भाषा निवडा :

मराठी
पुढची बातमी
दिवसभरात मोदी सरकारमधले दुसरे मंत्री COVID-19 पॉझिटिव्ह

विचारवंतांच्या हत्यांचं सत्र थांबणार कधी ?

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यासारख्या विचारवंत कार्यकर्त्यांच्या हत्यांनंतर त्याची पुढची कडी गौरी लंकेश ठरल्यात. खरं तर सीबीआय सारख्या यंत्रणा अद्यापही ख-या खुन्यांपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. हे विवेकवादी विचारवंतांच्या हत्यांचंं हे सत्रं असंच सुरू राहिलं तर आपला देश नक्कीच तालिबानाच्या दिशेने वाटचाल केल्याशिवाय राहणार नाही.

रणधीर कांबळे, प्रिन्सिपल करस्पॉन्डट, आयबीएन लोकमत

Punish culprit !!! ही टॅगलाईन रोहित वेमुलाच्या मृत्यूनंतर गौरी लंकेश यांनी आपल्या फेसबुकवर लिहिली होती....तशीच कॅप्शन त्यांच्याबाबतीतही लिहावी लागेल, असं कधी वाटलं नव्हतं. पण आता तीच एक सत्य घटना ठरलीय. गौरी या लंकेश पत्रिकेच्या संपादक आणि पुरोगामी विचारधारेच्या चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांची हत्याही कलबुर्गी आणि दाभोलकर, पानसरे यांच्याप्रमाणेच अज्ञात इसमांनी खूप जवळून त्यांना गोळ्या घातल्या गेल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला. आणि आणखी एक सत्ताधिशांच्या चुका थेट दाखवणारा त्यांच्या बद्दल प्रतिप्रश्न धाडसानं विचारणारा आवाज शांत झाला. खरं तर गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निमित्तानं पुन्हा एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जातेय, याची चर्चा सुरू झालीय.

दुसऱ्याचं मत पटलं नाहीतरी त्याचा मत त्याला मांडण्याचं स्वातंत्र्य देणारी विचाराधारा घेऊन आपली पत्रकारिता करणा-या गौरी लंकेश यांचा मात्र त्यांच्या विचाराचा मुकाबला शक्तीच्या बळावर करण्यापेक्षाही तो विचारच मारून टाकूया या भूमिकेतून खून झालाय. त्याचं समर्थन करणारेही सोशल मिडियात दिसताहेत. या निमित्तानं आपली सहिष्णुता एवढी रसातळाला गेलीय का ? हा प्रश्न निर्माण होतोय. अर्थात या हत्येचा निषेध करणारा आवाज त्याही पेक्षा बुलंद आहे, हेच देशभरातून येणा-या प्रतिक्रियेतून स्पष्ट होतंय.

सत्ताधा-यांना मग ते सगळ्याच क्षेत्रातले असोत त्यांना प्रश्न विचारणं, चुकीच्या गोष्टीला ते जर जबाबदार असतील तर त्याबाबत जाब विचारणं आणि इथल्या शक्तीहीन वर्गाच्या न्यायाच्या बाजूसाठी उभं राहणं, हा धर्म पत्रकारितेचा आहे. आणि त्यानुसारच आपली पत्रकारिता त्यांनी गौरी लंकेश पत्रिकेतून केली. त्याचा वारसा गौरी यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला होता. त्यांचे वडिल पत्रकारितेत एक प्रवाह निर्माण करणारे म्हणून ओळखले जातात. पी. लंकेश यांच्या कविता आणि पत्रकारिता ही नेहमीच पीडित, हतबल लोकांच्या बाजूची होती. त्यांच्या लंकेश पत्रिकेत ही भूमिका कायम दिसायची. तीच भूमिका गौरी यांनी सुरू केलेल्या गौरी लंकेश पत्रिकेत दिसत होती. त्यांनी कायमच बलदंड अशा सत्ताधा-यांच्या विरोधात भूमिका घेतली त्यात त्या कधी मागे हटल्या नव्हत्या. त्यांनी आपल्या साप्ताहिकात 'कंडा हागे' या नावानं कॉलम लिहित होत्या . 'कंडा हागे' याचा अर्थ जसं मी पाहिलं तसं, असा होतो. देशभरात ज्या पध्दतीनं हिंसाचाराच्या घटना घडत आहेत, त्याच्यामागे कुठली विचारधारा आहे, याचा पर्दाफाश त्यांनी आपल्या लेखनातून केलाय.

आपल्या साप्ताहिकाच्या 13 सप्टेंबरच्या अंकात त्यांनी सोशल मिडीयावर 'फेकन्यूज' कशा पसरवल्या जातात, यावर प्रकाशझोत टाकला होता. नुकतंच गणेशोत्सवाच्या निमित्तानं एक बातमी सोशल मीडियात व्हायरल झाली होती. त्यात कर्नाटक सरकार सांगेल तिथेच गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करायची, त्यासाठी 10 लाख रूपये डिपॉजिट भरायचं, मूर्तीची उंची किती असेल त्याची परवानगी सरकारकडून घ्यायची, दुस-या धर्माचे लोक राहत असतील त्या रस्त्यावरून विसर्जनासाठी जाता येणार नाही, फटाके वाजवता येणार नाहीत. ही बातमी खूप व्हायरल झाल्यानं कर्नाटकचे पोलीस प्रमुख आर. के. दत्ता यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं की, सरकारनं असा कुठलाही निर्णय घेतला नसल्याचं स्पष्ट केलं. ही बातमी व्हायरल करणारे लोक कट्टर हिंदुत्ववादी होते. ही बातमी कुणी व्हायरल केली याचा शोध घेतला तेव्हा postcard.in या वेबसाईटव्दारे ही बातमी व्हायरल झाल्याचं स्पष्ट झालं. या वेबसाईटनं यापूर्वीही कशा खोट्या बातम्या पसरवल्या होत्या हे स्पष्ट करणारी अनेक उदाहरणे या अंकात दिली आहेत. यातून हेच स्पष्ट होतं की, या देशात सोशल मीडियाव्दारे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणारांना उघडं पाडण्याचा प्रयत्न या अंकात केलाय. त्यांच्या एकूण रोख लिखाणाचा स्पष्ट होतोय. त्यामुळेच कट्टर हिंदुत्ववादी स्वत:ला समजणा-यांच्या रडारवर त्या शत्रू म्हणूनच होत्या हे स्पष्ट होतंय. तसंच त्यांच्या खूनानंतरही त्याचं समर्थन काही लोकांनी फेसबूक, ट्विटरवर काही जणांनी केलंय. यातून हेच स्पष्ट होतंय की, द्वेषाचं आणि असहिष्णूतेचं वातावरण देशात वाढवणारे लोक आहेत. त्यांना गौरी लंकेश यांच्यासारखे पत्रकार शत्रू वाटणं हे स्पष्टंच आहे.

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यासारख्या विचारवंत कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. त्यात पुढची कडी गौरी लंकेश ठरल्यात. खरं तर सीबीआय सारख्या यंत्रणा अद्याप ख-या खुन्यांपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. अशा वेळी गौरी लंकेश यांचे मारेकरी आणि त्यामागचे मेंदू जर वेळीच पकडले गेले नाहीत, तर सामान्य माणसांची बाजू मांडणारं , या देशातल्या सामाजिक एकोप्यासाठी लढणारांच्या बाजूनं इथली व्यवस्था नाही, असा संदेश जाऊ शकेल. आणि ते समाजासाठी पर्यायानं देशासाठी भयंकर असेल त्यामुळे आता या प्रकरणाच्या निमित्तानं दाभोलकर ते गौरी लंकेश असं सुरू झालेलं हत्येचं सत्रं आतातरी थांबवायलाच हवं. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होताना दिसावेत...ही अपेक्षा इथला सामान्य नागरिक करत आहे !!!

First published: September 6, 2017, 8:11 PM IST