जुन्नरमधील तरुणाला अटक
रायचंद शिंदे, पुणे 19 जुलै : जन्म देणाऱ्या आईचे हातपाय बांधून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणार्या मुलाला ओतुर पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही खळबळजनक घटना जुन्नर तालुक्यातील कैलासनगर येथे घडली आहे. मंगेश भोर असं अटक करण्यात आलेल्या विकृत मुलाचं नाव आहे. 5 महिन्यांपूर्वी कैलासनगर येथून विमल विठ्ठल भोर ही 67 वर्षीय महिला घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार मुलगा मंगेश भोर याने ओतुर पोलिसांत केली होती. तपास अधिकारी पटारे हे या वृद्ध महिलेचा शोध घेत होते. ही वृद्ध महिला आळंदी येथे असल्याची माहिती पोलीस कर्मचारी पटारे यांना मिळाली. या वृध्देला ओतुर पोलीस ठाण्यात आणून सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी विचारपूस केली असता धक्कादायक माहिती समोर आली. वृद्ध विमल भोर आणि मुलगा मंगेश भोर हे दोघेच घरात राहायचे. मंगेश भोर हा व्यसनी असून, त्याचं लग्न जमत नव्हतं. परिसरातही त्याचं गुंडगिरीचं वर्तन होतं. यामुळे मामानेही त्याला आपली मुलगी देण्यास नकार दिला आणि या कारणावरून तो आईला सतत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असायचा. नगरच्या समाधान मोरे मृत्यू प्रकरणात नवा ट्वीस्ट, दुसऱ्या पोस्टमॉर्टमनंतर धक्कादायक वळण तिला कोणाशीही बोलू देत नव्हता, घराबाहेर पडू देत नव्हता. 5 महिन्यापूर्वी दारु पिऊन मंगेश भोर याने लग्न जमत नसल्याच्या रागातून आई विमल भोर हिला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करायला सुरवात केली. एवढ्यावरच न थांबता त्याने आईचे हातपाय नायलॉनच्या दोरीने बांधून अंगावर डिझेल ओतलं. माचिस सापडत नव्हती म्हणून माचिस आणायला बाहेर पडला असताना आईने कशीबशी स्वतःची सुटका करून आळंदी गाठली. महिला भीक मागून जगत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांना दिली.
सचिन कांडगे यांनी या वृद्ध महिलेला धीर देत मुलगा मंगेश विरुध्द गुन्हा दाखल केला. तसंच मीच तुमचा मुलगा आहे, असा आधार देत या वृद्ध महिलेच्या मनातील भिती दूर केली. या महिलेला किराणा सामानही दिलं गेलं आहे.