भुजबळांना लवकर जामीन मिळो,ही ईश्वरचरणी प्रार्थना-दिलीप कांबळे

"छगन भुजबळ ही लढवय्या व्यक्ती आहे, ते बाहेर आले पाहिजेत."

Sachin Salve
28 नोव्हेंबर : छगन भुजबळ आज बाहेर हवे होते. त्यांना लवकर जामीन मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे, ते एक लढवय्या व्यक्ती आहेत असं कौतुकच सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेंनी केलंय.पुण्यात महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथीनिमित्ताने फुलेवाडा इथं कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत मा. गो माळी यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते समता पुरस्कार देण्यात आला. या वेळी बोलताना दिलीप कांबळे यांनी छगन भुजबळ यांच्या आठवणीच उजाळा दिला. ज्या कलमाअंतर्गत छगन भुजबळांना जामीन मिळत नाहीये. ती कलम सुप्रीम कोर्टाने रद्द केलीये. त्यामुळे भुजबळांचा जामिनाचा मार्ग जवळपास मोकळा झालाय. ते बाहेर आले पाहिजे, त्यांची खरी गरज आहे. ते बाहेर यावं ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि हे वक्तव्य मी जाणीवपूर्वक करत आहे असं दिलीप कांबळे म्हणाले. तसंच  छगन भुजबळ ही लढवय्या व्यक्ती आहे. त्यांनी समाजासाठी मोठा लढा दिलाय असंही कांबळे म्हणाले.या कार्यक्रमात केंद्रीय मानव संसाधन मंत्री उपेंद्र कुशवाह देखील उपस्थित होते. त्यांनीही भुजबळांचं कौतुक केलं. त्यांची अनुपस्थिती या ठिकाणी जाणवत आहे. ते पवारांच्या शेजारी असायचे. सामाजिक चळवळीत काम करत नसते तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. आज न्यायपालिका, माध्यमं अशा समाजामध्ये प्रभाव टाकणाऱ्या क्षेत्रामध्ये ओबीसींना प्रतिनिधीत्व असायला हवे अशं म्हणत कुशवाह यांनी भुजबळांची पाठराखण केली.

तर छगन भुजबळ यांनी समता परिषदेची स्थापना करून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार देशाच्या काना कोपऱ्यात पोहचवले असं शरद पवार म्हणाले.

Trending Now