आज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा!

आज जागतिक पुस्तक दिन आहे. प्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअर याच्या स्मरणार्थ हा दिन साजरा केला जातो.

Sonali Deshpande
केतकी जोशी, 23 एप्रिल : आज जागतिक पुस्तक दिन आहे. प्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअर याच्या स्मरणार्थ हा दिन साजरा केला जातो. सध्या इंटरनेटच्या युगात कोणताही माहिती एका क्लिकवर आपल्यापर्यंत पोहोचते. पण तरीही पुस्तकांचं योगदान अमूल्य असंच आहे.आपल्याला जन्मापासून नात्यांसोबतच ओळख होते ती अक्षरांची, शब्दांची. हे शब्द कायम आपल्यासोबत असतात ते अखेरच्या श्वासापर्यंत. आपण बोलतो त्या भाषेच्या रूपात तर ते असतातच. पण पुस्तकांच्या रूपात ते अगदी आपले जीवाभावाचे मित्र बनतात. इतिहासापासून ते विज्ञानापर्यंत आणि परीकथांपासून ते गणितापर्यंत अनेक गोष्टी पुस्तकंच आपल्याला शिकवतात.पुस्तकांबद्दल प्रेम वाढावं, जागरूकता निर्माण व्हावी यासाठी आज जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो. जगप्रसिध्द नाटककार विल्यम शेक्सपिअर यांच्या स्मृतीप्रियत्यर्थ हा दिन साजरा केला जातो.1450 मध्ये गटेनबर्गनं जर्मनीत बायबल छापायला घेतलं आणि ज्ञानाचं एक नवीन भांडार खुलं झालं. इंटरनेटमुळे एका क्लिकवर आता सगळी माहिती उपलब्ध होतेय, तरीही पुस्तकांचं स्थान मात्र अबाधित आहे. नवीन लेखकांनाही प्रोत्साहन मिळावं या हेतूनही आजचा हा पुस्तक दिन साजरा होतोय.

तसंच सहसा दुर्लक्षित असलेल्या कॉपीराईट्सबद्दल जागरूकता निर्माण व्हावी या हेतूनं हा दिन साजरा करायला सुरूवात झाली. 1995 मध्ये युनेस्कोनं हा दिन साजरा करायचा निर्णय घेतला. त्यानंतर जगभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांतून हा दिन साजरा होतो आणि सलाम केला जातो आपल्या खऱ्या आणि अखेरच्या श्वासापर्यंत सच्ची सोबत देणाऱ्या या मित्रांना. पुस्तकांना!

Trending Now