ही गोष्ट आहे आई आणि मुलीच्या परीक्षेची !

वडील मजुरी करतात आणि आई कचरा वेचते, ही परिस्थिती पाहून आपल्याला यातून बाहेर पडायचं. परिस्थिती बदलावयची आहे म्हणून तिने अभ्यास केला.

Renuka Dhaybar
पुणे, 10 जून : अनेकदा विपरीत परिस्थितीत कष्ट करून परिस्थितीशी दोन हात करून त्यावर मात करण्याची इच्छा प्रेरणा देत राहते. गौरीश राजगुरू ही अशीच एक मुलगी. वडील मजुरी करतात आणि आई कचरा वेचते, ही परिस्थिती पाहून आपल्याला यातून बाहेर पडायचं. परिस्थिती बदलावयची आहे म्हणून तिने अभ्यास केला. फक्त अभ्यासच नाही केला तर आईला घर बांधून दाखव मी 90 टक्क्यांनी 10वी उत्तीर्ण होईन असं आव्हान दिलं आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे या दोघींनी आपापली दिलेली आव्हानं पूर्ण केलीत.अगदी छोटंसं 10 बाय 10चं घर. घर उभं करायला राजगुरू ताईंना प्रेरणा ठरली ती त्यांची मुलगी गौरीश. शाळा बदलून मोठ्या शाळेत घाला म्हणून गौरीशने आईच्या मागे लकडा लावला पण मोठी शाळा परवडणार नाही म्हणून आईने नकार दिला. झोपडीवजा घरात किमान अभ्यासाला जागा तरी द्या म्हणून मग आईने कचरा वेचून कमावलेल्या पैशातून एक खोली बांधली आणि गौरीशला अभ्यासाला पोटमाळ्यावर जागा दिली. आईने ही जागा देताना पोरीला आव्हान दिल होतं ते 90 टक्क्यांपेक्षा जास्त मार्कनी पास होण्याचं. कारण सोपं आहे जे आपल्याला परिस्थितीने करायला लावलं ती परिस्थितीच शिक्षणाने मुलीने बदलून टाकावी.आईने दिलेला शब्द पूर्ण केल्यानंतर आता वेळ होती ती गौरीश ने दिलेला शब्द पूर्ण करण्याची. गौरीश दिवसातले किमान 7 तास अभ्यास करत होती. नियोजन आणि अभ्यासाच्या जोरावर गौरीशने दहावीला तब्बल 90 टक्के मार्क मिळवलेत.

गौरीशचा हा संघर्ष अनेकांच्या वाट्याला येतो अनेक जण त्यातून थकून बाहेर पडतात पण गौरीशसारख्या त्या संघर्षाला ही थकवतात आणि उज्ज्वल यश संपादन करतात. एकमेकांना दिलेल्या आव्हानांच्या पुर्ततेनंतर या दोघींच्या डोळ्यातले भाव हेच तर सांगत असावेत.

Trending Now