्वी मुंबईला आला होता. सुरूवातीला मुंबईत तो पाणीपुरी विकायचा. पण ते म्हणतात ना 'प्रयत्न आणि कष्टाचं फळ मिळतंच'. तसंच यशस्वीच्याही कष्टाला आणि जिद्दील मोठ यश आलं आहे. त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी त्याला न्यूज 18 लोकमतच्या खूप खूप शुभेच्छा.

Trending Now