इंद्रायणी झाली 'गटारगंगा'; पिंपरी चिंचवडचे महापौर मात्र बढाया मारण्यात व्यस्त!

वारंवार ताकीद देऊनही इंद्रायणी नदीच्या पात्रात रसायनं आणि मैला मिश्रित पाणी सोडलं जातंय.

Sachin Salve
गोविंद वाकडे, 05 फेब्रुवारी : तीर्थ क्षेत्र आळंदीतुन वाहणाऱ्या इंद्रायणी नदीची अक्षरशः गटारगंगा झाली आहे. वारंवार ताकीद देऊनही इंद्रायणी नदीच्या पात्रात रसायनं आणि मैला मिश्रित पाणी सोडलं जातंय. मात्र महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडच्या महापौरांना भर सभेत टोला लगावत कान उघडणी केली होती. या घटनेला आता एक वर्ष पूर्ण झालंय. महापौर मात्र इंद्रायणीच्या प्रदूषणाचं पाप डोक्यावर घेऊन फिरण्यातंच धन्यता मानतायत. कारण इंद्रायणी नदीची अवस्था आजही जैसे थेचं आहे. किंबहुना ती अधिक प्रदूषित होत चालली आहे.पिंपरी चिंचवड शहरातील सर्व मुख्य नाले आणि एमआयडीसी परिसरातील शेकडो कंपन्यांतून निघणारं रसायनयुक्त पाणी या इंद्रायणीत सोडलं जातं. याकडे ना पाटबंधारे लक्ष देतंय ना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ. दुसरीकडे पिंपरी महापालिकेतील सत्ताधारी मात्र नदी संवर्धनासाठी करू आणि पाहूच्या बढाया मारण्यातच व्यस्त आहेत.

एकेकाळी खळखळुन वाहणाऱ्या इंद्रायणीचा श्वास आता या जलपर्णींखाली गुदमरतोय. तो मोकळा करणं ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. मात्र 'नमामि गंगे, नमामि चन्द्रभागे' म्हणत नदी स्वच्छतेसाठी आणल्या गेलेल्या करोडोंच्या योजना नेमक्या कुठं मुरतायत यावर देखील अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होतायत.

Trending Now